सामान्य काळातील
अकरावा सप्ताह
गुरुवार
१७ जून २०२१
संत ग्रेगरी बार्बारिगो
- महागुरू, वर्तनसाक्षी (१६२५-१६९७)
✝️
“आमची रोजची भाकर आज आम्हांस दे”
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू परमेश्वर पित्याकडे आपण कशी प्रार्थना करावी ह्याविषयी मार्गदर्शन करीत आहे.
आजच्या शुभवर्तमानातील प्रार्थनेच्या प्रत्येक वाक्यावर खूप चांगले मनन चिंतन आणि स्पष्टीकरण करता येण्यासारखे आहे. ह्या प्राथनेतील 'आमची रोजची ' भाकर आज आम्हास दे' ह्या वाक्यावर आपण आज चिंतन करणार आहोत. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसासाठी निसर्गात परमेश्वराने भोजनाची व्यवस्था केलेली आहे. (अपवाद काही अवर्षणग्रस्त भागात टंचाई आहे.) कष्ट करुन आपली रोजची भाकर आपण मिळवायची आहे. प्रभू म्हणतो असे मागा की, 'दररोजची भाकर आज आम्हाला दे'. म्हणजेच रोजचे अन्न रोज मिळवायचे आहे. आपण धान्यलोभी आणि धनलोभी बनणे कितपत योग्य आहे, ह्यावर चिंतन करू या. जगात जेथे अवर्षण किंवा दुष्काळ आहे अशा ठिकाणी माणसे भूकेने व्याकूळ आहेत त्यांना सहाय्य करण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या साठविलेल्या धान्याचा व धनाचा सदूपयोग आपण त्यासाठी करू शकतो.
✝️
पहिले वाचन : २ करिंथ ११:१-११
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“मी देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हांस सांगितली."
माझा थोडासा वेडेपणा तुम्ही समजून घेतला तर बरे आणि ते तुम्ही करतच आहा. तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वरप्रेरित आस्था आहे. मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशारीतीने तुम्हाला शुद्ध कुमा असे ख्रिस्ताला सादर करावे. जसे सापाने कपट करून एवेला ठकवले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपणे शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील ह्याची मला भीती आहे. कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्हांला मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता, अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता, तर ह्यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे. अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही असे मी मानतो. मी जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही, हे आम्ही सर्व लोकांत आणि सर्व प्रकारे प्रकट केले.
तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हांला सांगितली, हे मी पाप केले काय? मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळींपासून वेतन घेऊन त्यांना लुटले आणि मी तुम्हांजवळ असता मला.उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही, कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली. कोणत्याही प्रकारे तुम्हांवर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो आणि जपेनही. ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठायी आहे आणि मी सांगतो की, माझ्या ह्या अभिमानास अखाया प्रातांत प्रतिबंध होणार नाही. मी का बरे जपावे ? मी तुम्हावर प्रीती करीत नाही म्हणून काय ? देवाला हे सारे ठाऊक आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १११ :१-४, ७-८
प्रतिसाद : प्रभो, तुझी कृत्ये न्याय्य आणि सत्य आहेत.
१) परमेश्वराचे स्तवन करा,सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.
२) त्याची कृती साक्षात मान आणि महिमा आहे, त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते, आपल्या अद्भुत कृत्याचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे. परमेश्वर दयाळू आणि कनवाळू आहे.
३) त्याची कृत्ये न्याय्य आणि सत्य आहेत; त्याचे सर्व आदेश विश्वसनीय आहेत, ते सत्याने आणि सरळपणाने नेमलेले आहेत. ते सदासर्वकाळ अढळ असे आहेत,
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ६:७-१५
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोलला म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच, जाणून आहे.” ह्यास्तव तुम्ही ह्याप्रकारे प्रार्थना करा: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या देणेकऱ्यांस देणे सोडले आहे तशी तू आमची देणी आम्हास सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाइटापासून सोडव.” “कारण जर तुम्ही लोकांना त्याच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- एकदा एका छोट्या मुलीला चॅपलमधून बाहेर येत असताना एका माणसाने पाहिले. एवढ्या छोट्याशा मुलीला चॅपलमधून येताना पाहून त्या माणसाला फार आश्चर्य वाटले. तो त्या मुलीकडे गेला व त्याने तिला विचारले, 'तू काय मागायला देवाकडे गेली होतीस?' त्यावर ती छोटी मुलगी उत्तरली, 'मी काही मागायला नाही, तर देवाजवळ बसायला गेली होती. किती सुंदर उत्तर! आपण बऱ्याच वेळेस देवाकडे फक्त मागतच असतो. प्रार्थना म्हणजे फक्त देवाजवळ मागणे असाच जणू काही आपला समज झालेला असतो. परंतु ती मुलगी सांगते त्याप्रमाणे प्रार्थना म्हणजे फक्त देवाजवळ मागणेच नाही तर त्याच्याजवळ बसणे, त्याच्या सहवासात राहणे, त्याच्या प्रेमाचा अनुभव घेणे असेही आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला जणू हेच सत्य सांगत आहे की तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा फक्त बडबड करीत राहू नका, पुष्कळ मागत बसू नका कारण तुमच्या मागण्या परमेश्वर तुम्ही मागण्यापूर्वीच जाणून आहे. म्हणूनच तो आपल्याला आमच्या स्वर्गीय बापा ही सुंदर प्रार्थना शिकवतो. मी प्रार्थना करतो तेव्हा फक्त मागत बसतो की त्या मुलीसारखे देवाजवळ बसण्यासाठी, त्याच्या सहवासाचा अनुभव घेण्यासाठीही वेळ काढतो ?
प्रार्थना: हे आमच्या स्वर्गीय पित्या, ही प्रार्थना शक्य होईल तितक्या हळूवारपणे व चिंतनपर पद्धतीने करु या.
0 टिप्पण्या