सामान्य काळातील
अकरावा सप्ताह
बुधवार
१६ जून २०२१
संत जॉन फ्रान्सिस रेजिस
हे माझ्या देवा ! तुझ्या पवित्र नावासाठी आणखी आत्मक्लेश भोगण्याची संधी मला दे, ह्या दुःखसहनात किती आनंद आहे ! मी आता सुखाने मरणाला सामोरा जाईन.-संत जॉन रेजिस.
✝️
“तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा.'
'संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.' आपण आपले दान देताना दुःखी मनाने देऊ नये कारण सर्व समर्थ देव आपल्यावर विपूल प्रमाणात कृपा दानांचा वर्षाव करीत असतो.
आपण खूप धार्मिक आहोत, भक्तीमान आहोत व दानशूर आहोत, असे दाखविण्याचा काहीजण प्रयत्न करित असतात. प्रभू येशूच्या काळी अशा प्रकारचे धर्माचरण व ढोंग करणारी माणस होती. आपले धर्माचरण, दानधर्म, प्रार्थना व उपवास त्यांच्या सारखे नसावेत म्हणून ख्रिस्तप्रभू आपणास मार्गदर्शन करीत आहे.
परमेश्वर सर्वस्थळी व सर्वज्ञ आहे, पण तो अदृश्य म्हणजेच गुप्तदर्शी आहे. परमेश्वर अंतर्यामी आहे म्हणून आपला प्रत्येक विचार शुद्ध अंतःकरणापासून करायला हवा. आपले धार्मिक आचारण माणसांनी पाहावे म्हणून न करता परमेश्वर पिता संतुष्ट व्हावा म्हणून करायला हवे. आपली सात्विकता, आचारण, प्रार्थना, दानधर्म व उपवास परमेश्वर पित्याला प्रिय असेल तरच परमेश्वर आपल्यावर कृपादानांचा वर्षाव करील.
✝️
पहिले वाचन : २ करिंथ ९:६-११
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो."
हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.
“तो चहूकडे वाटप करत असतो, गरिबांना दानधर्म करत असतो; त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते.” असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो आणि खाण्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवील आणि ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११२ :१-४, ९
प्रतिसाद :जो मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतो तो धन्य!
१) परमेश्वराचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.
२) धनसंपदा त्याच्या घरी असते, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो, त्याच्या ठायी कृपा, दया, आणि न्याय ही आहेत.
३) त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील; त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ६:१-६, १६-१८
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही.
"जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात आणि रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू नये; अशारीतीने तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल.
“तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे करू नका, लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानांत आणि चवाठ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे ढोंगी लोकांना आवडते. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शीपिता तुला तिचे फळ देईल.
“तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, आपण उपास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विद्रूप करतात. मी तुम्हांला नक्की सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू; अशा हेतूने की, तू उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आजच्या पहिल्या वाचनात तसेच शुभवर्तमानातही आपल्याला खरा दानधर्म म्हणजे काय ह्याविषयी ऐकायला मिळते. पहिले वाचन आपल्याला सांगते की 'संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो'. म्हणजेच दानधर्म करताना आपल्याला तो करावा लागतो म्हणून करू नये तर तो अगदी आनंदी मनाने करावा. ह्याचाच अर्थ असा की दानधर्मामुळे आपण काही गमावत आहोत अशी आपली भावना नसावी तर त्यामुळे परमेश्वराचा आपण आशीर्वाद कमावत आहोत अशी आपली भावना असायला हवी. त्याचप्रमाणे शुभवर्तमानात प्रभू येशू सांगत आहे की, तुम्ही दानधर्म करताना लोकांनी आपली वाहवा करावी किंवा त्यांनी आपली स्तुती करावी म्हणून दानधर्म करू नका तर तुमचा दानधर्म गुप्तपणे करा जेणेकरून तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्यावर प्रसन्न असावे. म्हणजेच प्रभू येशू आपल्या मनावर हेच बिंबवण्याचे प्रयत्न करीत आहे की, तुम्ही दानधर्म अथवा इतर कोणतीही सत्कृत्ये करताना लोकांना दाखवण्यासाठी ती करू नका कारण तसे केले तर तुम्हाला परमेश्वराकडे त्याचे प्रतिफळ मिळणार नाही. परंतु तुम्ही हीच सत्कृत्ये गुप्तपणे केली तर जरी तुम्हाला लोकांकडून वाहवा मिळाली नाही तरी स्वर्गात पित्याजवळ तुमचे प्रतिफळ नक्कीच मोठे असणार आहे. आपण प्रभूच्या वचनाप्रमाणे, गाजावाजा न करता आपले कार्य करीत राहावे म्हणून कृपा माणू या.
प्रार्थना: हे सर्व चांगुलपणाच्या उगमा, आमचे आचरण, प्रार्थना, दानधर्म व उपवास शुद्ध आणि पवित्र हेतूने करण्यासाठी आम्हाला तुझी कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या