Marathi Bible Reading | 11th Week in Ordinary Time | Saturday 19th June 2021

         सामान्य काळातील 

अकरावा सप्ताह 

शनिवार 

 १९ जून २०२१


संत रोमाल्ड

- मठाधिकारी, वर्तनसाक्षी (९५२-१०२७)

हे प्रिय येशू ! हे माझ्या प्रिय येशू! मला व्यक्त करता येणार नाही अशी तू माझी अदम्य इच्छा आहेस ! तू माझा आनंद आहेस ! तू दुतांचा आनंद आहेस! तू संतांचे माधुर्य आहेस! - संत रोमाल्ड
✝️

“चिंता करीत बसू नका.

मानवाला सुखाने जगता यावे म्हणून देवाने संपूर्ण सृष्टीमध्ये सर्व  वस्तुंचा साठा ठेवलेला आहे. आपली बुद्धीमत्ता व शहाणपणा वापरुन त्याचा योग्य तो उपभोग आपण घ्यायचा आहे. आपल्या जिवाला व आपल्या शरीराला  सूख देण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा अशा मूलभूल गोष्टींची गरज आहे. ह्या सर्व  गोष्टी निसर्गातच आहेत ह्याची जाणीव प्रभू येशू आज करुन देत आहे.  आकाशातील पक्षी, पशू, रांगणारे सर्व पक्षी व जिव ह्या सर्वांना आपल्या अन्नाची व सुरक्षेची सोय करावीच लागते. देवाने त्यांच्यासाठीपण योग्य ती सुविधा तयार  केलेली आहे. मात्र आपण मानव आपल्या जिवाविषयी व जगण्याविषयी सतत चिंता करीत असतो.
 प्रभू येशू म्हणत आहे, 'पहिल्याने त्याचे राज्य व नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्याच्याबरोबर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.' देवाला आपल्या सर्व गरजा  ठावूक आहेत व योग्य वेळी तो सर्व गोष्टींचा पुरवठा करीत असतो. आपण  देवावरील श्रद्धेत दृढबनत आहोत का? आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे व वचनाप्रमाणे जीवन आचरण करतो का? आपण देवबरोबर व बंधुभगिनींबरोबर  प्रेमाने व समेटाने जीवन जगतो का ?

जीवनात चिंता करीत बसणे म्हणजे नकारात्मक विचारांना चालना  देण्यासारखे आहे. चिंता केल्यामुळे मानसिक समतोल ढासळतो व शारीरिक आजार बळावतात, म्हणूनच सकारात्मकतेने, नीतिने व विश्वासाने जीवन  जगण्यासाठी प्रयत्न करु या.

 
            ✝️             

पहिले वाचन :  करिंथ  १२:१-१०

वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन 

"मी आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. "

प्रौढी मिरवणे मला भाग पडते, तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टान्त आणि प्रकटीकरणे ह्याच्याकडे आता वळतो. ख्रिस्ताच्याठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला चौदा वर्षामागे तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते; (त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेह असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे) त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की, त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले. (सदेह) किंवा विदेह हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे) आणि माणसाने ज्याचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली. अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार; मी स्वतः विषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. जरी मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली तरी मी मूर्ख ठरणार नाही, कारण मी खरे तेच बोलेन, तथापि मी बोलत नाही; कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी समजू नये. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीराचा एक काटा, म्हणजे मला मार देण्यासाठी सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे; मी चढून जाऊ नये म्हणून त्याला ठेवण्यात आला आहे; हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली; परंतु त्याने मला म्हटले, "माझी कृपा तुला पुरे आहे,कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते." म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्यांची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, सकंटे ह्यात मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३४ :८-१३

प्रतिसाद :परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.

१ )परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो 
आणि त्यांचे संरक्षण करतो. 
परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा.
जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य!

२) परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा. 
कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. 
तरुण सिंहांनाही वाण पडते आणि त्यांची उपासमार होते,
पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही
 चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.

३ )मुलांनो या, माझे ऐका;
 मी तुम्हाला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवीन.
 सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा
आणि दीर्घायुष्य अपेक्षिणारा असा मनुष्य कोण ?


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे; तू आम्हाला सत्यात समर्पित कर. 
 
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ६:२४-३४

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

 "उद्याची चिंता करू नका. "

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.“ह्यांस्तव मी तुम्हाला सांगतो की, आपल्या जीवनाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही ? आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा, ती पेरणी करीत नाही, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयाला देतो, तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही ? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढविण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे ? तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता ? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात ? ती कष्ट करीत नाहीत आणि सूत कातीत नाहीत तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे आणि उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेषकरून तुम्हांला पोषाख घालणार नाही काय? ह्यास्तव 'काय खावे,' 'काय प्यावे,' 'काय पांघरावे,' असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या  सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पाहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.

“ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला. ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :असे म्हणतात की चिंता ही ॲसिडसारखी असते. ज्याप्रमाणे ॲसिड भांड्याला आतून पोखरत असते त्याचप्रमाणे चिंता काळजाला कुरतडत असते, ती माणसाची शांती व आनंदी जीवन उध्वस्त करीत असते. म्हणूनच प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात आपल्याला चिंता करण्यापासून सावध करीत आहे व देवावर पूर्ण भरवसा टाकण्याचे आवाहन करीत आहे. ह्यासाठी आजचे पहिले वाचन आपल्यासमोर एक आदर्श आहे. संत पौल आजच्या पहिल्या वाचनात आपणांस सांगत आहे की, त्याला अपमान, अडचणी, दुःख, संकटे व वेदना सोसाव्या लागल्या परंतु तो सांगतो की, तरीही मला संतोष आहे. संत पौल असे सांगत नाही की ह्या सगळ्या संकटामुळे मी चिंतेत आहे, तर तो उलट सांगतो की मला संतोष आहे. संत पौलला दुःख व संकटातही चिंतेऐवजी संतोष का होत होता? तर त्याची प्रभूवर अढळ श्रद्धा होती. मला कोणीही नाकारले, अगदी लाथाडले तरी माझा प्रभू मला कधीही अव्हेरणार नाही, नाकारणार नाही ह्याची त्याला पूर्ण खात्रीहोती. ही खात्री व प्रभूवरील अढळ श्रद्धाच त्याला चिंतेपासून दूर ठेवत होती. आपली प्रभूवर संत पौलइतकी श्रद्धा आहे का? की आपण चिंतेने घेरलेले आहोत? आपले चित्त आपण प्रभूकडे लावावे व त्याद्वारे आपण चिंतेपासून दूर असावे म्हणून प्रभूकडे कृपा मागु या.

प्रार्थना: हे प्रभू परमेश्वरा, आमच्या चिंता दूर कर व आम्हाला तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या