प्रायश्चित्त काळ
शुक्रवार
१९ फेब्रुवारी २०२१
केवळ शारीरिक अन्नाचा त्याग करून चालणार नाही तर धर्माचरण शुद्ध ठेवून कृतीशील बनायला हवे.
आपण उपासकाळात आहोत तरीसुद्धा आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की येशूचे शिष्य उपास करीत नव्हते.
उपासाला उपवास असेही म्हटले जाते. उपवास म्हणजेच स्वत:च्या आचरणावर नियंत्रण ठेवून देवाच्या सहवासात जाणे. शिष्य उपास करीत नव्हते कारण ते सतत प्रभू येशूच्या सहवासात होते.
आपण खरोखरच चांगला उपास / उपवास करतो का? श्रद्धेला किंवा उपासाला कृतीची जोड असायला हवी. प्रार्थना , उपास आणि दानधर्मा बरोबरच आपल्या उपासाला सेवेची जोड द्यायला हवी. यशया संदेष्ट्याने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आपण आपल्यातील दुष्टपणा तपासून पाहावा आणि दुष्टतेच्या बेड्या तोडून टाकायला हव्यात. ह्या उपवास काळात आपल्याला कृतीशील उपवास करता यावा आणि क्षमा, समेट, परोपकार व प्रेम ह्यांचा अविष्कार आपल्या जीवनात दिसून यावा म्हणून प्रयत्नशील बनू या.
✝️
"वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. तेव्हा ते उपवास करतील."
✝️
पहिले वाचन :यशया ५८:१-९
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय?"
प्रभू म्हणतो, कंठरव कर, कसर करु नको, आपला स्वर काप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकांना त्याचे अपराध, याकोबच्या घराण्याला त्याची पातके विदित कर. ते तर रोजरोज माझ्याकडे येतात. माझे मार्ग ते जाणू इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात. आम्ही उपवास करतो ते तू का पाहात नाहीस? आम्ही आपल्या जिवाला पीडा देतो, ती तू का लक्षात आणत नाहीस? पाहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता, पाहा तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की, तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने मारामारी करता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जिवाला पीड़ा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय ? लव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोणपाट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? आपले अन्न भुकेल्यांना तू वाटावे, तू लाचारांना व निरश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला विन्मुख होऊ नये हाच तो उपवास नव्हे का ? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल. तुझी जखम लवकर भरेल. तुझी धार्मिकता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वर ऐकेल. तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, मी येथे आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद : स्तोत्र ५१:३-४,प-६,१८-१९
प्रतिसाद :हे परमेश्वरा, नम्र व पश्चात्तापी अंत:करण तू झिडकणार नाहीस.
१) तुझ्या दयेला अनुसरून माझ्या अपराधाचे कलंक पुसून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे दूर कर.
२ ) माझे अपराध मी जाणून आहे. माझे पाप मला सतत टोचत आहे. तुझी केवळ अवज्ञा करून मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने वाईट ते केले आहे.
३) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस. होमार्पणाचीदेखील तुला आवड नाही. देवा, तुला शरण आलेला आत्मा हाच माझा यज्ञ. नम्र व पश्चात्तापी अंत:करण तू झिडकारणार नाहीस.
जयघोष
माझा आत्मा प्रभूची प्रतीक्षा करतो. मी प्रभूच्या शब्दांवर विसंबून आहे कारण प्रभूच्या ठायी क्षमाशीलता आहे आणि तोच सर्वस्वी मुक्तिदाता आहे.
शुभवर्तमान मत्तय ९:१४-१५
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"वर त्याच्यापासून काढून घेतला जाईल. तेव्हा ते उपवास करतील.
योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, "आम्ही व परुशी पुष्कळ उपवास करतो पण आपले शिष्य उपवास करत नाहीत. ह्याचे कारण काय?" येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाडयाबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी शोक करणे शक्य आहे का? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. तेव्हा ते उपवास करतील."
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : प्रायश्चित काळाचे दिवस आम्ही अनुभवित आहोत. यशया संदेष्टयाच्या शब्दात उपवास व प्रायश्चित्ताचा खरा अर्थ जाणून घेऊ या. उपवास करताना स्वतःला श्रेष्ठ समजून मजुरांचा उपमर्द करणे, त्यांना अन्यायाने वागवणे रास्त ठरत नाही. याउलट, मनातून दुष्टाई काढून टाकावी, भुकेल्यांना अन्न दयावे. पीडितांना व दुर्बलांना मदतीचा हात दयावा. त्यांचे जीवन सुसय्य करावे यातच धार्मिकता भरलेली आहे. याप्रकारे देवाच्या शब्दानुसार वागून प्रायश्चित करणाऱ्या धार्मिक माणसाचे जीवन प्रभूच्या दिव्य प्रकाशाने भरून जाईल हा आशावादी संदेश नव्याने स्वीकारू या.
प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझ्याशी तादात्म्य पावण्यास, तुझ्याशी संवाद
साधण्यास व तुझ्याबरोबर एकरूप होण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, तसेच दया कृत्ये करण्यास प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या