आकाश आणि पृथ्वी यांची ज्या दिवशी उत्पत्ती झाली, म्हणजे परमेश्वर देवाने आकाश आणि पृथ्वी ही केली त्या काळचा उत्पत्तिक्रम हा होय. शेतातले कोणतेही उद्भिज अद्यापि पृथ्वीवर नव्हते. शेतातली कोणतीही वनस्पती अद्यापि उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमीनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता; मात्र जमिनीवरून धुके वर जात असे आणि त्याने भूमीच्या सर्व पृष्ठभागाचे सिंचन होत असे. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला आणि त्याच्या नाकपुड्यात प्राणवायू फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणि झाला. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली आणि तिच्यामध्ये आपण घडवलेला मनुष्य ठेवला. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर आणि स्वादिष्ट फळे देणारी अशी सर्व जातींची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनवृक्ष आणि बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष ही जमिनीतून उगविली.
परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत आणि राखण करण्यास ठेवले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामला आज्ञा दिली "बागेतील वाटेल त्या झाडाची फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील."
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद : स्तोत्र १०४:१-२,२७-३०
प्रतिसाद : प्रतिसाद : हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे!
१) हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे!
हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस, तू प्रताप आणि महिमा ह्यांनी मंडित आहेस; तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस.
२) तू त्यांना यथाकाली भक्ष्य देशील म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात. जे तू त्यांना घालतोस ते ते घेतात, तू आपली मूठ उघडतोस तेव्हा उत्तम पदार्थांनी त्यांची तृप्ती होते.
३) तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकूळ होतात, तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरून मातीस मिळतात. तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात; तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.
आलेलूया !
शुभवर्तमान :मार्क ७:१४-२३
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, "तुम्ही सर्वजण माझे ऐका आणि समजून घ्या; बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते.” तो लोकसमुदायातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, “तुम्हीदेखील इतके अज्ञानी आहा की काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंत:करणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते आणि शौचातून बाहेर पडते." (अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरवले.) आणखी तो म्हणाला, "जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरता, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला भ्रष्ट करतात."
प्रभूचे हे शुभवर्तमान...
सर्व : हे ख्रिस्त तुझी स्तुती असो.
चिंतन : उत्पत्तीच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात, म्हटले आहे की देवाने माणसाला स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे बनवले, आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टीचा अधिकार दिला. याचाच अर्थ म्हणजे सृष्टीची काळजी घेणे व रक्षण करणे. सृष्टीचा मालक होणे नाही. कारण संपूर्ण सृष्टीवर देवाचा अधिकार आहे. तोच खरा मालक आहे. याबाबत आत्मपरीक्षण करून पर्यावरणाची योग्य ती काळजी घ्यावी व त्याद्वारे देवाचा गौरव करावा.
प्रार्थना :हे प्रभू येशू ख्रिस्ता, सर्वदा तुझी स्तुति करण्यास व अंतर्यामी निर्मळ बनण्यास आमचे विचार, कल्पकता व कृती ह्यामध्ये पवित्र आत्म्याची प्रेरणा लाभू दे,आमेन.