Marathi Bible Reading |Monday 15th Feb 2021 | Feast of St. Fostinus & St. Joevita

 सामान्य काळ 


सोमवार 


१५ फेब्रुवारी  २०२१


संत फॉस्टीनस आणि संत ज्योविता ह्यांचा सण 

संत फॉस्टीनस आणि संत ज्योविता हे ब्रेसिया शहराचे मुख्य आश्रयदाते मानले जातात. त्यांची नावे आश्रयदात्यांच्या व रक्तसाक्षी संतांच्या बऱ्याच यादयात सांपडतात.

प्रभू येशू  अंधांना दृष्टी, भुकेल्यांस अन्न ,बहिऱ्यांना कान, मुक्यांना वाचा आणि रोग्यांना आरोग्य देऊन प्रभूने त्याचे दैवी  सामर्थ्य प्रकट केले. तरी सुद्धा कठोर अंत:करण आणि संशयी वृत्तीने वागणाऱ्या परुश्यांनी प्रभूकडे चिन्हाची माणगी केली. प्रभू येशूला खोटे ठरवून त्याची जनमानसातील प्रतिमा डागाळण्याचा परुश्यांनी प्रयत्न केला.

 परुश्यांप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा उणीवा असतील तर त्यासाठी संत याकोब म्हणतो त्याप्रमाणे आपण देवाजवळ ज्ञान आणि शहाणपण मागावे. विशेषतः प्रभूला व त्याच्या सामर्थ्याला जाणण्यासाठी श्रद्धेचे दान मागावे. आपण आज आपल्यातील उणीवा व दोष ह्यांची यादी करुन त्यावर चिंतन करू या. देवाचे वचन व देवाची दया  महान आहे. येशूला ओळखण्यासाठी त्याचे सामर्थ्य जाणण्यासाठी व त्याच्या योजना समजण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची कृपा मागुया .

✝️

"ही पिढी चिन्ह का मागते ?"

✝️

पहिले वाचन :उत्पत्ती  ४:१-१५,२५

वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"काइनने आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून जाऊन त्यास ठार केले."

आदामने आपली स्त्री एवा हिला जाणले, ती गर्भवती होऊन तिने काइनला जन्म दिला. ती म्हणाली, "परमेश्वराच्या साहाय्याने मला पुत्रसंतान लाभले आहे." नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला आणि काइन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काइनने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलनेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, म्हणजे त्यातल्या पुष्ट मेंढरांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काइन आणि त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काइन संतापला आणि त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काइनला म्हणाला, "तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले ? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुझ्यावर आहे, याकरिता तू पापाला सत्तेखाली ठेव." एके दिवशी काइन आपल्या भावाला म्हणाला, "चल, आपण शेतात जाऊ. त्याप्रमाणे ते शेतात असता काइनने आपला भाऊ हाबेल याच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. मग परमेश्वराने काइनला विचारले, "तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?" तो म्हणाला, "मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे ?" परमेश्वर म्हणाला, "तू हे काय केले ? ऐक. तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे. तू जमिनीत मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा आणि भटकणारा होशील." तेव्हा काइन परमेश्वराला म्हणाला, "ही माझी शिक्षा मला सोसावणार नाही इतकी भारी आहे. पाहा, ह्या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टिआड लपलेला असेन, मी पृथ्वीवर परागंदा आणि भटकणारा होईन आणि ज्या कोणाला मी सापडेन तो मला ठार करील." परमेश्वर त्यास म्हणाला, "तर मग जो कोणी काइनला ठार मारील त्याचा सातपट सूड घेण्यास येईल" आणि काइन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खूण नेमून दिली. आदामने आपल्या बायकोला पुन्हा जाणले आणि तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने शेथ ठेवले. ती म्हणाली, “काइनने, हाबेलचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे."

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र ५०:१,८,१६-१७,२०-२१

प्रतिसाद :  देवाला आभार रूपी यज्ञ कर. 

१ देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे. "तुझ्या यज्ञासंबंधाने तर मी तुला बोलावीत नाही, तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच."

२ "माझे नियम विदित करणारा तू कोण ? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण? तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, माझी वचने मागे झुगारून देतोस.'

३ "तू आपल्या भावाविरूद्ध बोलत बसतोस, तू आपल्या सख्ख्या भावाची चहाडी करतोस. असे तू केले तरी मी गप्प कसा बसू ? मी तुझ्यासारखाच आहे असे तुला वाटले काय?


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे,कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.

आलेलूया !


शुभवर्तमान मार्क : ८:११-१३

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

        परुशी येऊन येशूशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या अंत:करणात विव्हळ होऊन म्हणाला, "ही पिढी चिन्ह का मागते ? मी तुम्हास खचित सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही." नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन : असे कोणीच आंधळे नाहीत, जे पाहू शकत नाहीत. अशी एक सुप्रसिद्ध म्हण आहे. याचा अर्थ असा आहे की, एखाद्या माणसाने एवाद्या दिशेने आपले मन केंद्रित केले असेल, तर त्याला समजावणे महाकठीण व अशक्य आहे. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत परुशांची अशीच मनस्थिती झाली होती. जेव्हा ते त्याच्याकडे गेले आणि स्वर्गातील एखादे चिन्ह मागू लागले, तेव्हा येशू ख्रिस्त हा खोटा वा फसवा आहे, अशी त्यांची पक्की समज होती. त्याला खोटे ठरविणे हाच परुशांचा अंतस्थ हेतू होता. अशाप्रकारे येशूचा अधिकार नष्ट करून, त्याला अपमानित करून, त्याला मिळणारा लोकांचा वाढता पाठिंबा आणि प्रसिद्धी त्यांना थांबवायची होती. म्हणूनच जरी परुशांनी, येशूख्रिस्ताला नेत्रदीपक शक्ती प्रदर्शन करताना पाहिले असते तरी अशा श्रद्धेचे काय मूल्य असते ? ती मनापासून दिलेली मानवंदना वा मुजरा न ठरता, जुलुमी राजाकडे गरीब, भयभीत गुलामाने केलेली दया याचना ठरली असती. देवाला आपल्या स्वातंत्र्याचा संपूर्ण आदर करायचा आहे. दुसऱ्याच्या तालावर नाचणाऱ्या कठपुतळ्या नकोत. त्याला सुपुत्र आणि सुकन्या पाहिजेत.

प्रार्थना : हे ज्ञानाचा उगमा, सर्व समर्थ परमेश्वरा, आमची अंत:करणे नम्र बनव,आमच्यातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा कर व कृपेचा प्रकाश बहाल कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या