Marathi Bible Reading | 10th Week of Ordinary Time | Wednesday 9th June 2021

  सामान्य काळातील दहावा सप्ताह 

बुधवार 

९ जून २०२१

✝️





संत एफ्रेम

- उपधर्मगुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३०६-३७३) 

ख्रिस्तसभेचा हा धर्मपाल “सिरियाचा सूर्य” आणि “पवित्र आत्म्याचे संगीत वाद्य” म्हणून ओळखला जातो. त्यांनी बायबलवर लिहिलेल्या भाष्यांनी व अनेक उपासनागीतांनी सिरियाच्या लोकांच्या हृदयाची पकड घेतली. या भाष्यांमध्ये व गीतांद्वारे त्यांनी पाखंडवाद्याची चुकीची मते खोडून खरी कॅथलिक शिकवण लोकांना दिली.

जी व्यक्ती ब्रह्मचर्याचे प्रामाणिकपणे पालन करते तिला एलियाप्रमाणे ब्रह्मचर्याचा व शुद्धतेचा हा रथ स्वर्गात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. - संत एफ्रेम


देवाचा शब्द व त्याचे वचन अपरिवर्तनीय म्हणजेच सर्वकाळ स्थिर आहे. देवाच्या मुखातून निघालेले वचन फलप्राति करुन देणारे आहे. यहोशवाच्या पुस्तकात म्हटले आहे, 'नियमशास्त्र हा ग्रंथ तुझ्यामुखी सदैव असू दे, त्यांत जे लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ति घडेल'  (यहोशवा १:८).

 प्रभू येशू देवाची तारण योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आला आहे, म्हणूनच देवाच्या आज्ञा आणि देवाची वचने पूर्णत्वास नेण्यासाठी त्याने शिकवण दिली. प्रभू येशूच्या शिकवणुकीचा पाया देवाची आज्ञा आणि त्याचे नियमशास्त्र यावरच उभारलेला आहे. म्हणूनच पवित्र शास्त्र म्हणजे बायबलला आपल्या ख्रिस्ती जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. नियमशास्त्र व धर्माच्या ग्रंथाचे ज्ञान असणे आणि केवळ कर्मकांडात अडकून राहणे म्हणजे देवाची आज्ञा पाळणे नव्हे, तर नियमशास्त्रावर व प्रभूच्या वचनांवर सखोल चिंतन करुन त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करणे महत्वाचे आहे. केवळ धार्मिकतेचा बुरखा घालून आपण देवाच्या सहवासात जाऊ  शकत नाही, ह्याची जाणीव प्रभू येशू आज आपल्याला करुन देत आहे,
 प्रभूची आज्ञा आणि वचने  समजून घेणे, त्यावर चिंतन करणे व त्याप्रमाणे आचारण करणे, म्हणजेच खरे  ख्रिस्ती जीवन जगणे होय.


✝️             

पहिले वाचन : २करिंथ  ३: ४-११ 

वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"देवाने आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले; तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे."

आम्हांला ख्रिस्ताच्याद्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊन ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले; तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे. कारण लेख जिवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो. असा आम्हाला ख्रिस्ताच्याद्वारे देवासंबंधी भरवसा आहे.
जिचा लेख दगडावर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूमध्ये होत असे ती सेवा एवढी तेजस्वी होती की, मोशेच्या तोंडाचे तेज नाहीसे होत चालले असूनही इस्राएल लोकांना जर त्याच्या तोंडाकडे टक लावून पाहवेना, तर आध्यात्मिक सेवा विशेषकरून तेजस्वी होणार नाही काय? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती विशेषकरून अधिक तेजोमय असेल. 
हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ९९:५-९

प्रतिसाद : परमेश्वर, आमचा देव पवित्र आहे

१) परमेश्वराची, आमच्या देवाची, थोरवी गा आणि त्याच्या पदासनापुढे नमन करा. पवित्र तोच आहे.

२) त्याच्या याजकांपैकी मोशे आणि अहरोन आणि त्याच्या नावाचा धावा करणाऱ्यांपैकी शमुवेल, ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.

३) मेघस्तंभातून तो त्यांच्याशी बोलला. त्याचे निर्बंध आणि त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले

४) हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिले. तू त्यांना क्षमा करणारा असा देव होतास, तरी त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांस शासन करत होतास.

५) परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा, त्याच्या पवित्र डोंगरापाशी नमन करा; कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय ५:१७-१९

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

  "नियमशास्त्र रद्द करायला मी आलो नाही तर ते पूर्ण करायला आलो आहे."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यासाठी मी आलो आहे असे समजू नका, मी रद्द करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे. कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील आणि त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील, पण जो कोणी त्या पाळील आणि शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील.”
प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :आजच्या पहिल्या वाचनात सत पौल एक महत्वाचे वचन सांगत आहे की, आमची पात्रता ही देवाकडून आलेली आहे. कधीकधी आपल्यापैकी काही लोक असे बोलतात की हे आम्ही केले किंवा ते आम्ही केले. असे बोलताना माणसामध्ये कधीकधी गर्वाची भावना दिसून येते. जणूकाही आपल्या स्वबळावर किंवा स्वसामर्थ्यावर हे आपण केले आहे अशी आपली भावना होते. परंतु बायबलमध्ये असे वचन आहे की 'परमेश्वराने जर घर बांधले नाही तर बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत. म्हणजेच आपण जे काही करतो त्यामध्ये आपण स्वतःला नाही तर परमेश्वराला श्रेय दयायला हवे कारण संत पौल सांगतो त्याप्रमाणे आपली पात्रता किंवा आपले सामर्थ्य हे परमेश्वराकडून आलेले आहे व त्याच्याशिवाय आपण काहीही करू शकत नाहीत. आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपण परमेश्वराची निर्मिती आहोत व आपले सामर्थ्य किंवा बळ हे त्याच्याकडून आलेले आहे हे सत्य आपण कधीही विसरू नये म्हणून प्रभूकडे कृपा मागू या.

प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझी वचने सर्वदा आमच्या जीवनाला पथदर्शक बनोत. तुझ्या आज्ञेचे पालन आम्हाकडून होवो, हिच तुज चरणी प्रार्थना, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या