Marathi Bible Reading | 12th Sunday in Ordinary Time | 20th June 2021

          सामान्य काळातील 

बारावा 

रविवार 

 २० जून २०२१



✝️

“येशू वादळ शांत करतो.”

आजच्या पहिल्या वाचनात देव ईयोबाला त्याचे अज्ञान पटवून देत असताना देवाचे सामर्थ्य समजावून सांगत आहे. मोशेच्या काळी देवाने अग्नी स्तंभाने प्रजेला प्रकाश दिला, मेघस्तंभानी पांघरुण घातले व समुद्रात पाणी भींतीप्रमाणे उभे करुन समुद्रात रस्ता तयार केला. परमेश्वर सर्व सृष्टीचा निर्माता आहे व सर्व चराचरावर त्याचीच अधिसत्ता आहे.

आजच्या शुभवर्तमानात देवपुत्र प्रभू येशू आपल्या शिष्यांसोबत समुद्रात असताना समुद्रातील वादळ करतो. शिष्यांना प्रभू धीर देतो व आपला विश्वास बळकट करण्यास सांगत आहे. आपल्या जीवनात सुद्धा अनेक प्रकारची वादळे निर्माण होत असतात.  अशा वेळी धीर खचतो व मार्ग सुचेनासा होतो. प्रभू येशू देवपुत्र असून सर्वांवर त्याची अधिसत्ता आहे. निसर्ग त्याच्याच आज्ञेने चालतो म्हणूनच प्रभूचे सामर्थ्य महान आहे. प्रभू  शिष्यांना सांगत आहे, 'तुम्ही इतके भित्रे कसे ?', 'तुम्हाला विश्वास कसा नाही?' 
आपणा सुद्धा संकटसमयी शिष्यांसारखेच असतो, आपला प्रभूवरील विश्वास डळमळतो. मात्र प्रभू सर्वस्थळी, सर्व स्थितीत आपल्या सोबत असतो हेआपण विसरतो. प्रभू येशूने जसे समुद्रातील वादळ शांत केले तसेच आपल्या जीवनातील सर्व वादळे प्रभू शांत करण्यास समर्थ आहे. आपल्या जीवनात सुद्धा चमत्कार घडू शकतो. आपला विश्वास मात्र दृढहवा.

आपल्या जीवनातील प्रत्येक संकटात, आडचणीत, दुःखात व संकटात प्रभू येशू आपल्या सोबत आहे ही जाणीव ठेवू या आणि विश्वासाने जीवन जगण्यासाठी प्रभूकडे प्रेरणा मागू या. 
            ✝️             

पहिले वाचन : ईयोब  ३८:१,८-११

वाचक : इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत."

परमेश्वराने वावटळीतून इयोबला उत्तर दिले, “समुद्र उफाळून गर्भाशयातून पडावा असा बाहेर पडला, तेव्हा त्याला कवाडे लावून तो कोणी अडवला ? त्यासमयी मी त्याला मेघवस्त्राचे पांघरून घातले, दाट अभ्रांचे त्याला बाळंते केले, मी त्याची मर्यादा फोडून काढली आणि त्यास अडसर आणि दरवाजे लावले आणि मी म्हणालो, 'तू येथवरच ये, यापलीकडे तू येता कामा नये, येथे तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत.'

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १०७ :२३-२६, २८-३१

प्रतिसाद :परमेश्वराचे उपकारस्मरण करा.

१) जे गलबतात बसून समुद्रातून प्रवास करतात, 
महासागरात उद्योगधंदा करतात, 
ते परमेश्वराची कृत्ये, त्याची अद्भुत कृत्ये,
 भर समुद्रात पाहतात.

२) तो आज्ञा करून वादळ उठवतो, 
तेव्हा समुद्राच्या लाटा उसळतात, 
त्या आभाळापर्यंत वर जातात, 
तळापर्यंत खाली जातात; क्लेशाने 
त्याच्या जिवाचे पाणी पाणी होते.

३) तो संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात 
आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो. 
तो वादळ शमवितो, तेव्हा लाटा शांत होतात.

४) त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात 
आणि तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास नेतो. 
परमेश्वराच्या दयेबद्दल आणि 
त्याने मनुष्यांसाठी केलेल्या 
अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे 
उपकारस्मरण करोत.


दुसरे वाचन  २करिंथ ५:१२:१५

वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

" आता नवी उत्पत्ती झाली आहे. "

ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वासाठी मेला तर सर्व मेले आणि तो सर्वासाठी ह्याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला आणि पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे.
तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्याठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.

हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.



जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्याकडून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. 
 
आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ४:३५-४१

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"हा आहे तरी कोण ? वारा आणि समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात."

त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "आपण पलीकडे जाऊ या." मग लोकसमुदायाला सोडल्यावर, येशू मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले आणि लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की, तो पाण्याने भरू लागला. येशू तर मचव्याच्या मागील बाजूस उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, "गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय ?" तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, “उगा राहा, शांत हो.” मग वारा पडला आणि अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, "तुम्ही इतके भित्रे कसे ? तुम्हाला विश्वास कसा नाही ?" तेव्हा ते अतिशय घाबरले आणि एकमेकांना म्हणू लागले, “हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :जुने ते सोने आणि नवे ते हवे अशी दोन वेगवेगळ्या विचारसरणीच्या कात्रीत माणूस सापडलेला असतो. सर्वच जुने ते सोने असते का ? सर्वच नवे ते उपयुक्त असते का ? असे प्रश्न आपण विचारायला हवेत. जुने म्हणजे काळाच्या कसोटीला उतरलेले व अनुभव संपन्न असे मानता येईल तसेच नवे म्हणजे तोचतोपणा व चाकोरीबद्ध जीवनशैलीवर मात करणाऱ्या गोष्टी असेही मानता येईल. मात्र जुने म्हणजे कालबाह्य आणि नवे म्हणजे अपरिपक्व ही बाब केवळ वस्तूंना लागू करता येईल. ती व्यक्तींना लागू केली तर पिढ्यांतील अंतर अजूनही वाढू शकते. आजच्या वाचनात त्या दृष्टीने तीन नवीन विचार देण्यात आलेले आहे. 
१) सोन्याची परीक्षा अग्नीत होते : इयोब हा तसा नीतिमान होता. त्याच्यावर चहूकडून संकटे आली. त्या संकटांचा सामना करताना त्याने परमेश्वरावरील श्रद्धेला तडा जाऊ दिला नाही. 'देवाने दिले, देवाने नेले, देवाचे नाव धन्य!' असे परिपक्व, अनुभवसंपन्न व्यक्तीचे उद्गार आपल्याला अंतर्मुख करतात. ज्या गोष्टी व ज्या व्यक्ती दुःख-संकटाच्या मुशीतून तावून सुलावून निघालेल्या असतात त्याच 'जुने ते सोने' ह्या वर्गवारीत मोडतात. 
२) ख्रिस्ताठायी सर्व गोष्टींचे नूतनीकरण होते : 'जुने ते होऊन गेले आहे. पहा, ते नवीन झाले आहे' अशा शब्दात संत पौल करिंथच्या लोकांना ख्रिस्ताठायी सर्व गोष्टींचे नूतनीकरण करण्याचा सल्ला दिला. नवी दृष्टी, नवा विचार, नवा उत्साह, नाते संबंधांचे नूतनीकरण, वचनांचे नूतनीकरण, जीवनशैलीचे नूतनीकरण हे नव्या कपड्यांप्रमाणे, नव्या घराप्रमाणे, नव्या नात्याप्रमाणे सातत्याने होत राहाणे गरजेचे असते. 
३) जुनी वादळे शांत झाल्याशिवाय नवी शांती अनुभवता येत नाही : आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू वादळ शांत करतो. वादळ सुरू असताना पट्टीचे पोहणारे कोळी घाबरून गेले होते आणि येशू तर निवांतपणे झोपी गेला होता. येशूच्या केवळ एका शब्दाने वादळ शांत झाले. शिष्यांना येशूठायी एक नवे व्यक्तिमत्त्व दडल्याची नवी दृष्टी मिळाली. पुढे कधीही वादळ झाले असते तरी हे शिष्य घाबरलेनसते. कारण एक वादळ शांत झाले तेव्हा आयुष्यभर पुरणारी शांती अंतःकरणात भरभरून ओसंडून वाहू लागली होती.

आत्मपरीक्षण : जुने व नवे याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोण कसा आहे? तात्पुरते नवे आणि कायमस्वरूपी जुने यापैकी कोणते निवडणे आपण पसंत करतो? नवी शांती अनुभवण्यासाठी मला कोणती जुनी वादळे शांत केली पाहिजेत ? ख्रिस्ताठायी कोणकोणत्या गोष्टींचे मी नूतनीकरण करण्याची गरज आहे ?

प्रार्थना: हे प्रभू परमेश्वर, आमची जीवननौका सुखरुप पैलतीरी घेऊन जाण्यास सहाय्य कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या