Marathi Bible Reading | 3rd Week of Lent Thursday 11th March 2021

 उपवास काळातील


तिसरा  सप्ताह


गुरुवार 


११ मार्च २०२१


संत युलोजिअसचा सण - रक्तसाक्षी

“जे श्रद्धेमध्ये शेवटपर्यंत टिकून राहतात त्यांना सार्वकालिक जीवनाचा मुकूट दिला जातो. ह्या मुकूटाचे महात्म्य जर समजून घेतले तर या जगातील कोणत्याही ऐहिक सुखाला आपण बळी पडणार नाही." -कॉर्डोबाचे संत युलोजिअस
✝️ 

हट्टी आणि बंडखोर प्रवृत्तीच्या इस्त्रायली लोकांनी देवाचा हा संदेश धुडकावून लावला. देवाच्या आज्ञेचा व संदेष्ट्यांच्या मार्गदर्शनाचा  त्यांनी अव्हेर केला. तरीसुद्धा देवाने यिर्मया संदेष्ट्याला पाठवून इस्वएली  जनतेला मार्गदर्शन केले, 
दैवी सामर्थ्य व दैवी कृपेचा अव्हेर  करणार्यांना प्रभू येशू स्पष्ट शब्दात सांगत आहे की, 'जो मला अनुकूल नाही तो  मला प्रतिकूल आहे.'
 ख्रिस्ताला अनुकूल असणे म्हणजेच विश्वासाने त्याची| वचने आत्मसात करणे. ख्रिस्ताला अनुकूल असणे म्हणजेच त्याची देवप्रीतिची  व परस्परप्रीतिची आज्ञा पाळणे. ख्रिस्ताला अनुकूल असणे म्हणजे श्रद्धेने व अंत:करणापासून त्याला आपला प्रभू व स्वामी स्वीकारणे. ख्रिस्ताला अनुकूल असणे म्हणजे त्याच्या शब्दाप्रमाणे आचरण करणे आणि आत्मत्याग करुन  परस्पर सेवेचा महामंत्र जीवनात अंगिकारणे होय.
आपण खरोखरच ख्रिस्ताला अनुकूल असे जीवन जगतो का, ह्यावरआपण आज चिंतन करु या. दैवी सामर्थ्यावर व देवाच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवून सैतानाचा धिक्कार करु या.

✝️

"जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळतो."

✝️

पहिले वाचन :यिर्मया ७:२३-८
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन

परमेश्वर म्हणतो, "मी त्यांना फक्त एवढेच सांगितले होते की तुम्ही माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा देव व तुम्ही माझे लोक व्हाल. मी दाखवलेल्या सन्मार्गाने तुम्ही चाला म्हणजे तुमचे कल्याण होईल. पण त्यांनी माझे ऐकले नाही. माझ्या आज्ञांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. त्यांचे हट्टी व दुष्ट मन सांगेल त्याप्रमाणे ते स्वैराचार करू लागले. चांगले होण्यापेक्षा ते अधिकच वाईट बनले. इजिप्तमधून तुमचे पूर्वज निघालेल्या दिवसापासून तो आजवर मी त्यांच्याकडे माझ्या सेवकांना व प्रवक्त्यांना पाठवत गेलो. पण कोणीही त्यांचे ऐकले नाही किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. उलट तुमच्या वाडवडिलांपेक्षाही अधिकच हेकेखोर व बंडखार असे तुम्ही बनत गेला. तेव्हा तू हा संदेश माझ्या लोकांना सांग, पण ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मार, पण ते तुला ओ देणार नाहीत. त्यांना तू सांग की, आपला देव परमेश्वर याचा शब्द ऐकत नाही आणि शिक्षा भोगूनही सुधारत नाहीत ते हेच राष्ट्र आहे. निष्ठा लोप पावली आहे; आता तिचा उल्लेख देखील कोणी करत नाही."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९५:१-२,६-९

प्रतिसाद :आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.

१) याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करूया; आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू. उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ. स्तोत्रे गात त्याचा जयजयकार कर.

२) याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची भक्ती करू, त्याच्यापुढे नमन करू. कारण तो आपला देव आहे. आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. 

३) आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल! "कलहाप्रमाणे, रानातील परीक्षेच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी माझी परीक्षा पाहिली; मला पारखले, माझी कृती पाहिली."


जयघोष 

बी हा देवाचा शब्द आहे. पेरणारा येशू ख्रिस्त आहे. ज्याला ते सापडेल त्याला सार्वकालिक जीवन लाभेल.


शुभवर्तमान लुक ११:१४-२३

वाचक : लुकलिखित शुभवतमानातून घेतलेले वाचन 

येशू एकदा एक भूत काढीत होता, ते मुके होते. तेव्हा भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. यावरून लोकसमुदायाला आश्चर्य वाटले. पण त्यातील कित्येक म्हणाले, "भुताचा अधिपती जो बालजबूल त्याच्या साहाय्याने हा भुते काढतो" आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, "आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि घरावर घर पडते. सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? कारण मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, असे तुम्ही म्हणता; पण मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढीत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूत काढीत आहे, तर देवाचे राज्य तुम्हांवर आले आहे. सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करीत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो. तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळतो."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : विश्वाच्या निर्मितीमधील देवाची सर्वश्रेष्ठ रचना म्हणजे मनुष्यप्राणी. देवाने मनुष्यावर अतोनात प्रेम केले. पण माणूस स्वैराचारी बनला. देवाची असंख्य अद्भूत कृत्ये पाहून देखील तो इतर दैवतांच्या भजनी रमू लागला. माणूस चांगला होण्याऐवजी वाईटच बनत गेला. अनेक प्रवक्ते व संदेष्ट्यांमार्फत देवाने त्यांना ताकीद दिली, पण माणसाने देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष केले. या परिस्थितीत जगात पाठविलेला आपला लाडका पुत्र प्रभू येशू लोकांमध्ये मिसळून दाखले व चमत्कार याद्वारे त्यांना दुरुस्त करू लागला. तेव्हा हाच माणूस येशूला दूषणे देऊ लागला. त्याची परीक्षा पाहू लागला. म्हणूनच येशू म्हणतो जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळतो. येशूला अनुसरणे म्हणजे त्याला अनुकूल असणे. त्याच्या मार्गाने चालून त्याची वचने आत्मसात करणे व त्याप्रमाणे जीवन जगणे. जो कोणी अशाप्रकारे प्रभूचे वचन गोळा करून आपल्या हृदयात साठवितो. त्याला या जगात व शाश्वत जीवनात सुख मिळेल. संकटकाळी प्रभू येशू त्याची तटबंदी व दुर्ग होईल व सर्व अरिष्टांपासून त्याला वाचवील.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे जीवन  जगण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या