रविवार
६ जून २०२१
✝️
“घ्या, हे माझे शरीर, हे माझे रक्त.”
देवाबरोबर मानवाचे दुरावलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी बली अर्पण करण्याची प्रथा निमिर्तीच्या काळापासून आहे. मोशेने कोकराचे रक्त सांडून देवाबरोबर समेटाचा करार केला होता. रक्त सांडून व होमार्पण करुन शुद्धतेचा व समेटाचा करार जुन्या करारात केला जाई. समर्पणाचा करार करुन नवीन जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असे.
प्रभू येशू ख्रिस्ताने अखिल मानवजातीच्या पापांचे शुद्धीकरण करण्यासाठी व मुक्ती देण्यासाठी स्वत:चे रक्त सांडले. क्रुसावरील समर्पणाद्वारे प्रभू येशूने परमेश्वर पित्याबरोबर नवीन कराराची स्थापना केली. आपले शरीर व रक्त ह्यांनी युक्त असा करार स्थापन करुन प्रभू येशूने आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवनाचे सहभागीदार करुन घेतले आहे.
ख्रिस्तसभा आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे. पवित्र मिस्साबलिदान हे त्याच कराराची जिंवत स्मृती आहे. ख्रिस्तशरीर संस्काराद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एकरुप होत असतो. प्रभू येशू ख्रिस्त ह्या संस्काराद्वारे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो व आपण सर्वजण त्यामुळे शुद्ध बनून मुक्ती पावतो.
पवित्र मिस्सा बलिदान म्हणजे सर्वांत महान उपासना असून ख्रिस्त तेथे भाकर व द्राक्षरसाच्या रुपाने हजर असतो. विशेष म्हणजे तो स्वतः आपल्या जीवनात येऊन आपले जीवन ख्रिस्तमय बनवतो. आपल्याला लाभलेल्या ह्या महान संस्काराद्वारे सचेतन व उत्साही बनून पवित्र व सेवाभावी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या.
✝️
वाचक : निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पाहा, परमेश्वराने तुमच्याबरोबर जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय."
मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले, तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की, “जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही करू.' ." मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्राएलच्या बारा वंशांप्रमाणे बारा स्तंभ उभारले. त्याने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांत्यर्पणे अर्पण केली. मोशेन अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे वेदीवर टाकले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले, ते ऐकून ते म्हणाले, “जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू." नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले आणि म्हटले, "पाहा, परमेश्वराने ह्या सर्व वचनांप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११६: १२-१३,१५-१८
प्रतिसाद : मी परमेश्वराच्या नावाचा धावा करीन.
१)परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उतराई होऊ? मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नामाचा धावा करीन.
२.) परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे. मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे, तू माझी बंधने सोडली आहेत.
३. ) मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पण करीन, परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.
दुसरे वाचन इब्री ९:११-१५
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुध्दी शुध्द करील."
ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला आणि जो हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ आणि पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्यांचे आणि बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुध्द झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुध्दी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुध्दी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुध्द करील?
आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरिता आहे की, पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने, सार्वकालिक वारसाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे,
या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क १४ : १२-१६, २२-२६
वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हे माझे शरीर आहे, हे माझे रक्त आहे."
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारत असत, त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे" ?
मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, “नगरात जा म्हणजे एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हांला भेटेल, त्याच्यामागून जा. तो आत जाईल तेथल्या घरधन्याला असे सांगा, 'गुरू म्हणतो, मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरायची जागा कोठे आहे?' मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हांला दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा." मग शिष्य निघून नगरात गेले, तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
ते भोजन करत असता त्याने भाकर घेऊन आणि आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, "घ्या, हे माझे शरीर आहे” आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, “(नवीन) करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हांला खचित सांगतो की, मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही."
मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतूनांच्या डोंगराकडे निघून गेले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- अखेरच्या भोजनप्रसंगी प्रभू येशू ख्रिस्ताने माडीवरच्या खोलीत पवित्र मिस्साबलीची प्रस्थापना केली. 'घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. घ्या आणि यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे' अशा शब्दात भाकर व द्राक्षारसाच्या रूपात आपले शरीर व रक्त आपल्या शिष्यांसमोर सादर केले. ख्रिस्तसभा आज त्याच्या अतिपवित्र शरीराचा व अति मौल्यवआन रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे.
१) पवित्र मिस्सा - एक स्मृतीः 'हे माझ्या स्मरणार्थ करा' ह्या ख्रिस्ताच्या शब्दात पवित्र मिस्सा ही एक स्मृती किंवा आठवण आहे, असे ख्रिस्ताने सूचित केलेले आहे. मात्र ही केवळ एक निर्जीव स्मृती, स्मारक किंवा आठवण नसते. कालवारीच्या क्रुसावर आपले शरीर मोडून व रक्त सांडून येशूने जगाला जी पाप-क्षमा, शांती व जीवन मिळवून दिले ते सर्व ह्या मिस्सेमध्ये पुन्हा उपलब्ध करून दिले जाते.
२) पवित्र मिस्सा एक बलिदान : येशूचे क्रुसावरील बलिदान वमिस्सेमधील बलिदान ह्यांच्यात एक परस्पर संबंध आहे, ध्वनी व प्रतिध्वनी, झरा व नदी आणि करार व त्याची आठवण ह्यांच्यात जो नातेसंबंध असतो तोच नातेसंबंध कालवारीवरील बलिदानात व मिस्सा बलिदानात असतो म्हणून वेदीवर क्रूस ठेवण्यात येतो.
३) ख्रिस्ताची उपस्थिती : पवित्र मिस्सामध्ये येशू एकूण पाच प्रकारे उपस्थित असतो. जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने उपस्थित असतात त्यांच्यात मी हजर असतो या ख्रिस्तवचनानुसार लोकसमुदायात तो हजर असतो. धर्मगुरू, शास्त्रवाचने, भाकर व द्राक्षारस ह्यांच्या रूपात तो उपस्थित असतो ही उपस्थिती जाणण्यासाठी हृदयात श्रद्धेचे यंत्र असावे लागते.
४) पवित्र मिस्सा- एक स्तुतीयज्ञ : अगदी प्रवेश गीतापासून अंतिमगीतापर्यंत संपूर्ण मिस्सेमध्ये परमेश्वराची स्तुती केली जाते. स्तुतिगीत, जयघोष, पवित्र, पवित्र, पवित्र, आभारघोष प्रार्थना याद्वारे भाविकांच्या मनात कृतज्ञतेची भावना प्रज्वलित केली जाते. जीवनातही ही आभाराची भावना आपण जोपासायची असते.
५) पवित्र मिस्सा ऐक्याचे प्रतीक : पोप संत जॉन पॉल दुसरे ह्यांच्या मते मिस्सेमध्ये आपणच केवळ ख्रिस्ताला स्वीकारीत नसतो तर ख्रिस्तही आपला स्वीकार करतो, प्रभुशब्द, अर्पण, आणि ख्रिस्तशरीर स्वीकार याद्वारे हे ऐक्य साधले जाते.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनात मी ख्रिस्ताच्या शरीराचा व रक्ताचा सन्मान कशाप्रकारे करतो ? साक्रामेंत भक्ती व ख्रिस्तराजाच्या सोहळ्याच्या दिवशी होणारी साक्रामेंताची आराधना यात मी कितपत भक्तिभावाने सहभागी होतो ?
प्रार्थना: हे प्रेभू येशू, तुझ्या पवित्र शरीराने व अमोलिक रक्ताने आमचे जीवन पावन बनव व तुझी सेवा करण्यास प्रेरणा दे, आमेन.

0 टिप्पण्या