Marathi Bible Reading |St. Kuriakose Chavara |Thursday 18th February 2021

प्रायश्चित्तकाळ

 गुरुवार 

१८ फेब्रुवारी  २०२१




(संत कुरीयाकोस चावरा)

परमेश्वर संधी सर्वांनाच देत असतो  व त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळण्यास सांगतो आहे. जीवन व सुख आणि मरण व दुःख, ही आज आपल्यापुढे  ठेवली आहेत. आपला देव परमेश्वर आपणाकडून त्याचा आज्ञा  पाळण्याची  आणि प्रीतिची  अपेक्षा करीत आहे.

आज प्रभू येशू आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवनाच्या मार्गावरून चालण्यासाठी येणाऱ्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवाहन करीत आहे.आपण त्याच्या कालवरीवरील वधस्तंभापर्यंत त्याची सोबत देण्यासाठी सहनशीलता, धैर्य व सामर्थ्य मागूया.

✝️

"जर कोणा एका मनुष्याने सगळे जग मिळवले आणि

 स्वत:ला गमावले किंवा स्वत:चा नाश करुन घेतला

 तर त्याला काय लाभ ?"

✝️

पहिले वाचन :अनुवाद  ३०:१५-२०

वाचक :अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन

"पाहा, आजचा दिवस मी आशीर्वाद आणि शाप  म्हणून ठरवतो."

मोशेने सर्व लोकांना बोलावले व त्यांना म्हटले,  पाहा, जीवन व मरण, हानी व लाभ ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत. मी तुला आज्ञा करीत आहे की, तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम ही पाळ, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि ज्या देशाचे वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुझे कल्याण करील. पण तुझे मन बदलून तू ऐकले नाहीस आणि बहकून अन्य देवाचे भजनपूजन केलेस तर मी तुला आज बजावून सांगतो की, तुझा खात्रीने नाश होईल. यार्देन उतरून जो देश तू वतन करुन घेण्यास जात आहेस तेथे तू चिरकाल राहणार नाहीस. आकाश आणि पृथ्वी ह्यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून आज मी सांगतो की, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप ही तुझ्यापुढे ठेवली आहेत. तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझा वंश जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर. त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा. कारण त्यातच तुझे जीवन आहे. त्यातच तुझी आयुर्वृद्धी आहे असे केल्याने जो देश देण्याविषयी परमेश्वराने तुझे पूर्वज आब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथपूर्वक वचन दिले आहे आणि त्यात तुझी वस्ती होईल."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र   १:१-४

प्रतिसाद : प्रभू वर विश्वास ठेवणारा आनंद पावतो.

१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही, पातक्याच्या वाऱ्याला उभा राहात नाही, किंवा देवनिंदकाच्या बैठकीत सामील होत नाही उलट जो प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो, त्याच्या धर्मशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य

२) वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते यथाकाळी त्याला बहर येतो. त्याची पाने कोमेजत नाहीत अशा झाडाजवळ तो असतो. तो हाती घेतो ते सर्व सफल होते.

३) पण दुर्जनांचे तसे मुळीच नाही ! वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते. परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.


जयघोष   

आज आपली हृदये कठीण करू नका. तर परमेश्वराचा आवाज ऐका.


शुभवर्तमान  लूक  ९:२२-२५

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक व शास्त्री ह्याच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे."
त्याने सर्वांना म्हटले, "जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने आत्मत्याग करावा व रोज स्वत:चा क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे.
जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील. जर कोणा एका मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वत:ला गमावले किंवा स्वत:चा नाश करुन घेतला तर त्याला काय लाभ ?"

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : येशूने शिष्यांना सांगितले, ज्या कोणाला माझ्या मागे यायचे असेल, त्याने प्रथम स्वतःला विसरून रोज स्वतःचा क्रूस उचलला पाहिजे. हे शब्द शिष्यांसाठी एखाद्या बॉम्ब स्फोटासारखे होते. हा येशूख्रिस्ताचा प्रामाणिकपणा वाखाणण्यासारखा होता, परंतु शिष्यांसाठी मात्र तो भ्रम निराश करणारा होता. कारण येशू रोमन साम्राज्य जिंकून घेईल आणि त्यांत त्यांचे सहभागित्व असेल या त्यांच्या स्वप्नाचे तुकडे तुकडे झाले. येशूख्रिस्ताचा गौरवाचा मार्ग कालवरी टेकडी आणि क्रुसाद्वारे जातो, हे त्यांना समजले नाही. येशूख्रिस्ताचे शिष्यत्व स्वीकारणाऱ्या सर्वांना याच मार्गावरून चालावे लागेल. आपण सर्व येशू ख्रिस्ताच्या गौरवात सहभागी होण्यास आतुर, उत्साही आहोत. परंतु कालवारी आणि क्रूसाला आपण भयंकर घाबरतो. हे देवा, आमच्या रोजच्या जीवनातील क्रूस धैर्याने आणि प्रेमाने उचलायला आम्हाला मदत कर.

प्रार्थना :हे प्रभू येशू, माझ्या जीवनातील सर्व प्रकारच्या वधस्तंभाचा स्वीकार करून तुला अनुसरण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या