सामान्य काळातील अकरावा सप्ताह
रविवार
१३ जून २०२१
✝️
“परमेश्वराचे राज्य असे आहे."
प्रभू येशूची देवराज्याची शिकवण सामान्य लोकांना समजावी आणि त्यांनी ग्रहण करावी, म्हणून प्रभूने पुष्कळ दाखले सांगितलेले आहेत. आपण आपल्यावर सोपविवेली कार्य करण्याची जबाबदारी निष्ठेने व चोख पार पाडल्यावर देव त्याचे कृपाकार्य पूर्णत्वास नेतो. देवाचे वचन जीवनात स्वीकारायचे व त्याचे पालन करायचे, मात्र त्याचे फल देणे देवाच्या हातात आहे.
आज पुन्हा एकदा प्रभू येशू हा सर्वात लहान असलेल्या मोहरीच्या दाण्याचा दाखला देत आहे. मोहरीचा दाणा जमिनीत पेरल्यावर त्याची वाढहोऊन वृक्षात रुपांतर होते. देवराज्याचे बीज म्हणजेच अगदी छोटेखानी असलेले देवाचे वचन, आपण ग्रहण केल्यास व त्याप्रमाणे आचरण केल्यासआपले जीवन बहरु शकते, फूलू शकते व फलद्रुप बनते. अशामुळे आपल्या जीवनात देवाचे राज्य प्रस्थापित होण्यास मदत होत असते.
आपल्या सर्वांना देवराज्यात प्रवेश मिळावा म्हणून आपण देवाची वचने व देवाच्या आज्ञा आपल्या जीवनात प्रमाण मानून आचरण करु या. आपण मोहरीच्या वृक्षाप्रमाणे सर्वांना आपल्या प्रभूच्या छायेखाली वाढण्यास सहकार्य करु या. देवराज्य प्रस्थापित करण्यास कृपा मागू या.
संत अँतोनीचा सण
हे संत अंतोनी आम्हाला विनंती कर !
पवित्र मरियेचे नाव आपल्या ओठांना मधापेक्षाही गोड, आपल्या कानांना कोणत्याही मधुर गीतापेक्षा श्रवणीय आणि आपल्या हृदयाला अतिशुद्ध आनंदापेक्षा अधिक मौल्यवान असे आहे. - पादुआचे संत अंतोनी
✝️
पहिले वाचन : यहेज्केल १७:२२-२४
वाचक : प्रभो, तुझे उपकारस्मरण करणे चांगले आहे.यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"नीच वृक्षास मी उंच करीन."
प्रभू परमेश्वर म्हणतो, “मी उंच गंधसरूच्या शेंड्यावरील एक डहाळी तोडून ती लावीन, त्याच्या अगदी वरच्या कोवळ्या फांद्यातील एक घेऊन ती एका मोठ्या उंच पर्वतावर लावीन, मी इस्राएलच्या उंच पर्वतावर ती लावीन; तिला फांद्या फुटतील, फळे येतील, तिचा उत्तम गंधसरू होईल; म्हणजे मी त्याच्याखाली सर्व पक्षिकुळे राहतील, त्याच्या शाखांच्या छायेत ते वस्ती करतील. वनातील सर्व वृक्षांना कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षाला नीच केले आहे आणि नीच वृक्षाला उंच केले आहे, हिरव्या झाडाला सुकवले आहे आणि शुष्क झाडाला फलद्रूप केले आहे. मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेली आहे.”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९२ :२-३, १३-१६
प्रतिसाद : प्रभो, तुझे उपकारस्मरण करणे चांगले आहे.
१) परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे, प्रभातसमयी तुझे वात्सल्य आणि प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे चांगले आहे.
२) नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनवरील गंधसरूसारखा वाढेल.
३ ) जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेतते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील, वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत आणि टवटवीत असतील; 'ह्यावरून दिसेल की, परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठायी अन्याय मुळीच नाही
दुसरे वाचन :२ करिंथ ५:६-१०
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“आम्ही घरी असलो किंवा प्रवासात असलो तरी प्रभूला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे."
आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात घेतो की, आम्ही शरीरात वस्ती करीत आहो तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहो. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही, आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हांला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे, तू आम्हाला सत्यात समर्पित कर.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ४:२६-३४
वाचक : मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मोहरीचा दाणा हा सर्व झाडपाल्यांमध्ये बारीक आहे तरी तो सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो."
येशू म्हणाला, “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काही एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते; पण हे कसेहोते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे." आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्याला कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते.
असले पुष्कळ दाखले देऊन, त्याच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे, तथापि एकांती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आजची तिन्ही वाचने देवराज्याविषयी शिकवण देतात. ह्या देवराज्याची सुरुवात जरी लहान प्रमाणात होत असली तरी कालांतराने ते वाढत जाऊन त्याचा मोठा वटवृक्ष होतो असे आपण पहिल्या वाचनात व शुभवर्तमानात शिकतो. तर दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगतो की, आपण कुठेही असलो तरी आपण परमेश्वराला प्रसन्न करणारे जीवन जगू शकतो. ख्रिस्तसभा हे देवराज्याचे जितेजागते प्रतीक आहे. ह्या देवराज्याचे एकूण ५ पैलू आहेतः
१) देवराज्य आलेले आहे परंतु अजूनही पूर्ण स्वरूपात साकार झालेले नाहीः त्यामुळे ख्रिस्तसभेत देवराज्याच्या काही खुणा जशा दिसतात तशीच काही प्रमाणात अपूर्णता दिसून येते. ख्रिस्तसभा ही यात्रेकरू आहे. जगभर तिचा प्रसार सुरू आहे. तसाच स्वर्गाच्या दिशेने तिचा प्रवास सुरू आहे.
२) देवराज्य हे दैवी व मानवी आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने देवराज्याची स्थापना केल्यामुळे ते दैवी आहे, मात्र त्याचा अनुभव घेण्यासाठी जी रचना व साधनासामुग्री लागते ती मानवी असते. हाडामासांची माणसे देवराज्याचा कारभार सांभाळीत असतात. त्यामुळे मानवी दुर्बळता देवराज्याच्या कार्यास आड येऊ शकते.
३) देवराज्य दृश्य व अदृश्य स्वरूपाचे आहे. चर्चची इमारत, साजरे केले जाणारे उपासनाविधी, पवित्र वस्तू, पुस्तके, जागा, व्यक्ती व कृती ह्यादेवराज्याच्या दृश्य खुणा आहेत. मात्र देवराज्य त्यांच्याही पलीकडचे आहे. ते आपल्या अंतःकरणात आहे. ते अदृश्य स्वरूपाचे आहे. शेतात लपविलेल्या ठेवी सारखे, पिठात लपविलेल्या खमिरासारखे व अन्नात घातलेल्या मिठासारखे त्याचे स्वरूप आहे.
४) देवराज्य वैयक्तिक व सामुदायिक स्वरूपाचे आहे : प्रत्येक व्यक्तीला जसा देवराज्याचा वैयक्तिक अनुभव येऊ शकतो तसाच सामुदायिक, प्रार्थना, तीर्थयात्रा, सणसोहळे, सामुदायिक जीवन याद्वारे देवराज्याचा अनुभव घेता येतो.
५) देवराज्य हे स्थानिक तसेच वैश्विक स्वरूपाचे आहेः देवराज्यस्थानिक स्वरुपाचे असल्याने प्रांत, भाषा, संस्कृती, लोकजीवन ह्यांच्या विविधतेतून देवावरील श्रद्धा जोपासली जाते. मात्र ते वैश्विक स्वरूपाचे असल्याने सर्वत्र एकाच देवावरील एकच श्रद्धा जाहीर केली जाते.
आत्मपरीक्षण : ‘जे ख्रिस्तसभेत असतील ते देवराज्यात असतीलच असे नाही. तसेच जे देवराज्यात असतात ते ख्रिस्तसभेत असतीलच असे नाही.' या विधानाविषयी तुम्हांला काय वाटते? आपण ख्रिस्तसभेतही व देवराज्यातही असावे म्हणून काय केले पाहिजे ?
प्रार्थना: हे प्रभू, तुझ्या मळ्यात सेवाकार्य करण्यास मला प्रेरणा दे, तुझ्या सुवार्ता प्रसाराचे मला साधन बनव, आमेन.
0 टिप्पण्या