Marathi Bible Reading | 12th Week in Ordinary Time | Wednesday 23rd June 2021

           सामान्य काळातील 

बारावा सप्ताह 

बुधवार 

 २३ जून २०२१


 संत जोसेफ काफस्सो
- वर्तनसाक्षी (१८११-१८६०) 

क्रुसावर मरण पत्करणारा ख्रिस्त तुम्हांमध्ये कधीही भीतीची भावना उत्पन्न करणार नाही. तो तुम्हांला कधी सोडून जाणार नाही. त्याच्याठायी भरवसा ठेवा आणि तुम्हाला निश्चितच सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.-संत जोसेफ काफास्सो

✝️

“प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते.” 

देवाच्या आज्ञेप्रमाणे व वचनाप्रमाणे श्रद्धेचा आदर्श असणाऱ्या आब्राहामाला देवाने महान आशीर्वाद दिला होता. आब्राहाम देवाच्या सर्व कसोटीतून पार गेला कारण तो सर्वस्वी देवाला शरण गेला होता. त्याने त्याचे सर्वस्व देवाठायी समर्पित केले होते. म्हणूनच त्याच्या जीवनात त्याला चांगली फळे लाभली. त्याची संतती व संपत्तीची भरभराट झाली. आब्राहाम श्रद्धेचा महान आदर्श ठरला.
जीवन फलदायी बनावे आणि सतत समृद्ध बनावे म्हणून प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात चांगले झाड आणि वाईट झाड ह्यांची उदाहरणे देत आहे. चांगले झाड म्हणजेच  श्रद्धावान, नीतिमान व भक्तिमान माणूस. अशा माणसाचा प्रत्येक विचार व कृती सकारात्मक असते. अशा माणसाच्या जीवनात परमेश्वराला अग्रस्थान असते. असा माणूस देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि वचनाप्रमाणे जीवन आचरण करण्यास प्रयत्नशील असतो. आपल्या जीवनात आलेल्या दुःख व संकटांना सामोरे जाऊन अपयश  पचविण्यासाठी तो प्रार्थनेद्वारे देवाबरोबर संवाद साधत असतो. स्वतःचे जीवन  फलदायी बनवित असतानाच इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्याची सतत धडपड चालू असते. ख्रिस्ती जीवनाचा आदर्श बनणाऱ्या अशा माणसाच्या  जीवनरुपी झाडाला चांगली फळे लागलेली आपण पाहतो. याऊलट वाईट झाड म्हणजेच, 'अंतरी क्रूर लांडगे' असणाऱ्या माणसांचे जीवन वाईट फळांनी भरलेले असते. अशी माणसे इतरांच्या जीवनात दुःख निर्माण करीत असतात.
आपण आज आपल्या जीवनरुपी झाडावर चिंतन करू या. 
 
            ✝️             

पहिले वाचन :  उत्पत्ती १५:१-१२,१७-१८

वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"अब्रामने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याच्या विश्वासाने तो नीतिमान ठरला. परमेश्वराने अब्रामशी करार केला. "

अब्रामला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे:“अब्राम, भिऊ नकोस, मी तुझी ढाल आहे; तुला मोठे प्रतिफळ मिळेल." अब्राम म्हणाला, " हे प्रभू, परमेश्वरा, तू मला काय देणार ? मी तर निःसंतान जाणार आणि दिमिष्की अलियेजर माझ्या घराचा मालक होणार." अब्राम आणखी म्हणाला, “आणि पाहा, तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार आहे.” तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, "हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल.” मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजता येतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल." अब्रामने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामच्या ह्या विश्वासामुळे परमेश्वरासमोर तो नीतिमान ठरला.
परमेश्वर त्याला म्हणला, " तुला हा देश वतन द्यावा म्हणून खास्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे.” पण अब्राम म्हणाला, “प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून?" त्याने त्याला सांगितले, "माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू घे.” त्याने ती सर्व घेतली आणि मधोमध चिरूनत्यांचे दोनदोन तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले, पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाहीत. त्या शवांवर हिस्र पक्ष्यांनी झडप घातली पण अब्रामने त्यांना हाकून दिले. 
सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामला गाढ निद्रा लागली तेव्हा घोर भीती, निबिड अंधार त्याच्यावर पडला.
नंतर सूर्य मावळला आणि निबिड अंधार पडला तेव्हा असे झाले की, धुमसती आगटी आणि जळती मशाल त्या शवांच्या तुकडयांमधून जाताना दिसली. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामशी करार करून सांगितले, " इजिप्तच्या नाईल नदीपासून ते महानदी फरात येथपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानांना देतो.”

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १०५ :१-४, ६-९

प्रतिसाद : परमेश्वर आपला करार सदैव आठवतो.

१ ) परमेश्वराचे उपकारस्मरण करा, 
त्याच्या नावाचा धावा करा, 
राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा, 
त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा;
त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. 

२) त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा, 
जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत 
त्यांचे मन हर्षित होवो.
परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा;
 त्यांच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.

३) त्याचा सेवक आब्राहाम ह्याच्या वंशजांनो, 
त्याने निवडलेल्या याकोबच्या वंशजांनो, 
परमेश्वर आपला देव आहे;
त्याची न्यायकृत्ये सर्व जगभर आहेत.

४) तो आपला करार म्हणजे हजारो पिढयांसाठी 
आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो,
हा करार त्याने आब्राहामशी केला. 
आणि त्याविषयी इसहाकजवळ शपथ वाहिली.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंत:चक्षू प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी.
 
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ७:१५-२०

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.”

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतर्यामी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय ? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकले जाईल अशी एक प्रकारे चेतावनी प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात आपल्याला देत आहे. आपणा प्रत्येकाला परमेश्वराने ह्या जगात रिकामी पाठवले नाही तर आपल्यावर अनेक दानांचा वर्षावही केलेला आहे. आपण ह्या दानांचा किंवा वरदानांचा वापर फक्त आपल्या स्वार्थासाठी न करता इतरांसाठीही करावा अशी आपणाकडून अपेक्षा आहे. जी व्यक्ती ह्या दानांचा वापर इतरांसाठी करते तीच विपुल प्रमाणात फळ देत असते. आपण कधीकधी काही लोक असे पाहतो की ते फक्त कमावण्याच्याच मागे लागलेले असतात. इतरांसाठी ते काहीच करायला तयार नसतात. ते फक्त स्वतःमध्येच गुरफटलेले असतात. असे लोक येथे पृथ्वीवर जरी सुखात राहत असल्याचे दिसत असले तरी योग्य फळ न दिल्यामुळे परमेश्वर त्यांचा न्याय करणार आहे. प्रभू येशू सांगतो त्याप्रमाणे असे झाड जणूकाही तोडून अग्नीत टाकण्यात येणार आहे. आपण आपले जीवन जगत असताना किती प्रमाणात फळ देत आहोत ह्यावर आज विशेष चिंतन करू या व आपल्याला योग्य प्रमाणात प्रभूला अपेक्षित असलेले फळ देता यावे म्हणून पवित्र मरियेच्या मध्यस्थीने प्रभूकडे आळवणी करू या.

प्रार्थना: हे प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वदा, सत्याचा, चांगुलपणाचा आणि तुझ्या आज्ञेचा पुरस्कार करुन आमचे व इतरांचे जीवन फुलविण्यास आम्हाला प्रेरणा व  शक्ति दे, आमेन. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या