सामान्य काळातील
अकरावा सप्ताह
शुक्रवार
१८ जून २०२१
संत मार्क व मार्सेलियन
- रक्तसाक्षी ( २८७)
✝️
“पृथ्वीवर नव्हे तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा.”
आजच्या पहिल्या वाचनात संत पौलावर संकटे, अडचणी, त्याच्यावर झालेले अत्याचार, छळ, तसेच सुवार्ता प्रसारासाठी सहन केलेली ऊपासमार अशा सर्व आपत्ती मध्ये संत पौलाने प्रभू येशूची देवराज्याची सुवार्ता घोषविली आणि स्वर्गराज्याच्या संपत्तीचा संत पौल वारसदार बनला.
आजच्या विज्ञान युगात आपण खूप प्रगती केली आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मुलभूत गरजा संपत्ती, पैसा मिळविण्यासाठी आयुष्याचा बराच काळ खर्ची घालतो. आपण सर्वजण ह्या जगातील प्रवासी आहोत. जगातील सर्व संपत्ती आणि वैभव नाशवंत असून आपले जीवन सुद्धा क्षणभंगूर आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या प्रत्येकाला सांगत आहे. 'पृथ्वीवर नव्हे तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा.' आपण सर्वजण स्वर्गीय संपत्तीचे वारसदार आहोत. ही स्वर्गीय संपत्ती मिळविण्यासाठी प्रभू येशूच्या वचनानुसार आपले धर्माचरण व त्याच्या सुवार्ता प्रसारासाठी संत पौला सारखे त्यागमय जीवन जगणे आवश्यक आहे.
परोपकार, सेवा आणि दानधर्म ह्याद्वारे आपण त्यागमय जीवन जगू शकतो. त्याच बरोबर सुवार्ता प्रसारासाठी वाटेल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन स्वर्गीय संपत्तीचे वारसदार बनू शकतो. आपल्याला ह्या जगातील गोष्टीची गरज आहेच पण मृत्यूनंतर सर्वकाळचे जीवन लाभावे म्हणून आध्यात्मिक संपत्तीचा साठा करणे आवश्यक आहे. आपण आपल्या जागतिक संपत्तिचा त्याग करायला तयार आहोत का?
✝️
पहिले वाचन : २ करिंथ ११:१८,२१-३०
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“ह्या आणि इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे रोजचे ओझे, म्हणजे सर्व मंडळींविषयीची चिंता, ही आहे."
देहस्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात म्हणून मीही प्रौढी मिरवीन. मी तर शरमेने म्हणतो की, त्याबाबतीत फार दुर्बळ पडलो आपण
तरी ज्याबाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे हे मी निर्भीडपणे बोलतो. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्राएली आहेत काय? मीही आहे. ते आब्राहाम संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळासारखे बोलतो; श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे आणि पुष्कळवेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे, मी अधिक आहे. पाच वेळा मी यहुद्यांच्या हातून एकूण चाळीस फटके खाल्ले, तीनवेळा छड्यांचा मार खाल्ला, एकदा मला दगडमार झाला. तीन वेळा माझे गलबत फुटले आणि एक दिवस आणि एक रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरली संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवानी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूनी आणलेली संकटे, श्रम आणि कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपासतापास, थंडी आणि अपुरी वस्त्रे, ह्या सर्वांमुळेमी अधिक आहे. शिवाय ह्या आणि अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे रोजचे ओझे, म्हणजे आपल्या मंडळ्यांविषयींची चिंता, ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळवला गेला तर मला संताप येत नाही काय ?
मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३४ :२-७
प्रतिसाद : परमेश्वर नीतिमानांना संकटातून मुक्त करतो.
१)मी परमेश्वराला सर्वदा धन्यवाद देईन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल; माझा जीव परमेश्वराच्याठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करतील.
२) तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला;त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले.
३) ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले; त्याची मुखे लज्जेने कदापि काळवडंणार नाहीत. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले..
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ६:१९-२३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल.”
येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात; तर स्वर्गांत आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करत नाहीत आणि चोर घरफोडी करत नाहीत. आणि चोरीही करत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मन लागेल.“डोळा शरीराचा दिवा आहे. ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल, पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल, ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार महाभयंकर आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- 'जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.' शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले. प्रभु येशू आजच्या शुभवर्तमानात आपल्याला पृथ्वीवर संपत्ती साठवण्यापेक्षा स्वर्गात संपत्ती साठवण्यासाठी आवाहन करीत आहे. आपण आपले दैनंदिन जीवन जगत असताना कशाला प्राधान्य देतो ह्याविषयी तो आपल्याला चिंतन करावयास सांगत आहे. पैसा, संपत्ती ही नाश पावणार आहे, परंतु आपण केलेली सत्कृत्ये ही आपल्या मरणानंतरही आपल्याला साथ देणार आहेत. आणि त्यामुळेच प्रभू येशू सांगतो की तुम्ही पृथ्वीवर संपत्ती साठवण्याच्या मागे लागाल तर कदाचित सत्कृत्ये करण्याचे विसराल व शेवटी तुमच्या हाती घोर निराशा येईल. कारण तुम्ही कमावलेला पैसा व संपत्ती तुम्हाला येथेच सोडून जावे लागेल व सत्कृत्ये न केल्याने शेवटीसार्वकालिक जीवनही तुमच्या हातून निघून जाणार आहे. आज आपण आपल्या जीवनावर मनन करू या, की मी माझे जीवन जगत असताना माझी नजर स्वर्गातील सार्वकालिक जीवनावर आहे की पृथ्वीवरील ऐहिक जीवनावर ? आपण पृथ्वीवरील फक्त प्रवासी आहोत, निवासी नाहीत हे सत्य जाणून घेऊन त्यानुसार आपले जीवन जगावे म्हणून प्रभूकडे कृपा मागू या.
प्रार्थना: हे प्रभू येशू, नाशवंत संपत्तीचा मोह मला टाळता यावा आणि चांगले ख्रिस्ती जीवन जगून स्वर्गीय संपत्तीचे वारसदार बनण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या