सामान्य काळातील
बारावा सप्ताह
मंगळवार
२२ जून २०२१
संत जॉन फिशर व संत थॉमस मूर
- कार्डिनल बिशप आणि रक्तसाक्षी
✝️
“सुवर्ण नियम आणि जीवनाकडे जाण्याचा अरुंद दरवाजा.
आब्राहामाने आपला भाऊ लोट ह्याच्याबरोबर समजूतदारपणे तोडगा काढला व ते विभक्त झाले. आपल्या जीवनातील समस्या समोपचाराने कशा सोडवाव्यात ह्याचा आब्राहाम एक आदर्श घालून देत आहे.
आपल्या सहवासात असणाऱ्या व संबंध असलेल्या माणसांबरोबर आपण समंजसपणे, प्रेमळपणे व सहकार वृत्तीने वागावे यासाठी प्रभू येशू आजच्या शुभर्वतमानात एक सुवर्ण नियम आपल्याला देत आहे. प्रभू म्हणतो, 'लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा'. परस्पर संबंध दृढकरण्याचा आणि सर्वांबरोबर संबंध मजबूत करण्याचा हा सोपा नियम आहे. आपल्याबरोबर सर्वांनी प्रेमळपणे, सहकार्याने व शांतीने बोलावे व वागावे अशी आपली इच्छा असते. मात्र आपण सर्वाबरोबर तसे वागतो का, ह्यावर चिंतन करण्यासाठी प्रभू येशू आपल्याला आज बोलवित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने घालून दिलेला सुखी जीवनाचा हा सुवर्ण नियम आपण अमलात आणू या.
पहिले वाचन : उत्पत्ती १३:२,५-१८
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तुझ्या-माझ्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो."
अब्राम कळप, रुपे आणि सोने ह्यांनी संपन्न होता. अब्रामबरोबर लोट जात होता. त्याचीही मेंढरे, गुरेढोरे आणि पाले होती. त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एका स्थळी राहता येईना. शिवाय अब्रामच्या आणि लोटच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी आणि परिज्जी यांची वस्ती होती.
अब्राम लोटला म्हणाला, “हे पाहा, तुझ्या-माझ्यामध्ये आणि माझे गुराखी आणि तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो. सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर माझ्यापासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन; तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.” तेव्हा लोटने आपली दृष्टी फेकून यार्देनचे सर्व खोरे पाहिले तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम आणि गमोरा यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि इजिप्त देशासारखा होता. ही यार्देनची सर्व तळवट लोटने आपणासाठी पसंत केली आणि तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. अब्राम कनान देशात राहिला आणि लोट तळवटीच्या नगरातून राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमपाशी दिला. सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापापे करणारे होते. लोट अब्रामपासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे दृष्टी लावून पाहा, कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला आणि तुझ्या संततीला मी कायमचा देईन. मी तुझी संतती पृथ्वीच्या धुळीकणांसारखी करीन, कोणाला पृथ्वीवरील धुळीच्या कणांची गणना करता आली तर तुझ्या संततीची ही गणना होईल. ऊठ, या देशाची लांबीरुदी फिरून पाहा, कारण तो मी तुला देणार." मग अब्राम मुक्काम करीत करीत हेब्रोनजवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला, तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १५ :२-५
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील ?
१) हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र डोंगरावर कोण वस्ती करील?
जो सात्त्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो,
जो मनापासून सत्य बोलतो तो,
जो आपल्या जिभेने चुगली करत नाही तो.
२) तो आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही,
तो आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही,
तो अधर्माला तुच्छ लेखतो,
तो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो.
३) तो आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे
अहित झाले तरी ती मोडीत नाही,
तो आपला पैसा व्याजी लावत नाही,
तो निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही,
जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ७:६,१२-१४
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“लोकांनी जसे तुमच्यापाशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोत्ये डुकरांपुढे टाकू नका. टाकाल तर डुकरे ती मोत्ये कदाचित आपल्या पायांखाली तुडवतील आणि उलटून तुम्हांला फाडतील."
लोकांनी जसे तुमच्याशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्याच्याशी वागा, कारण नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच होत. “अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद आणि मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणरे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो असे ते थोडके आहेत.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला सुवर्णनियम देताना सांगतो की ‘लोकांनी जसे तुमच्याशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसे तुम्ही त्यांच्याशी वागा.' बऱ्याच वेळेस आपणांस असे वाटते की लोकांनी आपल्याला मान द्यावा, त्यांनी आपल्याला समजून घ्यावे, आपल्याला सहाय्य करावे, आपल्याशी अदबीने बोलावे, त्यांनी आपली काळजी घ्यावी. , परंतु लोकांकडून ह्या सर्व गोष्टींची अपेक्षा करत असताना आपण मात्र कधीकधी त्यांच्याशी त्याप्रमाणे वागत नाहीत. उलट आपण त्यांच्याकडून जी अपेक्षा ठेवतो अगदी त्याविरुद्ध आपण त्यांच्याशी वागत असतो. आपल्याला इतरांकडून ज्याप्रकारच्या वागण्याची अपेक्षा आहे तसेच आपणही इतरांशी वागावे ह्यासाठी प्रभूची कृपा मागू या. आज संत थॉमस मोर ह्यांचा आपण सन्मान करीत आहोत. त्याने ज्याप्रमाणे ख्रिस्तसभेच्या शिकवणूकीविरुद्ध जात असलेल्या राजा हेन्री आठवे ह्यांना विरोध करून ख्रिस्तसभेची व सत्याची बाजू घेत रक्तसाक्षित्व पत्करले त्याचप्रमाणे आपणही नेहमी सत्याची बाजू घ्यावी व ख्रिस्तसभेच्या शिकवणुकीचा आदर करावा म्हणूनही विशेष प्रार्थना करू या.
प्रार्थना:हे प्रभू येशू, तुझ्या नियमानुसार व आज्ञेनुसार जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन.
0 टिप्पण्या