Marathi Bible Reading | Thursday 11th Feb 2021 | Feast of Our Lady Of Lourdes

सामान्य काळ

गुरुवार 

११ फेब्रुवारी  २०२१




लुर्डस् मातेचा सण 

लुर्डस् येथील आरोग्यदायी माऊलीचा सण

जागतिक रुग्ण दिन 

परमेश्वर पित्याचे मानववरील प्रेम हे मातेसमान असल्याचे सांगण्यात आलेले आहे.  'जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करिते तसे मी तुमचे सांत्वन करीन.' आईचे  प्रेम म्हणजे एक अद्वितीय संबंधाचे प्रेम आहे.
ख्रिस्तसभा आज लुर्डस् मातेचा सन्मानदिन साजरा करीत आहे. काना गावातील लग्नासमयी मरियेची भूमिका अखिल मानवावरील प्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. अडचणीत आलेल्या घरधन्याच्या  मदतीला धावणारी  पवित्र मरिया मातेने  तिच्या पुत्रापाशी विनंती केली आणि कानागावी पाण्याचा द्राक्षरस झाला. पवित्र मरिया माता आपल्या सर्वांची आई आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण सर्वजण आध्यात्मिक दृष्ट्या मरिया मातेची मुले आहोत. परमेश्वराने मातेच्या प्रेमाचा अनुभव पवित्र मरियेद्वारे आपल्याला दिला आहे. 
 पवित्र मरिया म्हणते, "(प्रभू येशू) हा तुम्हाला जे सांगले ते करा.' 
प्रभू येशूची शिकवण, वचने व आज्ञा आपण आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपण पवित्र मरिये जवळ गेल्यावर ती आपल्याला येशूकडे जाण्यास सांगते. आपण मरिया माता सांगते त्याप्रमाणे येशू जवळ जाऊ या. त्याची आज्ञा व वचने पाळू या. 
गरजवंतांच्या सहायाला धावून जाणाऱ्या मरिया मातेचा आदर्श समारे ठेवू या. पवित्र जपमाळेचा संदेश आपल्या जीवनात उतरवू या आणि आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक प्रार्थनेत जपमाळेच्या प्रार्थनेला प्राधान्य देऊ या. गरजवंतांच्या सहायाला धावून मरियेमातेचा सन्मान करू या. 

✝️

"यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या

 स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एकदेह होतील."

✝️

पहिले वाचन :उत्पत्ती:२:१८-२५

वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 

परमेश्वर देव बोलला, "मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्यांच्यासाठी अनुरूप मदतनीस मी करीन." परमेश्वर देवाने सर्व वनपशू आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले, तेव्हा आदामने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामने सर्व ग्रामपशू, आकाशातील पक्षी आणि सर्व वनपशू यांना नावे दिली; पण आदामला कोणी अनुरूप मदतनीस मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला,

"आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे; हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे." यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एकदेह होतील. आदाम आणि त्याची स्त्री ही दोघे नग्न होती, तरी त्यांना संकोच वाटत नसे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद : स्तोत्र  १२८:१,२-३,४-५

प्रतिसाद :जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो  तो धन्य !

१) जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य !


२) तू आपल्या श्रमाचे फळ खाशील; तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल, तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील. 


३)पाहा, परमेश्वराचे भय धरणाच्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनतून तुला तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस आशीर्वाद देवो!


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

जे देवाचे वचन ऐकतात, सालस आणि चांगल्या अंत:करणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात ते धन्य होत.

आलेलूया !


शुभवर्तमान : मार्क : ७:२४-३०

वाचक :  मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

गनेसरेत येथून निघून येशू सोर प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले आणि ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेल्लेणी असून सुरफूनीकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली "माझ्या मुलीतून भूत काढा." तो तिला म्हणाला, "मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही." यावर तिने उत्तर दिले, "खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात." तो तिला म्हणाला, "तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे." मग ती आपल्या घरी गेली, तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे आणि भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.

प्रभूचे हे शुभवर्तमान...

सर्व :  हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.  


चिंतन :आज लुर्डस् येथील आरोग्यदायी माऊलीचा सण साजरा होत आहे. मेसाबिएल नामक गुहेच्या बाजुला पवित्र मरियेच्या दर्शनावेळी बेर्नाडेट या गरीब मुलीच्या करवी माऊलीने आरोग्यदायी पाण्याचा झरा वाहता केला. त्या पाण्याच्या स्पर्शाने आजवर असंख्य भाविकांना आरोग्याचा लाभ झाला आहे. लुर्डसची माता ही अत्यंत प्रेमळ व संवेदनशील माऊली मानली जाते.  काना गावचा प्रसंग वेळी लग्नमंडपातला द्राक्षारस संपला तेव्हा तिने येशूला विनंती केली. तिच्या मध्यस्थीला मान देऊन, हा चमत्कार घडून आला. आशा निराशेच्या गर्तेत सापडलेल्या भाविकांना आजही मरियेच्या मध्यस्थीचा लाभ होत आहे. आज असंख्य भाविक माऊलीचा धाव करीत आहेत . निरनिराळ्या तीर्थक्षेत्राला भेट देत आपल्या मनोकामना मरीयेचा पायाशी ठेऊन कृपेचा अनुभव घेत आहेत आपणही तिच्यापाशी जाऊन निरोगी व निरामय जीवनाची मागणी करू या.

प्रार्थना :हे पवित्र मरिया माते, आम्हाला गरजवंताना सहायता करण्यास प्रेरणा दे व आम्हासाठी प्रभूपाशी विनंती कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या