Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | 4th Sunday of Lent 14th March 2021

उपवास काळातील


चौथा  रविवार 


१४ मार्च २०२१




✝️ 

देव प्रीति आहे आणि त्याच्या प्रीतिचे दान त्याने मानवाला दिलेले आहे. आपण मात्र जगतिक प्रलोभनांना आणि सैतानाला बळी पडून देवाच्या प्रेमापासून बहकतो अशा वेळी देव स्वत: आपला शोध करीत आसतो. कारण कुणाचाही नाश होऊ नये तर सर्वांचे तारण व्हावे ही देवाची इच्छा  आहे.

 'जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.' अखिल मानव जातीच्या तारणासाठी प्रभू येशू स्वतः: समर्पित बळी बनला. संत पौल आजच्या  वाचनात म्हणतो, 'आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असतांहि देवाने आपल्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले' 
आपण आजच्या वचनांवर चिंतन :  देवापासून आपण बहकलो आहोत का ? देवाच्या प्रेमाला आपण पारखे झालो आहोत का? देवावरील व येशूवरील विश्वासात आम्ही कमी पडतो का ? देव दया संपन्न आहे आणि आपण सर्वजण त्याची प्रेमळ निर्मिती आहोत.

✝️

"जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."

✝️

पहिले वाचन : २ इतिहास ३६:१४-१६.१९-२०
वाचक : इतिहासाच्या दुसऱ्या या पुस्तकातून घेतलेले वाचन

    सर्व मुख्य याजकांनी व लोकांनीही अन्य राष्ट्राच्या अमंगळ कृत्यांचे अनुकरण करुन घोर पातक केले आणि जे मंदिर परमेश्वराने यरुशलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दुतांच्या हस्ते त्यांना आदेश पाठवी. कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती. पण ते देवाच्या दुतांची टर्र उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्याच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत. शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.

बाबेलच्या लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले, येरुशलेमचा कोट पाडून टाकला, तेथले वाडे आग लावून जाळले व त्यातला सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला. जे तरवारीच्या तडाख्यातून चुकून राहिले त्या सर्वांना तो राजा बाबेल येथे घेऊन गेला. पर्शियाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजांचे दास होऊन राहिले. परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाने प्रकट केलेले वचन पुरे होऊन देशाला शांततेचा काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले. देश ओस पडला होता तोवर म्हणजे सत्तर वर्षे पुरी होईपर्यंत त्यात शांतता नांदत होती. यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पर्शियाचा राजा सायरस याच्या मनाला त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने स्फूर्ती दिली. तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात ताकीद दिली व लेखी फर्मान पाठवले की, "पर्शियाचा राजा सायरस असे म्हणतो, स्वर्गाचा देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत व मला आज्ञा केली आहे की यहुदातील येरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध. तर तुम्हापैकी त्याच्या सर्व लोकांतील जो कोणी असेल, त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्वर असो, त्याने तेथे जावे."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १३७:१-६

प्रतिसाद जर मी तुझी आठवण ठेवली नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो !

१.  बाबेलच्या नद्यांजवळ आम्ही बसलो. हो, तेथे आम्हांला सियोनची आठवण झाली, तेव्हा आम्ही रडलो. तेथील वाळुजांवर आम्ही आपल्या वीणा टांगून ठेवल्या.

२. कारण तेथे आमचा पाडाव करणाऱ्यांनी आम्हांला गाणी गायला सांगितले. आमचा छळ करणाऱ्यांनी आम्हांला मौज करायला सांगितले. ते म्हणाले, आम्हांला सियोनचे एखादे गाणे गाऊन दाखवा.

३.  आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे? हे येरुशलेम, जर आम्ही तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो!

४. जर मी तुझी आठवण ठेवली नाही, जर मी येरुशलेमला माझ्या सर्व आनंदाहून अधिक मानले नाही, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो !


दुसरे वाचन : इफिस २:४-१०

वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

बंधूजनांनो, देव दयासंपन्न आहे म्हणून आम्ही आमच्या अपराधांमुळे, मरण पावलेले असताही त्याने आम्हांवरील स्वत:च्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आम्हांला जिवंत केले (कृपेने तुमचे तारण झालेले आहे) आणि ख्रिस्त येशूच्याठायी त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात बसवले. यासाठी ख्रिस्त येशूच्याठायी आम्हा सर्वांवरील त्याच्या ममतेच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याच्या कारागिरीची वस्तू आहो. ती सत्कृत्ये आचरीत आम्ही आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.



जयघोष 

देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.


शुभवर्तमान योहान ३:१४-२१

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
    येशू निकोदमला म्हणाला, "जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होत, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. ह्यासाठी जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."

देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे. तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो; ह्यासाठी आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : लहान मुले साप शिडीचा खेळ खेळत असतात. चकती जेव्हा सापाचे तोंड असलेल्या नंबरवर येते तेव्हा खेळणाऱ्या व्यक्तीची पिछेहाट होते. मात्र तीच चकती जेव्हा शिडीच्या पायथ्यापाशी येते तेव्हा खेळणाऱ्या व्यक्तीची उन्नती होऊन ती लवकरच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचते. आपल्या जीवनात विकृतीचे साप कोणते आहेत आणि सत्प्रवृत्तीच्या शिड्या कोणत्या आहेत ते आपण सतत तपासून पाहायला हवे. त्यासाठी आजची वाचने आपल्याला तीन विचार देताना आढळतात:
 १) धार्मिक जीवन गांभीर्याने घेणे : आजच्या पहिल्या वाचनाचा केंद्रबिंदू आहे जेरुसलेमचे मंदिर! शलमोन राजाने इस. पू.  दहाव्या शतकात हे वैभवशाली मंदिर उभारले. मात्र इसपू. ५९७- ५८६ दरम्यान बाबिलोनच्या लोकांनी ते उद्ध्वस्त केले, व लोकांना हद्दपार अवस्थेत नेले. तिथून परतल्यानंतर एज्रा व नहेम्या ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची पुर्नउभारणी करण्यात आली. येशूने ह्याच मंदिराचे शुद्धीकरण केले. धार्मिक जीवनातही अशी पडझड होत असते. प्रायश्चित्त काळात हे धार्मिक जीवन गांभीर्याने घेण्यास आपल्याला पाचारण केले जाते. 
२) ईश्वरी कृपेवर विसंबून राहणे: धार्मिक जीवन जगत असताना मनुष्य एक तर आपल्या बुद्धीवर वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात विसंबून राहू शकतो किंवा आपले प्रयत्न व सत्कृत्ये परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करण्यास समर्थ आहेत. असा फाजील आत्मविश्वास बाळगू शकतो. संत पॉल आपल्याला देवाच्या कृपेवर विसंबून राहण्यास प्रोत्साहन देतो. 
३) ईश्वरी प्रेमाचा अनुभव घेणे : संपूर्ण नव्या करारातील मध्यवर्ती वचन आजच्या शुभवर्तमानात वाचायला मिळते. 'देवाने जगावर एवढी प्रीती केली...' संत अगस्तीन म्हणतात, 'पाप म्हणजे परमेश्वराच्या प्रेमाला दिलेला नकार.' माणसापुढे सदाचारी जीवनाचा प्रकाश व  दुराचारी जीवनाचा अंधार असे दोन पर्याय ठेवण्यात आलेले आहेत. आपल्या विचार स्वातंत्र्याचा सदुपयोग करून आपण परमेश्वराच्या प्रेमाचा पुरेपुर स्वीकार केला तर आपली अध्यात्मात प्रगती होते.

आत्मपरीक्षण : आध्यात्मिक जीवनात आपली प्रगती होत आहे की, अधोगती ? कशावरून ? 
मननासाठी शास्त्रवचन : 'देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.'

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, आमचे संपूर्ण जीवन तुझ्या प्रीतिने भरुन टाक आम्हाला तुझी प्रेमळ मुले बनव, आमेन.