सामान्य काळातील दहावा सप्ताह
शनिवार
१२ जून २०२१
✝️

पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सण
“बाळा, तू आमच्याबरोबर असा कां वागलास ?”
पवित्र मरियेला परमेश्वराने आपल्या पुत्राची माता होण्यासाठी निवडले असतांना ती फार गोंधळून गेली होती. तरीसुद्धा परमेश्वराची इच्छा प्रमाण मानून तिने देवाच्या योजनेला पूर्णपणे प्रतिसाद दिला. अखिल मानवांच्या मुक्ततेसाठी ती देवपुत्राची माता बनली.
आज ख्रिस्तसभा पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा सण साजरा करीत आहे. पवित्र मरियेला बाळपणापासूनच श्रद्धेचे बाळकडू पाजलेले होते. प्रार्थना, नीतिमत्ता, परोपकार व सेवा यामुळे तिच्या जीवनात देवासाठी प्रेम व बंधुजनांसाठी तळमळ निर्माण झाली होती. गाब्रियल दुताने तिला 'कृपापूर्ण' म्हटले आहे, कारण ती खरोखर निष्कलंक आणि निर्मळ होती.
परमेश्वराची दासी बनलेली मरिया आजच्या शुभवर्तमानात सुद्धा आपणांस गोंधळून गेलेली आढळते. बारा वर्षांचा बाळ येशू येरुशलेमच्यामंदिरात हरवला असतांना ती बावरली. ती म्हणाली, 'बाळा, तू आमच्याबरोबर असा कां वागलास?' परंतू सत्य समजताच मरियामाता अंतर्मुख बनली. तिने ती घटना हृदयाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवली, कारण ती येशू बाळा विषयीचे भाकित जाणून होती.
पवित्र मरियेसारखे पवित्र, प्रार्थनामय व सेवाभावी जीवन जगण्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून तिच्या चरणाशी एकत्र येऊ या. तिच्या निष्कलंक हृदयातून सर्वांसाठी कृपेचा व प्रेमाचा झरा वाहत आहे.
पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदया आम्हा पाप्यांवर दया कर!
✝️
पहिले वाचन : यशया ६१:९-११
वाचक : यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
अन्य राष्ट्रात माझ्या लोकांचा वंश, देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल, परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती ही असे त्यांस पाहणारे कबूल करतील. मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्हासतो. कारण जसा वर शेलापागोटे परिधान करून स्वतःला याजकासराखा मंडित करतो आणि वधू जशी अलंकारांनी स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादले आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवितो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १ शमुवेल २:१,४-८
प्रतिसाद : परमेश्वराच्या ठायीं माझे हृदय उल्लासत आहे
१.) परमेश्वराच्या ठायीं माझे हृदय उल्लासत आहे; परमेश्वराच्या ठायीं माझा का उत्कर्ष झाला आहे; माझे मुख माझ्या शत्रूविरुद्ध उघडलें आहे.कारण तूं केलेल्या उद्धारानें मला आनंद होत आहे.
२) शूर वीरांची धनुष्ये भंगून गेली आहेत जे लटपटत होते त्यांच्या कमरेस बलरूप कमरबंद चढविला आहे. जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत. जे क्षुधित होते त्यांस आतां आराम प्राप्त झाला आहे, वंध्येला सात मुले झाली आहेत बहुपुत्रवती क्षीण झाली आहे.
३) परमेश्वर प्राण हरण करितो आणि प्राणदानहि करितो; तो खालीं अधोलोकीं नेतो आणि तो वरहि आणतो. परमेश्वर निर्धन करितो व धनवानहिं करितो; शिक्ष तो अवनत करितो व उन्नतहि करितो
४) तो कंगालांस धुळीतून उठवितो, दरिद्र्यांस उकिरड्यावरून उचलून
उभे करितो.म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांस प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत,त्यांवर त्यानें दुनिया ठेविली आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
ज्या आईने ह्या देवाचा सर्व गोष्टी आपल्या हृदयात ठेवून चिंतन केले ती धन्य.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक २:४१:५२
वाचक :लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूचे आईबाप दरवर्षी वल्हांडण सणास यरुशलेमास जात असत, तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे निघाले, तेव्हा तो मुलगा येशू यरुशलेमात मागे राहिला हे त्याच्या आईवडिलांस कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग आणि ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते त्याचा शोध करत करत यरुशलेमास परत गेले. तीन दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना आणि त्यांना प्रश्न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्वत्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरावरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास ? पाहा, तुझे वडील आणि मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध करत राहिला हे कसे ? जे माझ्या पित्याचे आहे त्यात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय ?” परंतु तो हे जे त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नाझरेथास गेला आणि त्यांच्या आज्ञेत राहिला.त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मन ठेवल्या. “येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या मर्जीत वाढत गेला.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- काल आपण प्रभू येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सोहळा साजरा केला व आज ख्रिस्तसभा पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा दिवस साजरा करीत आहे. प्रभू येशूप्रमाणेच पवित्र मरियेचे हृदयही प्रीती व क्षमेने ओसंडून वाहत होते. तिच्या हृदयातही द्वेष नव्हता व म्हणूनच आपण पाहतो की तिच्या पुत्राला चाबकाने फोडले जात असताना, त्याच्या हातापायांत खिळे ठोकले जात असताना, त्याच्या देहाच्या चिंध्या झालेल्या पाहतानाही ती पवित्र माता आपल्या हृदयातून शिव्या-शाप काढत नाही, वाईट विचार तिला स्पर्शुन जात नाहीत तर उलट ती शांत असते. तिच्या काळजात त्या परिस्थितीतही अचल श्रद्धा असते. जे हृदय निष्कलंक असते त्या हृदयातून वाईट बाहेर पडत नसते तर उलट ते हृदय चांगल्याचाच विचार करते व ते विचार कृतीत आणते. आज मावलीच्यानिष्कलंक हृदयावर चिंतन करीत असताना आपण आपल्या काळजातही डोकावून पाहू या की माझ्या काळजातून किंवा हृदयातून काय विचार बाहेर पडतात? माझी कृती कशी असते? आपले काळीजही मावलीसारखे निष्कलंक बनावे व | आपण सदैव वाईटापासून स्वतःला सावरावे म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने कृपा मागूया
प्रार्थना: हे पवित्र देवमाता, आम्हां पाप्यांसाठी तुझ्या प्रिय पुत्राकडे विनंती कर, आमेन.
0 टिप्पण्या