सामान्य काळ
शनिवार
१३ फेब्रुवारी २०२१
संत कॅथरीन डि रिक्की सण
(कुमारिका)
प्रभू येशूला अनुसरणाऱ्या रंजल्या गांजल्या व प्रेमासाठी आसुसलेल्या लोकांची काळजी होती. म्हणूनच तर येशूने असे अनेक चमत्कार करून त्यांची भूक भागविली व आपले सामर्थ्यशाली प्रकटीकरण केले आहे. प्रभू येशूने केवळ शारीरिक नव्हे तर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांची आध्यात्मिक भूक भागविली. आणि मनाची व अत:करणाची तृप्तता त्यांना लाभली. परमेश्वर सर्वांना त्याच्या स्वर्गीय भोजनात सहभागी होण्यास बोलवित असतो.
देवाच्या आशीर्वादाने माणसांच्या सर्व गरजा पूर्ण होतात. ह्या चमत्काराचे खरे पूर्णत्व पवित्र ख्रिस्त शरीर साक्रांमेंतात झाले आहे. प्रभूने म्हटलेच आहे, 'मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागत नाही (याहोन ६-३५). आपली भूक शमविणारा, तहान भागविणारा व आपल्या गरजा, आकांक्षा व इच्छा तृप्त करणाऱ्या प्रभूच्या राजासनाजवळ मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होऊ या.
✝️
"मला ह्या लोकांचा कळवळा येतो,
✝️
पहिले वाचन :उत्पत्ती:३:९-२४
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वर देवाने आदामला हाक मारून म्हटले, "तू कोठे आहेस?" तो म्हणाला, "मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो." देवाने म्हटले, "तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले ? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय?" आदाम म्हणाला, "जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले." परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, "हे तू काय केलेस?" स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले." तेव्हा परमेश्वर देव त्या सर्पाला म्हणाला,
"तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशू आणि वनचर यापेक्षा तू शापग्रस्त आहेस. तू पोटाने चालशील, आयुष्यभर माती खाशील आणि तू आणि स्त्री, तुझी संतती आणी तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके ठेचील आणि तू तिची टाच फोडशील." नंतर देव स्त्रीला म्हणाला,
"तुझ्या प्रसूतिकाळात मी तुझे क्लेश आणि दु:ख वाढवीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील."
देव आदामला म्हणाला, "तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि 'ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्या झाडाचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील, ती तुला काटे आणि कुसळे देईल, तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील आणि अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील. कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील"
आदामने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. परमेश्वर देवाने आदाम आणि त्याची स्त्री यांसाठी चर्मवस्त्रे करून त्यांना घातली. मग परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातला एकासमान झाला आहे; तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल आणि सर्वकाळ जिवंत राहील." यास्तव ज्या जमिनीतून त्यांना उत्पन्न केले होते, तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यांना एदेन बागेतून बाहेर काढले. देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम आणि गरगर फिरणारी ज्वालारूपी तरवार ठेवली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद : स्तोत्र ९०:२-६,१२-१३
प्रतिसाद : हे प्रभो, तू पिढ्यान्पिढ्या आमचे निवासस्थान आहेस.
१) पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, तू पृथ्वी आणि जग ही निर्माण केली त्यापूर्वीच अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत तू देव आहेस.
२) तू मनुष्याला पुन्हा मातीला मिळवतोस आणि म्हणतोस, अहो मानवांनो, परत जा. कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
३) तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस, ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत. सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत; सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते.
४). ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की, आम्हांला सुज्ञ अंत:करण प्राप्त होईल. हे परमेश्वरा, परत फीर; किती वेळ लावशील ? तू आपल्या सेवकांवर करुणा कर.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही
आलेलूया !
शुभवर्तमान : मार्क : ८:१-१०
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता आणि त्यांच्याजवळ खायला काही नव्हते, म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले, "मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काही नाही; मी त्यांना उपाशी घरी पाठवून दिले तर ते वाटेने कासावीस होतील, त्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत." त्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, "येथे अरण्यात ते तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्या?" त्याने त्यांना विचारले, “तुम्हांजवळ किती भाकरी आहेत?" ते म्हणाले, "सात." नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसावयास सांगितले, त्या सात भाकरी घेतल्या आणि उपकारस्तुती करून त्या मोडल्या आणि वाढण्याकरिता आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि त्यांनी लोकांना वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते, त्यांना त्यांनी आशीर्वाद देऊन तेही वाढायला सांगितले. ते जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या त्यांनी भरून घेतल्या. तेथे सुमारे चार हजार लोक होते. मग त्याने त्यांना निरोप दिला. नंतर लगेच तो आपल्या शिष्यांसह मचव्यात बसून दल्मनुथा प्रांतात आला.
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन :आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की भाकर व मासे यांना बहुगुणीत करून, येशूने चमत्कार केला. त्यामागचे उद्दिष्ट जमलेल्या लोकांची शरीरिक भूक भागवणे हे होते. भुकेलेल्या जमावाला भाकरीद्वारे तृप्त करून येशूने शेवटच्या भोजनावेळी करणार असलेल्या आंतरिक तृप्तीचा संकेत दिला. मी जीवनाची भाकर आहे हे येशूचे शब्द या शाश्वत सत्याची आम्हाला आठवण करून देतात. प्रभू भोजनाच्या अतिपवित्र रहस्यात सहभागी होऊन खऱ्या अर्थाने तृप्त होऊ या.
प्रार्थना :हे जीवनादात्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुजवर प्रेम करुन तुझ्या स्वर्गीय भोजनात सहभागी होण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या