Marathi Bible Reading | 3rd Week of Lent Wednesday 10th March 2021

उपवास काळातील


तिसरा  सप्ताह


बुधवार 


१० मार्च २०२१

चाळीस रक्तसाक्षांचा सण 


तुर्कस्थानमधील आर्मेनिया ह्या ठिकाणच्या सेबेस्टे येथील चाळीस सैनिक ३२० साली रक्तसाक्षी बनले. कप्पाडोसियाचा राज्यपाल आग्री कोलॉस ह्याने सेवेस्टे येथील लोकांना मूर्तीला नैवेद्य दाखविण्याचा आदेश दिला. त्यावेळी ह्या ४० सैनिकांनी इतरांपासून अलिप्त राहून आपली खिस्ती श्रद्धा अबाधित ठेवण्याच्या हेतूने एकजुटीने राहण्याचे ठरविले. ते वेगवेगळ्या देशांतून आलेले होते. त्यांनी मूर्तीपूजेला नकार दिला.   त्यांचा अमानुष छळ करण्याचा व तुरूंगात टाकण्याचा आदेश देण्यात आला. तुरूंगात असताना त्यांना प्रभू येशूचे दर्शन झाले. त्याने त्यांना जिद्द व चिकाटीने पुढे जाण्यास धीर दिला.  
“एका छळवादी रात्रीच्या गर्भात सार्वकालिक सुखाचा उष:काल दडलेला आहे" असे म्हणत त्यांनी एकमेकांचे सांत्वन केले. त्यांनी एकत्रितपणे देवाची स्तुती आराधना केली आणि अशी प्रार्थना केली : "हे परमेश्वरा आम्ही चाळीसजण एकत्रितपणे या संघर्षात उतरलेलो आहोत. आम्हा चाळीसही जणांना तुझ्या वेदनेचा मुकूट बहाल कर. ह्या पवित्र आकड्याचा अवमान होईल व ही संख्या कमी होईल असे आमच्या हातून काही घडू देऊ नकोस."
------------------------------------------------------------------
 देवाच्या आज्ञांचे पालन आणि आध्यात्मिक व सामाजिक प्रगतीसाठी इस्त्राएली जनतेला आव्हान केले. 

प्रभू येशू आजच्या  शुभवर्तमानात देवाच्या प्रेमाची साक्ष त्याच्या कृत्याद्वारे  देत आहे.  देवप्रीती आणि बंधुप्रितीची शिकवण देत असतानाच प्रभूने देव  राज्याची स्थापना केली. मात्र कर्मकांड व केवळ नियम शास्त्राचे पालन करणाऱ्या कर्मठ शास्त्री - परुश्यांना ते पटले नाही. प्रभू येशू खऱ्या अर्थाने नियमशास्त्र पूर्ण करीत होता. कारण रंजले, गांजले, दुःखित, पीडित आणि अन्यायग्रस्तांना त्याने दिलासा दिला. ईश्वरीय प्रेम, परिपूर्ण शील, उपवास, प्रार्थना, दानधर्म, सेवा आणि परोपकार अशा विविधांगी शिकवणुकीद्वारे प्रभू येशूने देवराज्य प्रस्थापित केले.

शुभवर्तमान आणि नवाकरार खऱ्या अर्थाने जुन्या कराराची परिपूर्तता  आहे. प्रभू येशूने सर्व नियम व आज्ञा देवप्रीति व परस्पर प्रीतित समाविष्ठ केल्या आणि जगात प्रेमाचे व शांतीचे राज्य आणले. प्रभूचा शब्द त्याची शिकवणूक  आणि देवाच्या आज्ञांचे पालन करुन खरे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रभूकडे  कृपा मागू या. 
✝️

"जो कोणी ह्या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व

त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या

राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या

पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा

म्हणतील."

✝️

पहिले वाचन :अनुवाद  ४:१,५-९
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन 

मोशे लोकांना म्हणाला, "आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवीत आहे ते पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे, त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.

पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहा, त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही चालावे तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत. कारण त्यामुळे देशोदेशी लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधीसंबंधी ऐकून ते म्हणतील की, हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकाचे आहे. कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो, तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे ? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हांला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे ? मात्र स्वत:विषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप. नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील. तू आपल्या पुत्रपौत्रांना त्याची माहिती द्यावी.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १४८:१२-१३,१५-१६,१९-२०

प्रतिसाद :येरुशलेम, प्रभूचे गुणगान कर !

१) येरुशलेम, प्रभूचे गुणगान कर ! सियोन, तुझ्या देवाचे स्तवन कर ! तुझ्या वेशींचे अडसर त्याने मजबूत राखले आहेत. तुझ्यामधील नागरिकांना आशीर्वाद दिला आहे.

२) तो पृथ्वीवर हुकूम सोडतो. त्याचा शब्द वेगाने धावत येतो. तो लोकरीसारखी दाट हिमवृष्टी करतो, राखेसारखे दव पसरतो.

३)आपला संदेश त्याने याकोबला आणि आपले नियम व संकेत इस्राएलला जाहीर केले. कुठल्याही राष्ट्रासाठी त्याने असे केले नाही. त्याचे संकेत त्यांना माहीत नाहीत.


जयघोष 

पहा, आताच समय अनुकूल आहे. आजच तारणाचा दिवस आहे.


शुभवर्तमान मत्तय :१७-१९

वाचक : मतयलिखित शुभवतमानातून घेतलेले वाचन 

     येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे. कारण मी तुम्हांला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : परमेश्वराचे वचन, त्याचे विधी व नियम अनन्यसाधारण आहेत. दैनंदिन जीवन जगताना आपण परमेश्वराच्या आज्ञा व नियमांना मानवी बुद्धीच्या पातळीवर सोयीचे बनवितो तेव्हा आपला प्रवास विनाशाकडे सुरू होत असतो. देवाच्या पारलौकिक नियमांची ऐहिक, व्यावहारिक नियमांशी सांगड घालू पाहणारा माणूस देवाशी व स्वतःशी प्रतारणा करतो. देवापासून मिळालेले मोशेचे नियमशास्त्र तंतोतंत व तितक्याच कर्मठपणे पाळण्यास भाग पाडणारे धर्मपंडित स्वतःची वर्तणूक मात्र त्या नियमांशी समांतर ठेवू पाहत होते. परमेश्वराच्या नियमशास्त्रातील मानवी बुद्धीने जोडलेले नियम रद्द करून देवाचे मूळ नियम पुनर्स्थापित करण्याचे सुवार्ता  प्रभू येशू करीत आहे. येशू म्हणतो देवाच्या ह्या मूळ आज्ञांशी फारकत घेणार्याला स्वर्ग राज्यात लहान म्हणतील, येशू आपल्या जीवनाचा स्वामी आहे. अपूर्णतेकडून पुर्णत्वाकडे नेणारा तो स्वतः आपला मार्ग आहे.

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुला अपेक्षित नियम व आज्ञा पाळून तुझ्या राज्याचे वारसदार बनण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या