Marathi Bible Reading | Feast of St. Eucherius | Saturday 20th February 2021

 प्रायश्चित्त काळ 

शनिवार  

२० फेब्रुवारी  २०२१





 संत युखेरिअस


प्रत्येक पाप देवावरील द्वेष व्यक्त करीत असल्यामुळे त्यामध्ये दैवी प्रकाश आढळणे कधीतरी शक्य आहे काय? - संत युखेरिअस


परमेश्वर  त्याच्या आज्ञप्रमाणे आणि वचनाप्रमाणे आचरण करणाऱ्यांवर कृपेचा वर्षाव करितो ,परंतु  त्यासाठी काही अनिष्ट गोष्टींना मूठमाती देणे गरजेचे आहे. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे व तो सर्वांवर प्रीति करतो.
शास्त्री-परुश्यांच्या मतानुसार जकातदार म्हटला म्हणजे  समाजात त्याला पापी समजले जाई.  येशूने  म्हटले,, 'मी नीतिमानांना नव्हे तर पापी लोकांना पश्चातापासाठी बोलाविण्यास  आलो आहे.' परमेश्वराला त्याची सर्व लोकरे मौल्यवान आहेत. प्रभू येशू  लेवी जकातदाराचा व्यवसाय पाहत नाही तर त्याचे परिवर्तनशील अंत:करण  पाहतो व त्याला पाचारण करतो. 
प्रभू येशू आज सर्वांना आपल्या परिवर्तनासाठी पाचारण करीत आहे. ह्या प्रायश्चित काळात आपण आपल्या जीवनात  डोकावून  पाहू या. आपल्यात असलेले अवगुण व  अपराध प्रभूला सांगू या व त्याची वाणी ऐकू या. 
प्रभू आपल्या प्रत्येकाला सांगत  आहे,  'माझ्या मागे ये'. 

✝️

"मी नीतिमानांना नव्हे तर पापी लोकांना

 पश्चातापासाठी बोलाविण्यास  आलो आहे"

✝️

पहिले वाचन :यशया ५८:९-१४ 

वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"स्वत:च्या मार्गाने न जाण्याने तू प्रभूचा आदर करशील."

प्रभू म्हणतो, "जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, दु:खग्रस्त जिवाला तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील . तुझ्या हाडांना मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील. पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन: बांधतील. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन:उभारशील. मोडतोडीचा जीर्णोद्वार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल. तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्बाथ आनंद दिन आहे. परमेश्वराचा पवित्र व सन्मान दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस, तर तू परमेश्वराच्याठायी हर्ष पावशील. तू देशांच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असे मी करीन आणि तुझा पिता याकोब याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र ८६:१-६  

प्रतिसाद : प्रभो, मला मार्गदर्शन कर.

१) माझ्याकडे लक्ष दे प्रभू, मला उत्तर दे. मी गरीब व गरजवंत आहे. माझ्या जिवाला जप कारण मी तुझा भक्त आहे. तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या आपल्या दासाचे रक्षण कर.

२) तू माझा देव आहेस. म्हणून माझ्यावर दया कर. हे स्वामी, सारा दिवसभर मी तुझा धावा करतो. या तुझ्या दासाच्या मनाला आनंद वाटू दे. कारण हे स्वामी, माझा जीव तुझ्याकडे लागला आहे.

३) स्वामी, तू किती चांगला आहे. तू क्षमाशील आहेस. तुझा धावा करणाऱ्यांना तू दयासागर आहेस. माझी प्रार्थना ऐक. हे प्रभू, माझ्या याचनेच्या शब्दांकडे लक्ष दे.


जयघोष   

जे अपराध तू माझ्याविरुद्ध केले आहेत, ते तुझ्यातून निघून जाऊ दे आणि तुझ्यामध्ये नवीन आत्मा आणि नवीन शक्ती येवो.


शुभवर्तमान  लूक ५:२७-३२
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
"मी नीतिमानांना बोलावायला आलो नाही. तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलावायला आलो आहे."

येशूने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, "माझ्यामागे ये." तेव्हा तो सर्व काही तेथून सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्यावेळी त्याच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता. तेव्हा परुशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले "जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता ?" येशूने त्यांना उत्तर दिले, "निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना बोलावायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलावायला आलो आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : आजच्या शुभवर्तमानात येशूख्रिस्त, लेवी नावाच्या जकातदाराला बोलावतो व आपला शिष्य बनवितो. लेवी हा रोमन लोकांचा नोकर होता. म्हणून यहूदी लोक त्याचा तिरस्कार करीत असत. तो धूर्तपणे यहुदी लोकांचे आर्थिक शोषण करीत असे. थोडक्यात यहुदी लोकांनी त्याला जातिभ्रष्ट केले होते. जेव्हा येशू त्याला भेटला व त्याला प्रेमाने व ममतेने बोलाविले तेव्हा त्याच्या मनाचे व हृदयाचे परिवर्तन झाले. त्याने आपल्या जुन्या पापी वागण्याचा त्याग करुन नवीन जीवन जगण्याचा निश्चय केला. लेवीप्रमाणे आपणही आपले भ्रष्टाचारी जीवन सोडून प्रामाणिकपणे ख्रिस्ताला शरण जावे. असे झाले तरच आम्हांला खिस्ताच्या दयेचा अनुभव येईल.

प्रार्थना : प्रभू येशू तुझी हाक ऐकुन तुला प्रतिसाद देण्यास व तुझी सुवार्ता  परविण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या