सामान्य काळातील दहावा सप्ताह
७ जून २०२१
✝️
सन्माननीय थॉमस केंपिस
• वर्तनसाक्षी
“आनंद करा, उल्हास करा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.”
आजच्या पहिल्या वाचनात संत पौल देवाला धन्यवाद देत असतानाच सांत्वनकर्ता व सांभाळकर्ता परमेश्वर सर्व प्रसंगी आपणास सामर्थ्य कृपा व शांति प्रदान करीत असल्याची ग्वाही देत आहे. त्या अनुशंगानेच आपण आजच्या शुभवर्तमानावर चिंतन करु या. आजच्या शुभवर्तमानातील प्रभू येशूने आपल्या सर्वांना धन्यवादित बनण्याचा आणि स्वर्गराज्यात मोठे प्रतिफळ मिळविण्याचा मार्ग सुचविला आहे.
प्रभू येशू आज आपल्या सर्वांना खरे ख्रिस्ती जीवन जगणे किती कठीण तरी पण किती लाभदायक आहे ह्याची जाणीव करून देत आहे. ख्रिस्त सभेमध्ये ख्रिस्ताठायी खरे जीवन जगणाऱ्यांना धन्यवादित घोषित केले जाते. आपल्या भारतातख्रिस्ताच्या शिकणुकीप्रमाणे मानवतेची बाग फुलविणारी धन्यावादित मदर तेरेजा ह्यांच्या संपूर्ण जीवन आचरण पद्धतीची आपल्याला जाणीव आहे. धन्यवादित पोप जॉन पॉल दुसरे ह्यांची ख्रिस्ती जीवनशैली आपण अनुभवली आहे. ख्रिस्ताचे अनुयायी असलेल्या आपणा सर्वांना धन्यवादित जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आलेले आहे. आजच्या शुभवर्तमानावर आपण अनर्मुख बनून चिंतन करु या.
हे क्षणभंगूर मानवी जीवन जगत असताना देवाच्या योजनेप्रमाणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा घेऊ या कारण, प्रभू म्हणतो, 'स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.
✝️
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास आम्ही समर्थ व्हावे म्हणून देवाकडून आम्हांला सांत्वन मिळते.”
करिंथ येथील देवाच्या मंडळीला आणि तिच्यासुद्धा संपूर्ण अखायातील सर्व पवित्र जनांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल आणि आपला बंधू तिमथी ह्यांच्याकडून : देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा आणि शांती असो.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो करुणाकर पिता आणि सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, ह्यासाठी की ज्या सांत्वनाने आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहोत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. कारण आमच्याबाबतीत ख्रिस्ताची दुःखे जशी पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आम्हांवर संकट येते ते तुमचे सांत्वन आणि तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हांला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते. म्हणजे जी दुःखे आम्ही सोसतो, ती सहन करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळते. तुम्हाविषयीची आमची आशा दृढ आहे. कारण आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहा तसे तुम्ही सांत्वनाचेही सहभागी आहा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३४: २-९
प्रतिसाद : परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
१) परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल, माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील.हे ऐकून दीन हर्ष करतील.
२) तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला, त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.
३) ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले; त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.
४) परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य!
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू आपल्या वचनाला जागतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ५:१-१२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जे आत्म्याने दीन ते धन्य. "
लोकसमुदायांना पाहून येशू डोंगरावर चढला आणि तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो मोठ्याने त्यांना शिकवू लागला .
“जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
“जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सात्वन करण्यात येईल.”
"जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.
“जे नीतिमत्त्वाने भुकेले आणि तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.”
“जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.”
“जे अंत:करणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.”
“जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील."
“नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे."
“माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा आणि छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट व लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य! आनंद करा, उल्हास करा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला होता.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू त्याचे महान धन्योद्गार सांगत आहे. ह्या धन्योद्गारांनी अनेकांना जगण्याचा मंत्र दिला, अनेकांना जीवनाचा मार्ग दाखवला. शुभवर्तमानाच्या अखेरीस प्रभू सांगत आहे की, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा आणि छळ करतील तेव्हा आनंद व उल्हास करा. हे वचन खरे म्हणजे आपणांस दिलासा देणारे आहे, की आपण जेव्हा प्रभूच्या मार्गात चालतो, सत्याने वागतो, प्रभूच्या अरूंद मार्गात चालतो तेव्हा काही लोकांना ते रुचत नाही. त्यावेळेस ते आपल्याविरुद्ध बोलतात, आपल्याला त्रास दयायला लागतात, आपली नाहक बदनामी करतात. परंतु प्रभू अशावेळी आपल्याला सांगत आहे की तुम्ही अशा लोकांना घाबरून जाऊ नका. आपला धीर सोडू नका कारण ह्या जगात जरी तुम्हाला सत्याने चालल्यामुळे त्रास व छळ सहन करावा लागतअसला तरी स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. तुमचा न्याय लोक करणार नाहीत तर स्वतः प्रभू करणार आहे व प्रभू आपले हृदय जाणतो व म्हणून सत्याने चालत रहा. आपण न खचता, धीर न सोडता प्रभूवरील श्रद्धेत नेहमी खंबीर असावे म्हणून पवित्र आत्म्याकडे बळ मागू या.
प्रार्थना: प्रभू परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे आचारण करुन तुझ्या स्वर्गीय राज्यात सहभागी होण्यास आम्हाला कृपा व सामर्थ्य दे, आमेन.

0 टिप्पण्या