Marathi Bible Reading | 3rd Week of Lent Saturday 13th March 2021

उपवास काळातील


तिसरा  सप्ताह


शनिवार


१३ मार्च २०२१



संत युफ्रेझिया 
(- कुमारिका)

✝️ 

 आज होशेय संदेष्टा इस्त्राएली जनतेला त्यांच्या पश्चातपाचा खोटेपणा उघड करुन सांगत आहे. की  क्षणिक भक्ती आणि अपूर्ण  श्रद्धा ह्यांमुळे देव प्रसन्न होत नाही. परमेश्वर यज्ञाचा नाही तर दयेचा भूकेला आहे, 

 प्रभू येशू आपल्याला खरा श्रद्धावान, निष्ठावान आणि नीतिमान माणूस परमेश्वरासमोर कसा नम्र व लीन बनतो ह्याचे स्पष्टीकरण देत आहे.  परमेश्वराला मोठमोठे यज्ञ व व्यर्थ प्रार्थना नको तर पश्चात्तापी अंत:करण हवे असते. कारण तो दयेचा, क्षमेचा प्रेमाचा व शांतीचा दाता आहे.

 प्रभू येशू स्वत: नम्र बनला व आपल्या सर्वांसाठी त्याने दुःखसहन व मरण स्वीकारले. प्रभू येशू स्वत: म्हणत आहे, 'मी नम्र व लीन ! हृदयाचा आहे. ' आपण आपल्यातील अहंकार, स्वार्थ आणि मीपणा दूर सारुन  प्रभू येशूला शरण जाऊ या. पश्चात्तापी अंत:करणाने प्रभूकडे दयेची व क्षमेची याचना करू या. 

✝️

"आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर !"

✝️

पहिले वाचन :होशेय  ६:१-६
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन

    "मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे." प्रभू असे म्हणतो, "ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील, चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ. कारण त्याने आम्हांला झोडले आहे व तोच आम्हांला बरे करील. त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो दोन दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील; तिसऱ्या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. चला, आपण परमेश्वराला ओळखू. परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यासाठी झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाच्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल."
हे एफ्राइम, मी तुझ्यासाठी काय करू ! हे यहुदा, मी तुला काय देऊ? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उठून जाणाऱ्या दंहिवराप्रमाणे आहे. म्हणून मी त्याच्यावर संदेष्ट्यांच्या हातून कुऱ्ह्याड चालवली आहे. माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे. माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १:३-४,१८-२१

प्रतिसाद :  मला यज्ञ नको तर प्रेम हवे.

१)  देवा, तुझ्या प्रेमाखातर माझ्यावर दया कर तुझ्या महान दयेस अनुसरून माझ्या अपराधांचे कलंक पुसून टाक. मला धुऊन माझा दोष पूर्णपणे दूर कर. माझ्या पापापासून मला शुद्ध कर.

२) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस, नाही तर तो मी केला असता. होमार्पणांची देखील तुला आवड नाही. देवा, तुला शरण आलेला हा आत्मा हाच माझा यज्ञ. भग्न व पश्चात्तापी अंत:करण तू झिडकारणार नाहीस. 

३)  तू प्रसन्न होऊन सियोन नगरावर कृपादृष्टी कर. येरुशलेमची तटबंदी उभार. मग यथायोग्य यज्ञ व विविध होमार्पणे यांनी तू प्रसन्न होशील. तुझ्या वेदीवर गोहे बळी दिले जातील.


जयघोष 

आज तुम्ही आपली मने कठीण करू नका. तर प्रभूचे म्हणणे ऐका!


शुभवर्तमान लूक  १८:९-१४

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

    आपण धार्मिक आहो असे जे कित्येक स्वत:विषयी भरवंसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानीत होते त्यांनाही येशूने एक दाखला सांगितला: "एक परुशी व एक जकातदार असे दोघेजण प्रार्थना करण्यास वर मांदिरात गेले. परुश्याने उभे राहून स्वत:शी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर ! मी तुम्हांला सांगतो दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : परमेश्वर जेव्हा आपल्या जीवनास स्पर्श करतो तेव्हा आपल्या आयुष्यात मांगल्याची पहाट उगवते. गतकालीन चुका, अपराध, सूडभावना इत्यादिंची जळमटे व किल्मिष क्षणार्धात गळून पडतात. तो परमेश्वरापुढे स्वतःला नमवितो. आज येशू अशा नम्र माणसाचा गौरव करून त्याला उंचावित आहे. माणूस परिपूर्ण नाही. आपण प्रत्येकजण पापी आहोत. तरीही इतरांप्रमाणे मी पापे करीत नाही. त्यांच्यापेक्षा मी अधिक पुण्यवान आहे अशी स्वतःबद्दल इतरांशी तुलना करू लागतो. तेव्हा प्रत्यक्षात मात्र तो पापांच्या खोल दलदलीत रुतलेला असतो ह्याचे त्याला भान राहत नाही. आपण परमेश्वरापुढे कधीच शेखी मिरवू नये. मान वर करून उंच स्वरात कधीच त्याच्यापुढे बोलू नये. आपण जे काही अर्पण सादर करतो ते सर्व देवाचेच आहे. आपले स्वतःचे असे या जगात काहीच नाही. म्हणून अत्यंत नम्रपणे परमेश्वरापुढे नतमस्तक होऊन शरणागती पत्करली तर ईश्वराचा आशीर्वाद व कृपा आपणांस नक्कीच मिळू शकतो. देवापुढे आपण खरोखर नीतिमान होऊन शांतीने घरी जाऊ.

प्रार्थना : हे प्रभू येशू, मज पाप्यावर दया कर, मला तुझ्या सत्पथाने  चालण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या