Marathi Bible Reading | 3rd Week of Lent Friday 12th March 2021

उपवास काळातील


तिसरा  सप्ताह


शुक्रवार 


१२ मार्च २०२१




संत थिओफानेस

मठाधिकारी(१३७)

✝️ 

 आपले  जीवन व आपल्याला लाभलेले सर्वस्व परमेश्वराच्या प्रीतिनेच मिळालेले आहे,  म्हणून परमेश्वराठायी आपण आपले सर्वस्व समर्पण करुन प्रीति करणे आवश्यकच आहे. परंतु प्रभू येशू त्याच्याही पुढे जाऊन  सांगत आहे की, 'जशी स्वत:वर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीति कर. प्रभू येशूने आंधळ्यांना, बहिऱ्यांना, मुक्यांना, आजारी व भूतग्रस्तांना मुक्ती दिली, मेलेल्यांना जिवंत केले, पापी व गरिब जनांना जवळ केले व त्यांना मायेचा ओलावा दिला. प्रभू येशूने अपराध्यांना क्षमा केली व अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी क्रुसावर आपले  बलिदान दिले. परस्पर प्रीतिचे मुर्तिमंत उदाहरण स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. 
आजच्या होशेय ह्या पहिल्या वाचनात इस्त्राएली जनतेला  अधर्मापासून दूर होऊन परमेश्वराकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  परमेश्वर बाप प्रेमळ व दयाळू आहे व आपणही तसे व्हावे म्हणून आपणास आवाहन करण्यात आले आहे.
आपण आज आपल्या परस्पर प्रेमावर चिंतन करु या.  परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेऊन तो स्वत: आचरणात आणण्यासाठी प्रभूकडे प्रेरणा मागू या.

✝️

"तू आपला देव परेमश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर."

✝️

पहिले वाचन :होशेय  १४:१-९
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन

    परमेश्वर म्हणतो, "हे इस्त्राएल, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ. कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर; म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. असिरिया आमचा बचाव करणार नाही. आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही. आमच्या हातच्या कृतीला, "आमच्या देवा," असे यापुढे आम्ही म्हणणार नाही. कारण तुझ्या जवळ पोरक्यांना दया मिळते.
    मी त्यांना वाटेवर आणीन. त्यांच्याजवळ मोकळ्या मनाने प्रीती करीन. कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे. मी इस्राएलला दहिवरासारखा होईन. तो भूकमलाप्रमाणे फुलेल. लबानोनप्रमाणे मूळ धरील. त्याच्या फांद्या पसरतील. त्यांचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल. त्याला लबानोनसारखा वास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील. त्यांची कीर्ती लबानोनच्या द्राक्षरसासारखी होईल. एफ्राइमला यापुढे मूर्तीशी काय कर्तव्य आहे ? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन, मी हिरव्यागार सरुसारखा आहे. माझ्या पासून तुला फळ मिळते.
    जो कोणी शहाणा आहे, त्याला समजेल, जो कोणी समंजस आहे, त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत. त्या मार्गाने धार्मिक चालतात आणि पातकी त्यात अडखळून पडतात."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ८१:६-११,१४.१७

प्रतिसाद : मी प्रभू तुमचा देव आहे.

१) कुणा अपरिचिताचे बोलणे मला ऐकू येत आहे. तुमच्या खांद्यावरले ओझे उतरणारा मीच. हातामधल्या पाट्या काढून टाकणाराही मीच. संकटात तुम्ही धावा केलात; मी तुम्हांला सोडवले.

२) वादळी मेघात मी दडलेला असताना तुम्हांला उत्तर दिले. मरिबा येथल्या झऱ्याजवळ मी तुमची कसोटी घेतली इस्रायली जनहो, जरा माझे ऐकायचे होते!

३) तुम्ही अन्य देवतांच्या भजनी लागू नका. परक्या देवतांच्या पाया पडू नका. इजिप्त देशातून तुम्हांला बाहेर आणणारा, मी प्रभूच तुमचा देव आहे.

४) माझ्या लोकांनी माझे ऐकले तर, इस्राएल लोक माझ्या मार्गाने चालाले तर! इस्राएलला मात्र मी उत्तमपैकी गहू खायला घालीन; पहाडावरल्या मधाने तृप्त करीन.


जयघोष 

हे देवा, माझ्या ठायी शुद्ध अंत:करण निर्माण कर. तू देत असलेल्या मुक्तीचा गोड अनुभव मला पुन्हा येऊ दे.


शुभवर्तमान मार्क  १६:१९-३१

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि येशूने त्याला समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, "सर्वात पहिली आज्ञा कोणती?" येशूने उत्तर दिले, "पहिली ही की, हे इस्राएल, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परेमश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की, जशी स्वत:वर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही." तो शास्त्री त्याला म्हणाला, "गुरुजी, आपण ठीक व खरे बोललात की, तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही; आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वत:वर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करणे, हे सर्व होमार्पणे व यज्ञ ह्यापेक्षा अधिक आहे." त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, "तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : देव प्रीतीचा उभा खांब व शेजार प्रीतीचा आडवा खांब जेव्हा एकमेकांना छेदून जातात तेव्हा ख्रिस्ती श्रद्धेची ओळख बनलेल्या क्रूसाचे चिन्ह तयार होते. मानवाच्या तारणासाठी आपल्या पवित्र व अमोलिक रक्ताने स्नान घालून येशूने हा क्रूस पवित्र केला आहे. ईश्वराच्या सान्निध्यात देव प्रीती व स्वयंप्रीती ह्यांचे जेव्हा मधुर मिलन होते. तेव्हा मानवी जीवनाचे पुनरुत्थान होते. त्याची कीर्ती लबानोनच्या द्राक्षारसासारखी पसरेल. जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. दृश्य अशा मानवावर आपण प्रीती केली नाही तर अदृश्य अशा भगवंतावर आपण कशी प्रीती करणार? प्रत्येक मानवात भगवंत वसती करतो, जेव्हा माणसावर आपण खऱ्या मनाने प्रीती करतो तेव्हा परमेश्वरावरील आपल्या प्रीतीला भरती येते. देव प्रीती आहे. एकमेकांना समजून घेऊन, क्षमा करून एकमेकांवर प्रीती करणारा परमेश्वराच्या प्रीतीचा वारसदार आहे.

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुजवर, स्वत:वर व तशीच आमच्या बंधु  भगिनींवर प्रीति करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या