Marathi Bible Reading | ASH WEDNESDAY 17th February 2021


 राखेचा बुधवार (प्रायश्चित्तकाळाला सुरुवात)

 । चाळीस दिवसाचा प्रायश्चित्तकाळ ।

देवाकडे परत येण्याचा काळ  ।

१७ फेब्रुवारी  २०२१



ख्रिस्तसभा आजपासून प्रायश्चित्त काळात प्रवेश करीत आहे. चौथ्या शतकापासून प्रायश्चित्त काळ साजरा केला जातो. साधारणतः (इस्टर) पुनरुत्थानापूर्वी ४० ते ४६ दिवसांचा हा काळ असतो. प्रायश्चित्त काळात ख्रिस्तसभा आपल्याला आपल्या पापी जीवनापासून परिवर्तन करण्यासाठी आवाहन करीत असते. ह्या काळात उपवास, प्रार्थना आणि दानधर्म करुन आपले धर्माचरण व ख्रिस्ती जीवनाचे पुनरुजीवन करण्यास आवाहन करण्यात येते.
    आज आपल्या सर्वांच्या कपाळावर राख लावून आपल्याला जाणीव करुन दिली|जात आहे की, आपण मर्त्य मानव आहोत. आपले जीवन मर्यादित व क्षणभंगूर आहे.|म्हणूनच सर्वस्वी देवाच्या दयेवर आणि कृपेवर आपल्याला विसंबून राहता यावे आणि| खरे ख्रिस्ती जीवन जगता यावे म्हणून येत्या चाळीस दिवसात आपण देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करुया.
✝️

"गुप्त धर्माचरण, गुप्त दानधर्म, गुप्त प्रार्थना."

✝️

पहिले वाचन : योएल  २:१२-१८

वाचक : योएल या पुस्तकातून घेतलेले वाचन  

"आपली वस्त्रे नव्हे, तर आपली हृदये फाडा."

लोकहो, आता तरी परमेश्वराचे वचन ऐका : "मनःपूर्वक माझ्याकडे वळा. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे, तर आपली हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटते. परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपणामागे आशीर्वाद ठेवून जाईल. त्याद्वारे तुम्हांला त्याला अन्नापर्ण व पेयार्पण करता येईल.
        सियोनत कर्णा वाजवा. उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा. पवित्र मेळा भरवा. लोकांना जमवा. मंडळी शुद्ध करा. वडिलांना जमवा. मुले, स्तनपान करणारी अर्भके यांनाही एकत्र करा. वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत. देवडी व वेदी यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करीत म्हणोत, "हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर, आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील. त्यांचा देव आता कोठे गेला असे राष्ट्रांनी का म्हणावे ?"
तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली. तो आपल्या लोकांविषयी कळवळला.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र  ५०:३-६,१२-१४.१७

प्रतिसाद :  हे प्रभो, आम्हांवर दया कर, कारण आम्ही पाप केले आहे.

१ हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेने अनुसरून माझे अपराध पुसून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर.

२ मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्याविरुद्ध मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.

३ हे देवा, माझ्याठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्याठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपणापुढून घालवून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस,

४ तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे. आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. प्रभो, माझे ओठ उघड, म्हणजे मी तुझी कीर्ती गाईन.


दुसरे वाचन

२ करिंथक ५:२०,६:२

पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"देवाबरोबर समेट करा.....पाहा, आताच समय अनुकूल आहे."

        बंधूजनहो, आम्ही देवाचे प्रतिनिधी आहो, देव आम्हांद्वारे विनंती करीत आहे. देवाबरोबर समेट करा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. यासाठी ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुम्हाआम्हांकरिता पाप असे केले. यासाठी की, आम्ही त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे. आम्ही त्याच्यासह कार्य करीत असता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये, तो म्हणतो : "अनुकूलसमयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले." पाहा, आताच समय अनुकूल आहे. आजच तारणाचा दिवस आहे.

हा प्रभूचा शब्द आहे


जयघोष   स्तोत्र  ५०:१२.१४

हे देवा, “माझ्याठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर आणि तुझ्या उद्धाराचा आनंद मला दे."



शुभवर्तमान 
मत्तय  ६:१-६,१६-१८

वाचक :  मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "गुप्त गोष्टी जाणणारा तुझा पिता तुला फळ देईल."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसजसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला सत्य सांगतो की, त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. तसेच जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका. कारण लोकांनी आपल्याला पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला नक्की सांगतो की, त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस, तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचे फळ देईल. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका. कारण आपण उपवास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विद्रूप करतात. मी तुम्हांला नक्की सांगतो की, त्यांना त्याचे प्रतिफळ मिळाले आहे. तू तर उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धू. तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : प्रायश्चित्तकाळ हा आध्यात्मिक वसंतऋतू मानला जातो. वसंतऋतूमध्ये पानगळ सुरू असते मात्र आतून नवा कोंभ आला तरच जुनी पाने गळून पडू शकतात. त्याचप्रमाणे आतून नवजीवनाचा कोंभ आला तर बाहेरील सर्व प्रकारच्या वाईट सवयी आपोआप गळून पडतात. त्यासाठी प्रायश्चित काळात तीन प्रकारचे नातेसंबंध सुधारण्यासाठी एक त्रिसूत्री सुचविली जाते. 
१) प्रार्थना : देवाशी असलेले नाते:- या जगातील जागतिक, शारीरिक व भौतिक गरजा भागवत असताना माणूस आपल्या आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष करू शकतो. त्यामुळे देवाशी असलेले नाते भक्कम करण्यासाठी ख्रिस्तसभा प्रायश्चित्तकाळात प्रार्थनेचे बरेच कार्यक्रम / उपक्रम हाती घेत असते. माणसाने स्वतःला वैयक्तिक प्रार्थनेची सवय लावली नाही तर कौटुंबिक किंवा सामुदायिक प्रार्थना ही त्याला निरस वाटू शकते. त्यासाठी प्रार्थनेची वेगळी वेळ मर्यादा, जागा व पद्धत निश्चित करणे गरजेचे असते. २) उपवास- स्वत:शी असलेले नाते मनुष्य जेव्हा उपवास करतो तेव्हा तो अंर्तमुख बनतो. केवळ डॉक्टरांनी सांगितले म्हणून डायट' करणे वेगळे, खायला मिळत नाही म्हणून 'उपासमार' घडणे वेगळे आणि उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून खाणे-पिणे टाळणे वेगळे. जग डायट' करते, समाजात 'उपासमार ' होते. चर्चमध्ये 'उपवास' केला जातो. राखेचा बुधवार आणि शुभ-शुक्रवार ह्या दोन्ही दिवशी कायद्याने उपवास करणे १८ ते ६० वर्ष दरम्यान वय असलेल्या ख्रिस्ती व्यक्तीला बंधनकारक असते. ज्यांना वैद्यकीय कारणास्तव उपवास करणे शक्य नसते त्यांनी किमान मांस तरी खाऊ नये. यावरून आपला स्वतःवर किती ताबा किंवा संयम आहे ते समजू शकते. 
३) दानधर्म - इतरांशी असलेले नातेः आपल्या हातात जो पैसा वा जी धनदौलत आहे त्याचा खरा मालक परमेश्वर आहे. आपण केवळ त्या संपत्तीचे राखणदार आहोत. ह्याचे भान ठेवून दानधर्म करण्याचे आवाहन खिस्त सभा या काळात भाविकांना करीत असते. त्याद्वारे आपल्या गरजेपेक्षा दुसऱ्या कोणाची तरी गरज अधिक मोठी असते असे आपण दाखवून देत असतो. आपल्या मौजमजेच्या काळात आपण गोरगरिबांची आठवण ठेवायला हवी. मात्र तसे करण्यात आपण कमी पडलो असू तर निदान या प्रायश्चित्तकाळात आपण त्यांचा विचार करावा असे ख्रिस्तसभा आपल्याला शिकविते.

आत्मपरीक्षण : ह्या प्रायश्चित्तकाळात देवाशी स्वतःशी व इतरांशी असलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी किंवा ते भक्कम करण्यासाठी मी कोणकोणत्या गोष्टी करणार आहे. चर्चच्या, समाजाच्या, कुटुंबाच्या कोणकोणत्या कार्यक्रामात सहभागी होणार आहे ?
मननासाठी शास्त्रवचनः 'आपली वस्त्रे  नव्हे तर आपली हृदये फाडा.' 'आत्ताच समय अनुकूल आहे आजच तारणाचा दिवस आहे. 'आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर.'

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, माझ्याठायी शुद्ध अंत:करण निर्माण कर, माझ्या जीवनाचे परिवर्तन कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या