Marathi Bible Reading | 10th Week of Ordinary Time | Thrusday 10th June 2021

सामान्य काळातील दहावा सप्ताह 

गुरुवार 

१० जून २०२१

✝️

संत जेटुलियुस व त्यांचे सहकारी
रक्तसाक्षी (. १२०) 

“प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर,  

मग येऊन आपले दान अर्पण कर.

रागावणे आणि खून करणे ह्या पापांविषयी स्पष्टीकरण देताना प्रभू येशू म्हणत आहे. कि कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्याससभेच्या शिक्षेस पात्र होईल. म्हणजेच आपले नीतिमत्व खूप महान असले पाहिजे..

शुभवर्तमानात प्रभू येशू वेदीपाशी अर्पण सादर करणाऱ्याला आपल्या जीवनाचे परीक्षण करायला संगत आहे. समेट न करता वेदीवर समर्पण करणे योग्य  नाही. समेटा विना सादर केलेले समर्पण परमेश्वराला स्वीकारणीय होणार नाही ह्याची प्रभू आपल्याला जाणीव करून देत आहे. आपण आपल्या जीवनशैलीवर विचार  मंथन करू या, कारण चर्चमधील आपली उपासना, भक्ति व प्रार्थना या मध्ये सहभागी  होत असताना आपण खरोखरच शुद्ध अंतरकरणाने वेदीपाशी जातो का ? विशेषतः  पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होण्या अगोदर आपण आत्म परीक्षण करुन प्रायश्चित संस्कार घेण्यासाठी आपल्याला ख्रिस्तसभा आवाहन करीत असते. आपण चर्चच्याआज्ञांचे पालन करुन आपले जीवन आचरण पवित्र ठेवण्यासाठी सर्वदा प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. वर्षानुवर्षे आपल्या बंधु-भगिनींबरोबर समेट न करता केलेली  प्रार्थना फलदायी होईल का ?

संत पौल आजच्या पहिल्या वचनात स्पष्ट करीत आहे कि आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला जाणीव करून देणारा देवाचा आत्मा आपल्याला सतत प्रेरणा  देत असतो. मात्र आपण अविश्वासाने आचरण करतो म्हणूनच संत पौल म्हणतो की, 'अविश्वासणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवतांनी आंधळी केली आहेत.  म्हणजेच आपण जगातील मोहजालात इतके मग्न आहोत की आपल्याला देवा समोर येताना भीती वाटत नाही. आपण आज आपल्या सर्व बंधुभगिनीं बरोबर समेट  करण्याचा निर्णय घेऊ या.



✝️             

पहिले वाचन : २करिंथ ३:१५-४: १,३-६ 

वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी तो आमच्या अंत:करणात प्रकाशला आहे."

होय, आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखवण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंतःकरणावर आच्छादन राहते, परंतु त्याचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडीत आहो आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहो.
म्हणून आम्हांवर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हांला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. आम्ही आपली घोषणा करत नाही, तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशूप्रीत्यर्थ आम्ही तुमचे दास आहो अशी स्वतःची घोषणा करतो. कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंत:करणात प्रकाशला आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ८५:९-१४

प्रतिसाद : आमच्या देशात परमेश्वराचे वैभव नांदेल.

१) परमेश्वर देव जे काही बोलेल ते मी ऐकून घेईन, कारण तो आपल्या लोकांशी आणि आपल्या भक्तांशी क्षेमकुशलचे भाषण करील. खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते. ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.

२) दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत, नीती आणि शांती ह्यांनी एकमेकींस आलिंगन दिले आहे. पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे; स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करत आहे.

३) जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फळ देईल. त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल. आणि त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
हे पित्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ह्या गोष्टी तू बाळकांना प्रकट केल्या.
आलेलुया!

शुभवर्तमान  मत्तय ५:२०-२६

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

  जो कोणी आपल्या भावावर रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी तुम्हाला सांगतो, शास्त्री आणि परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश नाही.
"खून करू नको आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडाला पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, 'अरे वेडगळा' असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेला पात्र होईल आणि जो कोणी त्याला 'अरे मूर्खा', असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेला पात्र होईल. ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहेतोच त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला खरोखर सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस.
प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :आजचे शुभवर्तमान आपल्याला समेटाविषयी आवाहन करीत आहे. प्रभू सांगतो की, आपल्या भावामध्ये व आपल्यामध्ये जर बाद निर्माण झाला असेल, तर जाऊन समेट कर व मगच दान अर्पण करण्यास वेदीजवळ आण.म्हणजेच येशू सांगत आहे की, मनात राग असताना केलेल्या दानाला काहीच अर्थ उरत नाही. काळजात द्वेष असताना दान स्वीकारणीय बनू शकत नाही. आज आपण समाजात काय परिस्थिती पाहतो? आज आपणापैकी काही जण रक्ताचे नाते जपण्यापेक्षा बँकेचे खाते जपण्यात गुंतलेले आहोत. म्हणजेच रक्ताच्या नात्यापेक्षा पैसा-संपत्तीला अधिक महत्त्व देत आहोत व त्याद्वारे आपले रक्ताच्या भावाबहिणीबरोबरचे संबंध तोडत आहोत. प्रभू येशूने आपल्याला सांगितले आहे की 'तू सारे जग कमावले व स्वतःचा आत्मा गमावलास तर काय फायदा?" आपणही पुष्कळ संपत्ती जमवली, भरपूर प्रॉपर्टी मिळवली परंतु आपल्या रक्ताचे भाऊ-बहीण गमावले तर काय लाभ ? आपला आपल्या भाऊबंदाबरोबर वाद निर्माण झाला असेल तर आपण एक पाऊल मागे घेऊन समेट करावा व त्याद्वारे आपले अर्पण प्रभूला स्वीकारणीय बनावे म्हणून प्रभूकडे नम्र अंतःकरणाची मागणी करू या.

प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझी समेटाची शिकवण आचरणात आणण्यास प्रेरणा, धैर्य व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या