सामान्य काळ
शुक्रवार
१२ फेब्रुवारी २०२१
संत गौडेन्शिअस
(महागुरू, वर्तनसाक्षी)
प्रभू येशू, जो वैद्यांचा वैद्य व डॉक्टरांचा डॉक्टर आहे तो सर्वांसाठी आरोग्यदान व आध्यत्मिक दान देण्यास तयार आहे. सर्वांना प्रभू बंधमुक्त करु इच्छित आहे. आपण त्याच्या सहवासात जाऊन श्रद्धेने त्याची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करून आपण त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करण्याचा निर्धार करु या व जीवनातील सर्व प्रकारच्या बंधनातून मोकळे होऊ या.
✝️
"त्याचे कान मोकळे झाले आणि त्याच्या जिभेचा
बंद लागलीच सुटून तो स्पष्ट बोलू लागला."
✝️
पहिले वाचन :उत्पत्ती:३:१-८
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, "तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांला सांगितले हे खरे काय?" स्त्रीने सर्पाला म्हटले, "बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की, ' ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, "तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणून व्हाल." त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही दिले आणि त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यांना कळून आले, तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपल्यासाठी कटिवेष्टने केली.
यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांना ऐकू आला, तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम आणि त्याची स्त्री बागेतील झाडांमध्ये लपली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद : स्तोत्र ३२:१-२,५-७
प्रतिसाद : ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, तो धन्य!
१) ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे, तो धन्य! ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावीत नाही आणि ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!
२) मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली.
३) ह्यासाठी प्रत्येक भक्ताने वेळीच तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहेस; तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलूया !
शुभवर्तमान : मार्क : ७:३१-३७
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशु सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनवरून दकापलीस प्रांतामधून गालील समुद्राकडे परत आला. तेव्हा लोकांनी एका बहिऱ्या-तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण ह्याच्यावर हात ठेवावा अशी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली आणि थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने नि:श्वास सोडला आणि म्हटले, "इफ्फाथा," म्हणजे "मोकळा हो." तेव्हा त्याचे कान मोकळे झाले आणि त्याच्या जिभेचा बंद लागलीच सुटून तो स्पष्ट बोलू लागला. तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले, परंतु तो त्यांना जसेजसे सांगत गेला तसेतसे ते अधिकच जाहीर करीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले, "त्याने सर्वकाही चांगले केले आहे, हा बहिऱ्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन :संत मार्कच्या शुभवर्तमानातील एका बहिऱ्या व मुक्याचा संदर्भ यशया भविष्यवाद्याने वर्तविलेल्या, 'आंधळयाचे डोळे उघडतील, बहिऱ्यांचे कान उघडतील, लंगडाही हरिणासारखा उड्या मारील, मुका आनंदाने गीत गाईल', या संदेशाची आठवण करून देतो आहे. (यशया ३५:५-६) यशयाचे सर्व दैवी संकेत हे परकीय भूमीत हद्दपारीत असलेल्या इस्राएली लोकांच्या सुटकेच्या याचनेला उद्देशून आहेत. भविष्यवाद्यांनी घोषित केलेले दैवी तारण नव्या करारात ख्रिस्ताठायी साकार झाली आहे. प्रभू येशू, तुझे अद्भूत कार्य पाहण्यासाठी आमचे डोळे उघड.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या कृपेच्या सहवासात येण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमचे जीवन बंधमुक्त कर, आमेन.
0 टिप्पण्या