सामान्य काळातील
अकरावा सप्ताह
मंगळवार
१५ जून २०२१
संत जर्मेन कझीन
- कुमारिका (१५७९-१६०१)
✝️
संत पौल सुवार्ता प्रसार करीत असतांना गरजवंतांच्या साहाय्यासाठी करिंथकरांसमोर दान मागतो कारण त्यातूनच परोपकाराचा संदेश तो देत होता. आपण केवळ स्वतःवरच नव्हे तर देवावर आणि आपला बंधुभगिनींवर सुद्धा करावी असा संदेश संत पौलाने आपल्या वाणीद्वारे आणि आचरणद्वारे दिला.
प्रभू येशूची शिकवण त्या काळच्या प्रवाहाविरूद्धची होती. प्रभू येशू खऱ्या प्रेमाची शिकवण देत आहे. प्रभू येशूने सर्वांवर खारखीच प्रीति केली. क्रुसावरील बलिदानाद्वारे प्रभूने दाखवून दिले आहे की प्रभू स्वतः त्याग आणि समर्पणाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. प्रभूने आपल्या सर्व मारेकऱ्यांना क्षमा करुन त्यांच्यासाठी परमेश्वरपित्याकडे प्रार्थना केली. आपल्या सर्वांच्या तारणासाठी समेटाचा बली अर्पण केला व देवा बरोबर आपला समेट घडवून आणला. म्हणूनच प्रभू येशू आज आपल्या समोर आव्हानात्मक संदेश देत आहे की, 'तुमचा स्वर्गीय पिता जसा पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा' कारण सर्वांगपूर्णशील वैऱ्यावर प्रीति करण्यात आणि त्यांच्यासाठीप्रार्थनाकरण्यातच सामावलेले आहे. परमेश्वराठायी कुठलाच भेदभाव नाही. तो सर्वांवर आपला सुर्य उगवतो आणि सर्वांवर पाऊस पाडतो, आपण प्रभूसारखे परिपूर्ण बनण्याचा सतत प्रयत्न करायला हवा.
संत पौल ने म्हटले आहे, 'प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीति हेवा करीत नाही, प्रीति बढाई मारीत नाही, फूगत नाही, प्रीति अंतर देत नाही. (१ करिंथ १३:४४७
✝️
पहिले वाचन : २ करिंथ ८:१-९
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त तुम्हाकरिता गरीब झाला. "
बंधूंनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवतो की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद आणि त्यांची कमालीची गरिबी, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली. कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे आणि शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. त्यांनी आम्हांजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यास आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. आम्हांला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर प्रथम त्यांनी आपणा स्वतःला प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. ह्यावरून आम्ही तीतजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेचा आणि कार्याचा शेवटही करावा. तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था आणि आम्हावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहा, तसे कृपेच्या या कार्यातही असावे.
हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हांकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४६ :२,५-९
प्रतिसाद : हे माझ्या मना, परमेश्वराचे स्तवन कर.
१ ) माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन, मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.
२) ज्याच्या सहाय्याकरिता याकोबचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्यावर आहे, तो धन्य! त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले.
३) तो सदा आपले सत्यवचन पाळतो, तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो.
तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.
४ ) परमेश्वर आधळ्यांना दृष्टी देतो, परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो, परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो, अनाथ आणि विधवा यांची दाद घेतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ५:४३-४८
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
" आपल्या वैऱ्यांवर प्रीती कर."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “आपल्या शेजाऱ्या प्रीती कर व आपल्या वैयचा द्वेष कर, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर आणि अनीतिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात, त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना ? तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता ? परराष्ट्रीयही तसेच करतात ना ? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा..
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आपल्यापैकी काही जणांना असे वाटते की आपण जणू ह्या जगात पुष्कळ पैसा कमावण्यासाठी, पुष्कळ धनदौलत जमवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठीच काही आलो आहोत. परंतु प्रभू येशू मात्र आज आपल्याला आपले पृथ्वीवरील येण्यामागचे मुख्य ध्येय किंवा उद्देश स्पष्ट करून सांगत आहे व ते ध्येय म्हणजे, 'जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा'. म्हणजेच जगात वावरत असताना आपला आदर्श एखादी अतिश्रीमंत व्यक्ती किंवा अतिशय यशस्वी व्यक्ती नसावी तर आपल्या डोळ्यासमोरील आदर्श खुद्द स्वर्गीय पिता असावा, आपण त्याच्यावर लक्ष ठेवून जीवन जगावे, परिपूर्णतेकडे वाटचाल करावी असे प्रभू आपल्याला सांगत आहे. आज आपण आपल्या जीवनावर चिंतन करूया की माझ्या डोळ्यांसमोर मी कोणाचा आदर्श ठेवला आहे? मी कोणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे? मी कोणासारखे जीवन जगण्यास प्रयत्नशील आहे ? प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे मी स्वर्गीय पित्यासारखे परिपूर्ण बनण्यास प्रयत्नशील असावे म्हणून प्रभूकडे विशेष बळ मागू या.
प्रार्थना: हे प्रभू येशू आमच्या वैऱ्यावर देखिल प्रीति करण्यास व तुझ्याशी प्रमाणिक राहण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या