उपवास काळातील
तिसरा सप्ताह
मंगळवार
९ मार्च २०२१
रोमची संत फ्रान्सेस
विधवा (१३८४-१४४०)
संत फ्रान्सेस म्हणत असे, "विवाहित स्त्रीने, आपण प्रथम एक गृहिणी आहोत ह्याचे विस्मरण कधीही होऊ देऊ नये. आपल्या कौटुंबिक कर्तव्यात देवाचा शोध घेता यावा म्हणून प्रसंगी आपले प्रार्थनामय जीवन वेदीपाशीच ठेवून प्रथम आपल्या घरातील कर्तव्ये निष्ठेने पार पाडली पाहिजेत."
दुसऱ्यांच्या अंतर्यामातील विचार ओळखणे, सैतानाचे डावपेच समजून घेणे, साक्षात्कार, दृष्टांत, आरोग्यदान आणि संदेश देणे इ. दाने फ्रान्सेस हिला लाभलेली होती. तब्बल २३ वर्षे देवाने तिला आपल्या रक्षक दुताचा शारीरिक दृष्टांत दिला.
खऱ्या परमेश्वराची उपासना करणारे शद्रख, मेशख आणि अबेदनगो ह्यांनी अत्याचारी राजाची आज्ञा धुडकावून लावली, मात्र त्यांना मरण दंडाला सामोरे जावे लागले. ते देवाला शरण गेले आणि देवाने त्यांचे रक्षण केले.
दया केल्याने दया मिळते व क्षमा केल्याने क्षमा मिळते. आपले जीवन परस्पर संबंधाने जोडलेले असते. हे परस्पर संबंध प्रेमाने, सलोख्याने व शांतीने जपायचे असतात. देव प्रीतिची व परस्पर प्रीतिची आज्ञा आपण पाळल्यानेच देवाचे व पर्यायी ख्रिस्ताचे अनुयायी बनत असतो. केवळ स्वार्थी वृत्तीने आपण वागायला लागलो तर त्याचा परिणाम भोगावाच लागणार आहे. परमेश्वराच्या वचनात व कृपेत वाढण्यासाठी प्रभू येशू आपल्याला पाचारण करीत असतो. प्रभूची अपेक्षा आहे की माझा स्वर्गातील पिता जसा पूर्ण आहे तसे तुम्हीही असावे. आपण सर्वांनी प्रेमाने, सौख्याने व शांती-समेटाने जीवन जगावे म्हणून आज प्रभूकडे प्रेरणा व सामर्थ्य मागू या.
✝️
“प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध
केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?"
येशू त्याला म्हणाला, सात वेळा असे मी तुला म्हणत
नाही तर सातांच्या सत्तर वेळा.
पहिले वाचन :दानिएल ३:२५,३४-४३,११
वाचक : दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
अजऱ्या आगीच्या मध्यभागी उभ राहून उंच स्वरात प्रार्थना करू लागला : तू आपल्या नावाला स्मरून आमचा सदासर्वदा त्याग करू नकोस; आम्हांसाठी आपले वचन रद्द करू नकोस; आपला मित्र आब्राहाम, आपला सेवक इसहाक तसेच आपले भक्तगण इस्त्रायलचे यांचे स्मरण कर व आपली कृपादृष्टी आमच्यापासून फिरवू नकोस; तूच असे वचन दिले होतेस की, आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे व समुद्र किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुमचे वंशज संख्येने वाढतील. हे प्रभो, संख्येच्या दृष्टीने आम्ही सर्व राष्ट्रात लहान झाले आहोत आणि आमच्या पापांमुळे सर्व पृथ्वीवर आमचा अपमान होत आहे. आता तर राजा नाही, संदेष्टा नाही, नेता नाही अर्पण नाही, यज्ञ नाही, बळी नाही आणि धूपदानपण नाही; अशी एकही जागा नाही की, जेथे तुझी कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी तुला अर्पण करता येईल. आमचे पश्चात्तापी हृदय आणि विनम्र मन मेंढ्या आणि बैल तसेच हजारो पुष्ट बकऱ्या ह्यांच्या बलीप्रमाणे तुला मान्य होवो; आज तुझ्यासाठी हेच आमचे बलिदान असो, आम्हांला पूर्णपणे तुझ्या मार्गावर चालव, कारण तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची कधीच निराशा होत नाही. आता आम्ही असा दृढ निश्चय करतो की, आम्ही तुझ्या मार्गाने चालू, तुझ्यावर श्रद्धा ठेवू आणि तुझ्या दर्शनासाठी आतुरलेले असू. आमची निराशा करू नकोस, तर आमच्याबद्दल आमची सहनशीलता तशीच महान दया प्रदर्शित कर. हे प्रभो आपल्या अपूर्व कार्याद्वारे आमचे रक्षण कर आणि आपले नाव सन्मानित कर!
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २५:४-९
प्रतिसाद : प्रभो, तुझ्या वात्सल्याचे स्मरण कर.
१ प्रभो, तुझे मार्ग मला दाखव. तुझ्या वाटा मला प्रकट कर. तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव. मला वळण लाव. कारण तूच तर माझा मुक्तिदाता देव आहेस.
२ प्रभो, तुझे वात्सल्य आणि तुझे अढळ प्रेम यांचे स्मरण कर. ते पूर्वापार चालत आले आहे. माझ्यातारुण्यातील पापांची व अपराधांची आठवण करू नकोस. प्रभो, तुझे अढळ प्रेम आणि तुझे चांगुलपण लक्षात घेऊन माझी आठवण ठेव.
३ प्रभू किती चांगला आणि सरळ आहे. तो पाप्यांना सन्मार्गाने जायला शिकवतो. नम्रजनांना न्यायपरायणता दाखवतो. आपला मार्ग गरिबांना प्रकट करतो.
जयघोष
प्रभू म्हणतो, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि जिवंत असलेला प्रत्येक जण, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही."
शुभवर्तमान मत्तय १८:२१-३५
वाचक : मतयलिखित शुभवतमानातून घेतलेले वाचन
पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, “प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?" येशू त्याला म्हणाला, सात वेळा असे मी तुला म्हणत नाही तर सातांच्या सत्तर वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी शेकेलच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करायला काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की, तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे शंभर शेकेल येणे होते. तेव्हा तो त्याला पकडून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न एकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्वकाही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया ध्यान त्याच्यावर करावयाची नव्हती काय ? मग त्याच्या. रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : परमेश्वर मंदक्रोध असला तरी मानवाच्या सततच्या अपराधांमुळे तो उद्विग्न होत असतो. परंतु या जगात पाप्यांबरोबर त्याचे निवडलेले नीतिमान लोक ही आहेत म्हणून त्यांच्या प्रार्थना व विनवणीकडे लक्ष देऊन तो अनुताप पावतो. इतरांना दोषी ठरवितांना आपल्या अपराधांचा सोयीस्करपणे आपणांस विसर पडतो. मृत्यूच्या अंतीम क्षणी प्रभू येशूने क्षमेची अमृतवाणी घोषित केली. याद्वारे एकमेकांवर प्रेम करून त्यांना मनापासून क्षमा करण्याच्या शिकवणुकीवर प्रभूयेशूने शिक्कामोर्तब केले. प्रभू येशूने आमचे बापा ही प्रार्थना आपल्याला शिकविली आहे. या प्रार्थनेत स्पष्ट म्हटले आहे की, 'जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर.' ही प्रार्थना शिकविताना सर्वात आधी आपण आपल्या वैद्यांना क्षमा करावी हे अधोरेखित करून आपण स्वतः क्षमा करण्यास तयार झालो नाही तर परमेश्वराच्या दयेत आपण पात्र ठरणार नाही असा इशारा येशूने आपणांस दिला आहे.
प्रार्थना : हे स्वर्गीय बापा, तू प्रेमळ व दयाळू आहे. तुझ्याप्रमाणे दयाळू व क्षमाशील बनण्यास मला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या