Marathi Bible Reading | Tuesday 16th Feb 2021 | Feast of St. Onesimus

सामान्य काळ


मंगळवार 


१६ फेब्रुवारी  २०२१


संत ओनेसिमसचा सण 

(- रक्तसाक्षी (... ९०)

बायबलच्या नव्या करारात पौलचे फिलेमोनला पत्र नावाचे एक छोटेसे (एक पानाचे) पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या उगमाविषयीची घटना संत ओनेसिमस ह्याच्या जीवनाशी संबंधित आहे.

कलस्सै येथील फिलेमोन नावाच्या एका श्रीमंत मनुष्याच्या घरी ओनेसिमस नावाचा एक अख्रिस्ती गुलाम कार्य करीत होता. एकदा त्याच्या हातून काहीशी चूक घडली. शिक्षा होण्याच्या भीतीने ओनेसिमस आपल्या मालकाला न विचारता घरातून पळून गेला. नेमका त्याचवेळी (संत) पौल रोममध्ये आपला पहिला तुरूंगवास भोगत होता. परंतु त्याला नजरकैदेत भेटण्याची खास मुभा देण्यात आली होती. ओनेसिमस आपल्या मनातील भीतीने थरथरत ह्या प्रेषिताच्या भेटीला गेला आणि त्याचवेळी त्याला जणू परिसस्पर्श झाला. त्याची विचारसरणी व जीवनपद्धती तात्काळ बदलून गेली. ओनेसिमसला आपल्या सोबतच ठेवून घेण्याचा संत पौलला मोह झाला. परंतु पहिल्या प्रथम ज्या मालकाला तो फसवून आलेला आहे त्याच्याशी समेट करणे आवश्यक होते. त्यामुळे त्याने फिलेमोनला पत्र लिहिले व ओनेसिमस ह्याला कलस्सै येथे पाठविले.

ह्या पत्रामध्ये ओनेसिमस ह्याला केवळ गुलाम म्हणूनच नव्हे तर ख्रिस्ताठायी बंधू म्हणून फिलेमोनने स्वीकारावे त्याने तात्काळ ओनेसिमस ह्याला क्षमा केली व गुलामगिरीतून मुक्त केले. इतकेच नव्हे तर पुन्हा रोम शहरात जाण्यासाठी आवश्यक ती मदतही पुरविली.
काहीकाळ पौलला त्याने तिथे मदत केली आणि नंतर तो पूर्वेकडे निघून गेला. तेथील मासेदोनिया शहरातील बेरोय्या धर्मप्रांताचा बिशप म्हणून ओनेसिमस ह्याने धडाडीने कार्य केल्याचे ख्रिस्ती धर्मपरंपरा मानते.

✝️

"तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता? "

✝️

पहिले वाचन :उत्पत्ती  ६:५ -८;७:१-५.१०

वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन."

पृथ्वीवर मानवांचा दुष्टपणा फार आहे, त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, "मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशू, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन; कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे." परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती.

मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटूंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. सर्व शुद्ध पशूंपैकी नरमाद्या सात सात आणि अशुद्ध पशूंपैकी दोन दोन आणि आकाशातील पक्ष्यांपैकी नरमाद्या सात सात बरोबर घे, अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील. अजून सात दिवसांचा अवकाश आहे, मग मी चाळीस दिवस आणि चाळीस रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडीन आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करीन.” तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. सात दिवसांनंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र २९:१-४, १०

प्रतिसाद :  परमेश्वर आपल्या लोकांना शांती वरदान देईल.

१. अहो दिव्यदूतहो, परमेश्वराला श्रेय द्या, परमेश्वराला गौरव आणि सामर्थ्य ह्यांचे श्रेय द्या, परमेश्वराला त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या, पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.  

२ परमेश्वराचा ध्वनी जलामधून चढत आहे, परमेश्वर जलाशयांवर आहे; परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे, परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे.

३ प्रतापशाली देव गर्जना करीत आहे त्याच्या मंदिरात सर्वत्र महिमा! महिमा! असा ध्वनी दुमदुमतो. परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो, परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

हे प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंत:करण प्रफुल्लित कर.

आलेलूया !


शुभवर्तमान मार्क : ८:१४-२१

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा."

शिष्य भाकरी घ्यावयास विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकरी होती. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले, "सांभाळा, परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा." तेव्हा "आपल्याजवळ भाकरी नाहीत" अशी ते आपसांत चर्चा करू लागले. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, "तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही आणि समजतही नाही काय? तुमचे अंत:करण कठीण झाले आहे काय ? डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय? कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय? तुम्हाला आठवत नाही काय ? मी पाच  हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?" ते त्याला म्हणाले, "बारा." "तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?" ते म्हणाले, "सात." तेव्हा तो त्यांना म्हणाला, "अजून तुम्हाला समजत नाही काय?"

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : शंकाखोर वृत्तीच्या यहुदी धार्मिक पुढाऱ्यांविषयी येशू आपल्या शिष्यांना सावध करीत आहे. चमत्कार व अद्भुत चिन्ह पहिल्यावाचून ते येशूच्या वचनावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. येशू शिष्यांना सांगत आहे की त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या भाकरीच्या चमत्कारावर चिंतन करावे. येशू हाच भाविक जनांना स्वर्गीय जीवनाकडे नेणारा मार्ग आहे हे त्यांनी समजून घ्यावे व ख्रिस्तावरील श्रद्धेत दृढ व्हावे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, सर्व अनिष्टांपासून आमचे रक्षण कर व तुझ्या वचनानुसार जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या