Marathi Bible Reading | 12th Week in Ordinary Time | Monday 21st June 2021

          सामान्य काळातील 

बारावा सप्ताह 

सोमवार 

 २१ जून २०२१



संत अलॉयशिअस गोन्झागा
- वर्तनसाक्षी (१५६८-१५९१)

आपला जन्म कोणत्या घराण्यात झालेला आहे त्यावरून आपली महानता ठरत नाही. राजे आणि रंक दोघांची एक दिवस माती होणारच आहे ना!
- संत अलॉयशिअस गोन्झागा •

✝️

तुम्ही कोणाचे दोष काढू नका"

 देवाच्या आज्ञेप्रमाणे आब्राहाम श्रद्धेच्या प्रवासाला निघाला आणि देवाने त्याला आश्वासनपूर्वक आशीर्वाद देत म्हटले, 'मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन'. अगदी वृद्धावस्थेत असताना देखील आब्राहामाने देवाची आज्ञा पाळली.
शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणत आहे, 'तुम्ही कोणाचे दोष काढू नका’.आपल्यामध्ये कदाचित जास्त दोष आसु शकतात. इतरांचे दोष  काढून त्यांना तुच्छ समजण्या ऐवजी आपण स्वतः किती सात्विक आहोत हे तपासून पाहायला हवे. दोष काढण्या ऐवजी आपण इतरांमध्ये चांगले काय  आहे ते शोधावे. त्या चांगल्या गुणांबद्दल त्यांची प्रशंसा केल्याने समोरची व्यक्ती प्रसन्नतेने चांगले कृत्य करण्यास प्रवृत्त होऊ शकते. प्रभू येशू आज पुढे जाऊन म्हणत आहे की, 'तुम्ही ज्या मापाने मापून द्याल तसेच तुम्हालाही मापून देण्यात येईल'. म्हणूनच आपण संयमाने आणि समतोल साधून परस्पर संबंध जोपासण्यासाठी सकारात्मकतेने जीवन जगणे जास्त फायद्याचे आहे.

देवावरील विश्वासात वाढत राहून सकारात्मतेने आणि बंधुप्रीतिची आज्ञा पाळून सर्व समावेशक प्रगती साधण्यासाठी इतरांना दोष न लावता आपण चांगले जीवन जगू शकतो. इतरांबद्दल चांगले ते बोलण्यास व चांगले तेच पसरविण्यास आपल्याला सुबुद्धी लाभावी म्हणूच आज प्रार्थना करु या. 
            ✝️             

पहिले वाचन :  उत्पत्ती १२:१-९

वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन १२:१-९

"परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला."

परमेश्वराने अब्रामला सांगितले, "तू आपला देश, आपले नातेवाईक आणि आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील, तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”
परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला आणि त्याच्याबरोबर लोट गेला. हारान येथून निघतेवेळी अब्रामचे वय पंचाहत्तर वर्षांचे होते. आपली बायको साराय, आपला पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला आणि लवकरच ते कनान देशात जाऊन पोहोचले. अब्राम त्या देशातून शखेमच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापाशी गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहात होते. मग परमेश्वर अब्रामला दर्शन देऊन म्हणाला, "हा देश मी तुझ्या संतानाला देईन.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली. मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते आणि पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. तेथून निघून अब्राम प्रवास करीत नेगेबकडे गेला.'

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३३ :१२-१३, १८-२०,२२

प्रतिसाद : ज्या लोकांना परमेश्वराने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!

१) ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!
परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखतो.

२) जे परमेश्वराचे भय धरतात आणि त्याच्या दयेची अपेक्षा करतात, त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.

३) आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे.
आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे. हे परमेश्वरा,
आम्ही तुझी आशा धरली आहे,
म्हणून आम्हावर तुझी कृपादृष्टी असो.



जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमचे अंतःकरण प्रफुल्लित कर.
 
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ७:१-५

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारचे तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा 'तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे' असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील ? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पाहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :बऱ्याच वेळेस आपणांस दुसऱ्यांविषयी मीठमसाला लावून चर्चा करायला खूप बरे वाटते. अमुक एक व्यक्ती कशी वाईट आहे किंवा वाया गेलेली आहे असे म्हणत आपण त्यांच्याविषयी नाही ती चर्चा करत असतो व त्या चर्चेत आसुरी आनंद घेत असतो. परंतु प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की तू स्वतःच्या डोळ्यातले मुसळ न पाहता दुसऱ्यांच्या डोळ्यातले कुसळ का काढावयास पाहतो? म्हणजेच प्रभू येशू सांगत आहे की, तू दुसऱ्यांवर एक बोट करत असताना हे विसरू नकोस की हाताची इतर बोटे तुझ्याकडे इशारा करत आहेत. त्या व्यभिचारी स्त्रीला जेव्हा दगडमार केला जाणार होता तेव्हा प्रभू त्यांना सांगतो की ज्यांनी पाप केले नाही त्यांनी प्रथम दगड मारावा. ह्यामध्ये खूप तथ्य आहे. आपण प्रत्येकजण पापी आहोत परंतु आपणांस इतरांची पापे उघड करावयास आनंद वाटतो. आज प्रभू आपल्याला जणू सांगत आहे की इतरांच्या पापांविषयी चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या पापी वागणुकीविषयी चिंतन करा व त्याद्वारे स्वतःचे जीवन बदला. आपण दुसऱ्यांच्या पापांविषयी चर्चा वर्तणूक सुधारावी म्हणून करण्याऐवजी स्वतःची प्रभूची कृपा मागू या.

प्रार्थना:हे प्रभू येशू, इतरांची प्रशंसा करुन त्यांच्या गुणांची स्तुती करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या