सामान्यकाळातील नववा सप्ताह

शनिवार 

५ जून २०२१

✝️


संत बॉनिफस
- महागुरु, रक्तसाक्षी, (६७३-७५५)

संत बॉनिफेस ह्यांना “जर्मनीचा पॉल” अशा नावाने संबोधिले जाते. तो 'शिंप्यांचा आश्रयदाता संत' मानला जातो.

आपण मुक्या कुत्र्यांप्रमाणे नसावे. लांडग्याला पाहून पळणाऱ्या भेकडा प्रमाणेही नसावे तर अहोरात्र जागृत राहून चातुर्याने सैतानापासून आपला बचाव करीत रहावे.-संत बॉनिफेस




"सर्वांपेक्षा गरीब विधवेने भांडारात अधिक टाकले. "

आजच्या पहिल्या वाचनात सांगितले आहे. 'आराधनेला उपवासाचा, दानधर्माचा आणि नीतिचा आधार असणे अप्रतीम', 'सोन्याचा साठा करणे त्यापेक्षा दानधर्म करणे अधिक चांगले', 'दानधर्मामुळे सारी पापे धुवून निघतात.' त्याच बरोबर परोपकार करणाऱ्यांना जीवनाची परिपूर्णता लाभते.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू शिष्यांसमोर जिंवत उदाहरण ठेवून एका विधवेने केलेल्या दानाचे महत्त्व समजावून सांगत आहे, विधवेने तिची सर्व उपजिवीका म्हणजेच एक दमडी दानभंडारात टाकली. त्याचवेळी धनवान आपल्या विपूलतेतून दान टाकत होते, मात्र प्रभूने त्या विधवेची प्रशंसा केली. आत्मत्याग करुन दिलेले दान खरे दान असते. परमेश्वर दानधर्म करणाऱ्याचे  धन नाही तर अंत:करण पाहत असतो. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने जे गरीब, दुर्बल, अन्यायग्रस्त व पीडलेले आहेत अशांना जवळ केले. गरजवंतांची भूक भागविली. रंजल्या-गांजलेल्यांना जवळ केले व वैभवशाली चमत्कारांद्वारे  मुक्तीचे वरदान दिले. प्रभू दीन व लीन जनांचा कैवार घेत असतो.

✝️
             

पहिले वाचन : तोबीत १२:१,५-१५, २०

वाचक : तोबीत या पुस्तकातून घेतलेले वाचन

"आता मी देवाचे आभार मानतो, कारण ज्याने मला पाठवले आहे त्याच्याकडे मी परत जात आहे."

..तोबीतने आपला मुलगा तोबीअस ह्यास बोलावून म्हटले की, “माझ्या मुला, तुझ्याबरोबर आलेल्या माणसाला भरपूर पगार दे.” मग त्याने दूताला बोलावून म्हटले की, “तुम्ही दोघांनी आणलेल्या वस्तूंपैकी अर्धा हिस्सा तू घे."
मग त्या दूताने दोघांना गुप्तपणे बोलावून म्हटले, “देवाला धन्यवाद द्या आणि त्याचे आभार माना, त्याने आपणावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल सर्व प्राणीमात्रांसमोर त्याचा महिमा गाऊन त्याचे आभार माना. परमेश्वराच्या कार्यांबद्दल त्याचे उपकारस्तवन करणे आणि त्याच्या नावाचा महिमा गाणे हे रास्त आहे. त्याचे आभार मानण्यास दिरंगाई करू नका. राजाचे गुपित फोडू नका, पण गौरवाने देवाची कार्ये उघडकीस आणा. चांगले ते करा म्हणजे वाईट मागे राहील. प्रार्थना करताना उपवास, दानधर्म आणि सदाचारीपणा ह्यांची साथ असल्यास उत्तमच. थोडासा सदाचार हा बऱ्याच वाईटांपेक्षा चांगला आहे. सोने साठवून ठेवण्यापेक्षा दानधर्म करणे उत्तम होय. दानधर्म केल्याने मरणातून माणसाची सुटका होते, कारण त्यामुळे पाप धुतले जाते. जे दयाधर्माची आणि सदाचाराची कृत्ये करतात ते जीवनाची पूर्तता करतात, परंतु जे पाप करतात ते आपल्या स्वत:चे शत्रू बनतात. “मी तुम्हांपासून काहीही लपवून ठेवणार नाही. मी तुम्हाला म्हणालो की, ‘राजाचे गुपित फोडू नका पण गौरवाने देवाची कार्ये उघडकीस आणा.' म्हणूनच तू आणि तुझी सून सारा हिने जेव्हा प्रार्थना केली तेव्हा तुमच्या वतीने मी त्या प्रार्थनेची दयाघनाकडे आठवण केली आणि जेव्हा तुम्ही मेलेल्यांना पुरले तेव्हा मी तुमच्याकडे हजर होतो. जेव्हा तुम्ही आपले जेवण सोडून मेलेल्यांना विलंब न करता पुरण्यास निघून गेलात तेव्हा मला तुमच्या चांगुलपणाची कल्पना आली, कारण मी तुमच्याबरोबर होतो. म्हणून आता तुला आणि तुझ्या सुनेला बरे करण्यास देवाने मला पाठवले आहे. मी राफाएल, सात पवित्र दूतांपैकी एक असून, जो देवाकडे सर्व संतांच्या प्रार्थना सादर करतो आणि देवाच्या वैभवी जागेत प्रवेश करतो.
"आता मी देवाचे आभार मानतो कारण ज्याने मला पाठवले आहे त्याच्याकडे मी परत जात आहे. जे जे घडले आहे ते ते पुस्तकात लिहून ठेव.”

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र तोबीत १३:२, ६- ८

प्रतिसाद : अनादि अनंत परमेश्वराला धन्यवाद असो !

१) तू शिक्षा करतोस आणि दयाही दाखवतोस, तू मनुष्यांना अधोलोकी पाठवतोस आणि त्यांचा उद्धारही करतोस. तुझ्या हातून कोणाचीही सुटका होत नाही.

२) जर तू संपूर्ण तन मन धनाने देवाकडे वळलास आणि प्रामाणिकपणे तू त्याच्याशी वागलास तर देव तुझ्याकडे वळेल आणि तो तुझ्यापासून त्याचा चेहरा कधीही लपवणार नाही.

३) परमेश्वराने आपणासाठी काय काय केले आहे ह्यावर विचार कर, त्याचे अंतःकरणपूर्वक मोठ्याने आभार मान. न्यायी देवाला धन्यवाद दे आणि युगायुगांच्या राजाचा जयजयकार कर.

४) मी हद्दपार असताना देखील देवाचा महिमा गाईला. पापी राष्ट्रांना त्याच्या शक्तीची आणि महतीची कल्पना दिली.

५) पापी जनहो, देवाकडे वळा, त्याच्यासमोर सदाचाराने वागा; कदाचित तो तुमच्यावर कृपा करील आणि तुम्हाला दया दाखवील. 

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
माझा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करतो, मी त्याच्या वचनाची आशा धरतो. 
आलेलुया!

शुभवर्तमान मार्क १२:३८-४४

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने भांडारात अधिक टाकले आहे. "

येशू लोकांना शिक्षण देत असता म्हणाला, “शास्त्र्यांविषयी जपून राहा. त्यांना लांबलांब झगे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे आणि सभास्थानात मुख्य आसने आणि मेजावानीत मुख्य मुख्य बैठकी ह्यांची आवड असते. ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि दांभिकपणे लांबलांब प्रार्थना करतात. त्यांना अधिकच शिक्षा होईल."
मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली आणि तिने दोन टोल्या, म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, " मी तुम्हांला नक्की सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकत आहेत त्या सर्वांच्यापेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन :आजच्या पहिल्या वाचनात तसेच शुभवर्तमानात आपणांस खऱ्या दानधर्माविषयी सांगण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे शुभवर्तमानात एका बाजूला प्रभू येशू शास्त्रांच्या दांभिकता व दिखाऊपणाविषयी कठोर शब्द वापरत असताना दुसऱ्या बाजूला तो गरीब विधवेच्या एक दमडीच्या दानाची प्रशंसा करीत आहे. खरे म्हणजे तिच्यापेक्षा इतर श्रीमंत लोकांनी दानपेटीत मोठमोठ्या रकमा टाकलेल्या होत्या. परंतु येशू मात्र तिच्या एका दमडीच्या दानाची प्रशंसा करतो व त्याचे कारण म्हणजे त्या सर्वांनी आपल्याकडे जे विपुल होते त्यांतून थोडेसे टाकले होते परंतु तिने मात्र तिचे होते नव्हते ते सगळे प्रभूला अर्पण केले होते. असे म्हणतात की, काळजाला चटका लागेपर्यंत जो देतो ते खरे दान. ह्या विधवा स्त्रीने तेच केले. प्रभू येशूने आपल्याला सांगितले आहे की, 'तू सारे जग कमावले परंतु आपला आत्मा गमावला तर काय लाभ ?' काही लोक वाटेल त्या मार्गाने पैसा-संपत्ती कमावण्याच्या मागे लागून आत्मा मात्र गमावत असतात परंतु ह्या विधवेसारखी माणसे मात्र आपल्याकडे जे काही आहे त्याचादेखील त्याग करून आत्मा कमावतात. आपण काय कमावण्याच्या मागे लागलेलो आहोत ह्यावर चिंतन करू या.

प्रार्थना: हे प्रभू, शुद्ध अंतःकरणाने दान करण्यास व सेवामय जीवन जगण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.