Marathi Bible Reading | Sixth Sunday In Ordinary Time 14th Feb 2021

सामान्य काळ 

६ वा  रविवार


१४ फेब्रुवारी  २०२१

येशू ख्रिस्त हा तारणारा व मुक्तीदाता आहे व तो आपल्याला नवजीवन देऊ शकतो, ह्या विश्वासाने  कुष्ठरोगी  माणसाने येशूकडे प्रार्थना केली, आणि तो बरा झाला.  मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात.' प्रभूच्या दयेवर, शक्ती सामर्थ्यावर त्याचा विश्वास होताच पण त्याने प्रभूच्या इच्छेला प्राधान्य दिले. प्रभू येशूने त्याचा विश्वास पाहून व त्याची शरणागती ओळखून त्याला  स्पर्श केला  त्याच्या इच्छेने तो कुष्ठरोगी बरा झाला. आपण पश्चाताप केल्यावर  जीवनातसुद्धा चमत्कारी परिवर्तन घडू शकते.  आपल्या  विनंत्या  व सर्वकाही परमेश्वराठायी समर्पित करुन त्याच्या सामर्थ्याशाली इच्छेवर सोपवूनआपल्या जीवनावर चिंतन करु या. 

अनेक माणसांना देवाचा स्पर्श व्हावा आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडावे म्हणून आपल्या प्रार्थनेची गरज आहे.  आपण एकमेकांसाठी प्रार्थना करू या. 


✝️

"माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो." तेव्हा लगेच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो शुद्ध झाला.

✝️

पहिले वाचन :लेवीय  १३:१-२.४४-४६

वाचक : लेवीय या पुस्तकातून घेतलेले वाचन

परमेश्वराने मोशे आणि अहरोन ह्यांस सांगितले: "एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल आणि तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या यजक पुत्रांपैकी एकाकडे न्यावे.
ज्या महारोग्याच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावे. त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावे, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि 'अशुद्ध, अशुद्ध' असे ओरडत जावे. जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र   ३२:१-२,५,११

प्रतिसाद :     प्रभो, तू माझे आश्रयस्थान आहेस;  तू संकटापासून माझे रक्षण करशील.

१) ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य ! ज्याच्या हिशेबी परमेश्वर अधर्माचा दोष लावीत नाही आणि ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!

२) मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; आपला अधर्म मी लपवून ठेवला नाही. "मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन" असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.

३) अहो धार्मिकहो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा; अहो सरळ मनाचे जनहो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा.


दुसरे वाचन : पौलचे १ करिंथ १०:३१-११:१

वाचक :  पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. यहुदी, हेल्लेणी आणि देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळविणारे होऊ नका. तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांना संतोषवितो आणि त्याचे तारण व्हावे म्हणून स्वत:चे हित न पाहता पुष्कळजणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा. जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद

जयघोष

आलेलूया, आलेलूया !

प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे.ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.

आलेलूया !


शुभवर्तमान : मार्क : १:४०-४५

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  


        एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, "आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा." तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, "माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो." तेव्हा लगेच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला सक्त ताकीद देऊन लगेच पाठवून दिले आणि सांगितले, "पाहा, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन स्वत:स याजकाला दाखव आणि त्याला प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर." पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यात राहिला. तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन :प्रेमाच्या सागराला संयमाचा किनारा नसला तर स्वैराचाराचे वादळ होऊन ते अनैतिकतेच्या प्रांगणात कधी शिरेल हे सांगता येत नाही. यहूदी समाजात देवप्रीती व शेजारप्रीती जोपासण्याच्या म्हणजेच शुद्ध-अशुद्धते संदर्भात काही कठोर कायदेकानून होते. त्यांचे विभाजन तीन भागात करता येईल. 
१) शारीरिक पातळी : लेवीयच्या पुस्तकात शारीरिक शुद्धते विषयी काही नियम देण्यात आलेले होते. एखादा त्वचारोग झाला तर त्याचासंबंध व्यक्तीच्या धार्मिक जीवनातील अशुद्धतेसी लावला जाई. त्यामुळे अशा व्यक्तीने याजकाची भेट घ्यावी, याजकाने तपासल्यानंतर त्याला लोकसमुदायापासून अलग केले जाई. तो बरा झाल्यानंतरही याजकाने तपासून त्यानंतर त्याने मंदिरात अर्पण आणावे व रीतसर सामुदायिक उपासनेत सहभागी व्हावे असा नियम होता. 
२) धार्मिक पातळी: धार्मिक पातळीवर काही प्रकारचे अन्न निषिद्ध मानले जायचे. असे अन्न सेवन करणारा अशुद्ध मानला जायचा. येशूने मात्र जे बाहेरून आत जाते ते नव्हे तर ते आतून बाहेर येते ते माणसाला भ्रष्ट करते अशी क्रांतीकारी शिकवण दिली. पेत्राला झालेल्या दृष्टान्तात सर्वप्रकारचे प्राणी व पक्षी खाण्याची आज्ञा करण्यात आलेली होती. 
३) सामाजिक पातळी: आजच्या शुभवर्तमानात येशू एका कुष्ठरोग्याला बरे करताना दिसतो शारीरिक पातळीवरील जखम बरी करताना दिसतो. शारीरिक पातळीवरील अशुद्धतेविषयीचे सर्व नियम तो बाजूला सारतो. तो कुष्ठरोग्याला स्पर्श करतो, त्याची इच्छा पूर्ण करतो आणि कुष्ठरोग्याला सन्मानाने जीवन जगण्यासाठी समाजात आणतो. सामाजिक पातळीवर अशुद्ध ठरविण्यात आलेल्या व्यक्तीच्या गरजा काय असतात ते कुष्ठरोग्याच्या कृतींवरून दिसून येते तो येशू समोर गुडघे टेकतो (श्रद्धा), तो विनंती करतो (बरे होण्याची इच्छा). तो सर्वत्र सुवार्ता पसरवितो (विचारांची देवाण घेवाण करण्याची गरज)
आत्मपरीक्षण : आपल्या समाजात व धर्मात शुद्ध-अशुद्धतेविषयी कोणकोणते नियम आहेत ? आध्यात्मिक दृष्ट्या आपण कोणाकोणाला अस्पृश्य समजून त्यांना आपल्यापासून दूर ठेवतो? आपल्या वैयक्तिक जीवनात कोणकोणत्या प्रकारची अशुद्धता आहे ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या कृपेचा स्पर्श आम्हाला व्हावा आणि आमचे जीवन परिवर्तन व्हावे म्हणून तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला धैर्य व प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या