Marathi Bible Reading | 10th Week of Ordinary Time | Friday 11th June 2021

 सामान्य काळातील दहावा सप्ताह 

शुक्रवार 

११ जून २०२१

✝️




प्रभूयेशूच्या अति पवित्र हृदयाचा सोहळा

ख्रिस्तसभा आज प्रभूयेशूच्या अति पवित्र हृदयाचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभूयेशूचे हृदय सर्वांना त्याच्या वेंगेत घेण्यासाठी सदैव तयार आहे. प्रभू येशू दयेचा, प्रेमाचा, चांगुलपणाचा आणि कृपेचा महासागर आहे. त्याच्या  अतिपवित्र हृदयातून कृपेचा झरा अखंडपणे वाहत असतो. ख्रिस्त आपणास  म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्वजण मजकडे या, मी  तुम्हांला विसावा देईन" (मत्तय ११:२८). 

आज प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाचा आपण सन्मान करीत आहोत. ख्रिस्त प्रभू त्याचे दोन्ही बाहू पसरुन  आपल्याला त्याच्या हृदयाशी कवटाळण्यासाठी तयार आहे. आपल्या सर्व वेदना, कष्ट, संकटे, दु:खे, चिंता व ईश्वरापासून जे जे आपणास दूर घेऊन जाते  अशा सर्व घटना विचार घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला आपले सर्वस्व समर्पित करु  या. त्याच्या हृदयातू अखंडपणे वाहत असलेल्या कृपेच्या झऱ्यातून तो आपणास अंतर्यामी बलसंपन्न करावयास तयार आहे.

प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदया आम्हा पाप्यांवर दया कर! 

संत बर्णबाचा सण 
प्रेषित आणि रक्तसाक्षी (इ. स. १-६०)

सायप्रेस (कुप्र) बेटामध्ये एका उच्च कुलीन लेवी वंशात जन्मलेला बर्णबा हा मूळात यहुदी धर्मीय होता. पुढे तो येरुशलेममध्ये स्थायिक झाला. शौलबरोबर तोसुद्धा गमलिएल ह्या विद्वान शास्त्र्याच्या चरणाशी बसून शिकलेला असावा असे मानले जाते. पेन्टेकॉस्टच्या जगप्रसिद्ध घटनेनंतर तो तात्काळ ख्रिस्ती झाला आणि त्याने आपली सर्व मालमत्ता प्रेषितांच्या चरणाशी आणून ठेवली (प्रे. कृ. ४).
            ✝️             

पहिले वाचन : होशेय ११:१,३-४, ८-९
 
वाचक : होशेयच्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"माझे हृदय आतल्या आत आक्रोश करत आहे."

परमेश्वर असे म्हणतो: “इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली, मी त्याला आपला पुत्र म्हणून इजिप्तमधून बोलावले. मीच एफ्राइमला चालायला शिकवले, मी त्यांस आपल्या कवेत वागवले आणि मी त्याला बरे केले, पण ते त्याला ठाऊक नाही. मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी मी त्याला ओढले, बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणाऱ्यासारखा मी त्याला झालो, त्याला मी ममतेने खाऊ घातले.
माझे हृदय आतल्या आत आक्रोश करत आहे, माझ्या कळवळ्याला ऊत आला आहे. मी आपल्या क्रोध संतापाप्रमाणे करणार नाही, मी एफ्राइमचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही. कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे. तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे, मी क्रोधावेशाने येणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र यशया १२: २-६

प्रतिसाद : तुम्ही तारणकूपातून उल्हासाने पाणी काढाल.

१.) पाहा, देव माझे तारण आहे, मी विश्वास ठेवतो, भीत नाही. कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे, तो मला तारण झाला आहे.
तेव्हा तुम्ही तारणकूपातून उल्हासाने पाणी काढाल.

२) त्या दिवशी तुम्ही म्हणाल, परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याच्या नावाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची महत्कृत्ये जाहीर करा, त्याचे नाव थोर आहे अशी वाखाणणी करा.

३) परमेश्वरापुढे गायन करा, कारण त्याची करणी प्रतापमय आहे, हे साऱ्या जगभर जाहीर होवो. अहो सीयोननिवासी लोकहो, जयघोष करा, गजर करा, कारण इस्राएलचा पवित्र प्रभू तुमच्याठायी थोर आहे.


दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र ३ : ८-१२.१४-१९

वाचक :  पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

"बुध्दीला अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखणे,"

मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृध्दीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठायी युगादिकालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय, हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे, ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिध्दीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि अधिकारी ह्यांना मंडळांच्या द्वारे आता कळावे. त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य आणि हमीपूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत. म्हणून मी विनंती करतो की, तुम्हाप्रीत्यर्थ मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही खचू नये, ते तुम्हांला भूषणावह आहेत.
ह्या कारणास्तव स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक वंशाला ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की, त्याने आपल्या ऐश्वर्यांच्या समृध्दीप्रमाणे तुम्हांला असे दान द्यावे की, तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणांमध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले आणि पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घेण्यास आणि बुध्दीला अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे, अशा प्रकारे तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
प्रीती म्हणावी तर हीच. 
देवाने तुम्हाआम्हावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले.
आलेलुया!

शुभवर्तमान  योहान १९:३१-३७

वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला तेव्हा रक्त आणि पाणी बाहेर निघाले.'
तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशी शरिरे वधस्तंभावर राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता, म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहूद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन येशूबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे आणि दुसऱ्याचे पाय मोडले, परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले. ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे आणि आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, ह्यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. “त्याचे हाड मोडणार नाही” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की, “ज्याला त्यांनी भोसकले त्याच्याकडे ते पाहतील.”
प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :आज ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशूच्या हृदयातून फक्त प्रेम आणि प्रेमच वाहिले. त्याच्या हृदयातील प्रेमामुळे त्याने काय केले? तर त्याने महालाऐवजी गव्हाण निवडली, मखमलीगादीऐवजी गवताचा बिछाना निवडला, सोन्याचांदीच्या भांड्याऐवजी तो मातीच्या भांड्यात जेवला, सोन्याच्या मुकुटाऐवजी त्याने काट्याचा वेदनामयी मुकुट परिधान केला, दासदासी बाळगण्याऐवजी त्याने स्वतः दास बनून इतरांचे पाय धुतले, अगणित सैन्याऐवजी त्याने बारा साधे शिष्य निवडले व शेवटी रत्नजडित सिहांसनाऐवजी तो अवजड अशा क्रुसावर विराजमान झाला. हे सर्व त्याने मानवजातीसाठी केले. आपल्यासाठी त्याच्या हृदयातून वाहणाऱ्या प्रेमाच्या झऱ्यापोटी केले. त्याच्या हृदयातील प्रेमापोटीच त्याने त्याच्या मारेकऱ्यांनाही क्षमा केली, पाप्यांवरही दया केली व चुकलेल्यांना समजून घेऊन त्यांना परत सन्मार्गावर आणले. आज येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सोहळा साजरा करीत असताना आपले काळीज येशूच्या काळजासारखे प्रेमळ व क्षमाशील बनावे म्हणून कृपा मागू या.

प्रार्थना: हे येशूच्या अतिपवित्र हृदया, आम्ही सर्वदा तुझ्या सहवासात असावे आणि तुझी वाणी ऐकून त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे म्हणून आम्हाला कृपा दे,  आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या