सामान्य काळातील
अकरावा सप्ताह
सोमवार
१४ जून २०२१
संत मेथोडिअस
कॉन्स्टॉन्टिनोपलचे पेट्रिआर्क (... ८४७)
✝️
"जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस."
शुद्धतेने, सहनशीलतेने, निष्कपटप्रीतिने, ममतेने आणि देवाच्या सामर्थ्याने प्रेषितांनी आपल्या बंधुभगिनीची सेवा केली आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सुवार्ता पसरविली.
आपण सूडबुद्धिने न वागता सहनशिलतेने आणि निष्कपट प्रीतिने जीवन जगण्यासाठी प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात आवाहन करीत आहे. प्रभू म्हणत आहे की, 'दुष्टाला अडवू नको आणि गरजवंताला पाठ देऊ नको.' सहनशिलता, नम्रता, परोपकार आणि सेवा ह्या गुणांनिशी आपण वैऱ्यावर मात करु शकतो आणि अडलेल्यांना सहाय्य करु शकतो. आज अनेक माणसे अडचणीत, संकटात व बिकट परिस्थितीतून जात आहेत. अशांना आपण आपल्यापरिने सहाय्य करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. आपले जीवन हे परमेश्वराने आपल्याला दिलेले दान आहे. आपल्याला प्राप्त कृपादानांचा व वरदानांचा योग्य तो उपयोग करुन आपण परोपकार साधू शकतो. ख्रिस्ती माणूस म्हणून इतरांच्या जीवनात आपण आनंद निर्माण करु शकते.
आज आपण आपल्या जीवनावर चिंतन करुया की समाजात अनेक माणसे परिस्थितीनुसार निराशेच्या गर्तेत गेलेली आहेत. त्यांना आपल्या सहाय्याची व प्रोत्साहनाची गरज आहे. आपले ख्रिस्ती जीवन फलदायी बनण्यासाठी आपण सतत आव्हानांना सामोरे जाऊन संत पौल सांगतो त्याप्रमाणे धीराने आणि संयमाने जीवन जगण्यासाठी आज प्रभूची प्रेरणा मागूया.
✝️
पहिले वाचन : २ करिंथ ६:१-१०
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आमची लायकी पटवून देतो."
आम्ही देवासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. कारण तो म्हणतो, “अनुकूलसमयी मी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले." पाहा, आताच समय अनुकूल आहे; आताच तारणाचा दिवस आहे. आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही, तर सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेचप्रसंगात, फटके खाण्यात, बंदिवासात, दंग्याधोप्यात, काबाडकष्टात, जागरणात, उपवासात; तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने आणि उजव्या आणि डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी, गौरवाने आणि अपमानाने, अपकीर्तीने आणि सत्कीर्तीने, आम्ही आपली पात्रता पटवून देतो. फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे; अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध; मरणोन्मुख असे मानलेले तरी पाहा, आम्ही जिवंत आहो; शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी जिवे मारलेले नाही; दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे; दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे; कफल्लक असे मानलेले तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली पात्रता पटवून देतो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९८ :१-४
प्रतिसाद : परमेश्वराने आपला विजय जगजाहीर केला आहे.
१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे.
२) परमेश्वराने आपला विजय जगजाहीर केला आहे. राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया आणि आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे.
३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा,जयजयकार करा; उच्च स्वराने आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ५:३८-४२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात' असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू जुन्या करारातील 'डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात' ह्याचा संदर्भ देत आहे. त्याचा अर्थ काय? तर जुन्या करारात अशी शिकवण होती की, पुढील व्यक्तीने तुमचे जेवढे नुकसान केले असेल फक्त तेवढेच तुम्ही त्या व्यक्तीचे नुकसान करावे. म्हणजेच पुढील व्यक्तीने तुमच्या एका डोळ्याचे नुकसान केले असेल तर तुम्ही जाऊन फक्त त्याच्या एका डोळ्याचेच नुकसान करावे व त्यापेक्षा जास्त काही करू नये अशी त्यावेळची शिकवण होती. परंतु प्रभू येशू मात्र त्यापुढे जाऊन एक जगावेगळी शिकवण देत आहे की, दुष्टाला विरोध करू नकोस, त्याला अडवू नकोस तर सहन कर. अर्थात हे ऐकणे सोपे आहे परंतु करणे जड आहे. परंतु येशूने स्वतः ते फक्त बोलून न दाखवता ते करूनही दाखवले. त्याने दुष्ट शिपायांना अडवले नाही तर त्यांचे सहन केले, अगदी कुसापर्यंत सहन केले. परंतु शेवटी तोच क्रुसावर विजयी झाला, तो पुनरुत्थित झाला. म्हणजेच प्रभू आपल्यालाही हेच सांगत आहे की जो कोणी सहन करील, अगदी धीराने सहन करील त्याला जरी जेथे त्रास झाला तरी तो येशूच्या पुनरुत्थानातही वाटेकरी होणार आहे. प्रभू येशूची शिकवण अंगिकारून आपण सहनशील बनावे म्हणून त्याच्याकडे कृपा मागू या.
प्रार्थना: हे प्रभू येशू ख्रिसता, आम्हाला प्राप्त दानांचा आम्ही योग्य तो वापर करुन गरजवंतांना मदत करता यावी म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या