Marathi Bible Reading | 10th Week of Ordinary Time | Tuesday 08th June 2021

  सामान्य काळातील दहावा सप्ताह 

मंगळवार 

८ जून २०२१

✝️
धन्यवादित 
 Mariam Thresia Chiramel Mankidiyan - Religious
Born :  26 April 1876 at Trichur, Kerala, India

 Died :  8 June 1926 in Kuzhikattussery, Thissur, Kerala, India of natural causes

 Beatified :  9 April 2000 by Pope John Paul II

• वर्तनसाक्षी 

"तुम्हा पृथ्वीचे मीठ आहात, तुम्हीं जगाचा प्रकाश आहात.”

समाजातील ख्रिस्ती माणसाची भूमिका व त्याचे जीवन कसे असायला हवे, हे प्रभू येशू ख्रिस्त मीठ आणि प्रकाश ह्या दोन प्रतिकांचा वापर करुन आज स्पष्ट करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये खऱ्या जीवनाची सहभागिता अनुभवून समाजातील सर्वांना त्याची चव आणि त्याचा प्रकाश कसा देता येईल ही खऱ्या ख्रिस्ती माणसाची जबाबदारी आहे. प्रभू येशू म्हणतो, 'तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडूद्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे'.
मीठामुळे जसे अन्न रूचकर बनते तसेच आपणास इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करता आला पाहिजे. ख्रिस्ती माणसाचा गुणस्वभाव मीठासारखा रुचकर बनवणारा असावा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित प्रकाशात आपल्यात बाप्तिज्मा मिळाला आहे. आपण त्याच्या प्रकाशाचे भागिदार बनलो आहेत म्हणूनच भीती आणि अज्ञानाच्या अंधारात जीवन जगणाऱ्या सर्वाना आपण ख्रिस्ताच्या प्रकाशाची साक्ष दिली पाहिजे. ख्रिस्ती माणूस स्वयंप्रकाशित बनून इतरांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत लावण्यास समर्थ बनू शकतो.संत पौल, सिल्वानस आणि तिमोथी ह्यांनी आपल्या जीवनाच्या उदाहरणाने प्रभू येशूची सुवार्ता सर्वत्र पसरविली. 
ख्रिस्तीसभा आपल्या सर्वांना आज पृथ्वीचे मीठ व जगाचा प्रकाश बनण्यासाठी आपले जीवन वेचण्यास सांगत आहे. प्रथम आपण आपले जीवन मीठासारखे रुचकर व प्रकाशा सारखे लख्ख बनवू या.  त्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या. ख्रिस्तसभा आज भक्तिमान व परोपकारी संत अंतोनी पादुआ ह्याचा सण साजरा करीत आहे. त्याचा मध्यस्थिने आपण परोपकारी  जीवन जगण्यासाठी प्रार्थना करू या.

✝️             

पहिले वाचन : २करिंथ  १: १८-२२ 

वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"येशू होय आणि नाही नव्हता. त्याच्या ठायी सर्वदा होय होते.”

देव विश्वसनीय आहे. आमचे तुम्हाबरोबरचे बोलणे होय आणि नाही, असे नाही. कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी, सिल्वाना आणि तिमथी ह्यांच्याकडून तुम्हांमध्ये झाली ती होय आणि नाही, अशी नव्हती; तर त्याच्या ठायी होय अशीच होती. देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे. म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. जो आम्हांला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठायी स्थिर करत आहे तो देव आहे, त्याने आम्हांला मुद्रांकित केले आणि आमच्या अंत:करणात आपला आत्मा हा हमीपत्र म्हणून दिला. 

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ११९:१२९-१३३,१३५ 

प्रतिसाद : तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड.

१) हे देवा, तुझे निर्बंध आश्चर्यकारक आहेत, म्हणून माझा जीव ते पाळतो. तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते.
२) मी तोंड उघडून धापा टाकल्या, कारण मला तुझ्या आज्ञांचा ध्यास लागला. तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणाऱ्यांवर करतोस तशी कृपा माझ्यावर कर. 
३) तुझ्या वचनाच्या द्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टपणाची सत्ता माझ्यावर चालू देऊ नको. तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय ५:१३-१६

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "तुम्ही जगाचा प्रकाश आहा."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटलेः “तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल ? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. 
“तुम्ही जगाचा प्रकाश आहा. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.'
प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :प्रभू येशू बऱ्याच वेळेस लोकांना समजेल अशा दैनंदिन जीवनातील प्रतिकांचा किंवा गोष्टींचा वापर करून प्रबोधन करीत असे. आजच्या शुभवर्तमानातही तो मीठाचा उल्लेख करून सांगत आहे की, 'तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात'. आपल्याला माहित आहे की, मीठ जर जेवणात नसले तर त्या जेवणाला काहीच रुची असणार नाही. त्या मिठाचा जो प्रमुख गुणधर्म आहे म्हणजेच त्याचा जो खारटपणा आहे तोच निघून गेला तर त्या मीठाला मग काय अर्थ उरेल? त्याचा काहीच उपयोग असणार नाही. त्याचप्रमाणे माणसाचेही आहे. आपण जर परमेश्वराने आपल्याला दिलेली दानं सोडून दिली व त्यांचा वापर केला नाही तर मग आपल्या जीवनाला काय अर्थ उरणार आहे ? अशावेळी आपले जीवन निरर्थक ठरणार आहे. आपण इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकणार नाहीत व त्यामुळे आपले जीवन त्या रूची गमावलेल्या मिठासारखे निरुपयोगी ठरणार आहे. आज आपण आपल्या जीवनावर चिंतन करू या व मी पृथ्वीचे मीठ म्हणून इतरांच्या जीवनात रूची किंवा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो का ?

प्रार्थना: हे प्रभू येशू, आमच्या शब्दाने व आचरणाने आम्ही तुझा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचविण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या