Marathi Bible Reading | 12th Week in Ordinary Time | Thursday 24th June 2021

 सामान्य काळातील 

बारावा सप्ताह 

गुरुवार  

 २४ जून २०२१



योहान बाप्तिस्ताचा जन्म सोहळा 
दि. २९ ऑगस्ट रोजी देऊळमाता “संत योहान बाप्तिस्ताचा शिरच्छेद” हा सण साजरा करते. आजच्या दिवशी ख्रिस्तसभा संत योहान बाप्तिस्त ह्याचा जन्मदिन उत्सव पाळते.

ख्रिस्ती उपासना वर्षात फक्त तीन महनीय, वंदनीय पूजनीय व्यक्तींचे वाढदिवस साजरे केले जातात. प्रभू येशू ख्रिस्त (२५ डिसेंबर) पवित्र मरिया (८ सप्टेंबर) आणि संत योहान बाप्तिस्त (२४ जून).

✝️
 
“तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला.”

ख्रिस्तसभा आज योहान बाप्तिस्ताचा जन्मोत्सव साजरा करीत आहे. वयातीत असलेली अलिशीबा व जखऱ्या ह्यांना लाभलेले हे बाळ परमेश्वराची महान देणगी होती. योहानाच्या जन्माविषयीचे भाकीत आजच्या  यशयाच्या पहिल्या वाचनात स्पष्टपणे देण्यात आले आहे. सर्व राष्ट्रांसाठी प्रकाश असा नेमलेला योहान हा महान संदेष्टा होता.
यशयाच्या पुस्तकातील वचनांवर आपण आज विशेष चिंतन करु या. 'मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलाविले'. धन्य कुमारी  मरिया अलिशीबेला भेटायला गेली असतानाच अलिशीबेच्या उदरातील  बाळकाने (योहानाने) आनंदाने उडी मारली होती. अलिशीबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली होती. तिच्या मुखातून शब्द बाहेर पडले होते, 'माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ?' यशया संदेष्ट्याद्वारे देव म्हणतो,  'याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्त्राएलाच्या रक्षिलेल्यास लोकांस परत आणावे, म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमितो'. तारणाऱ्याचा मार्ग तयार करण्यासाठी योहानाने सर्वांना पश्चात्तापाचा व पाण्याचा बाप्तिस्मा दिला. योहान बाप्तिस्ताचा जन्मच ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी झाला होता.
 होय कारण परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर होता. तो परमेश्वराचा महान सेवक व संदेष्टा होता. योहानाप्रमाणेच आपल्या प्रत्येकाला देवाने प्रभूची सुवार्ता परसविण्यासाठी व ख्रिस्ताचा प्रकाश होण्यासाठी पाचारण केले आहे. संत योहान बाप्तिस्ताच्या जन्मोत्सवदिनी आपण ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करु या.  
 
            ✝️             

पहिले वाचन :  यशया ४९: १-६

वाचक : यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो."

द्वीपांनो, माझे ऐका, दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले, मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले, त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले, त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले. तो मला म्हणाला, "तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्राएल आहेस.” मी तर म्हणालो होतो की, "मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच आणि निरर्थक वेचले. तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे, माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे."
मी याकोबाला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्राएल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडवले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला आणि जो माझा देव माझे सामर्थ्य झाला, तो परमेश्वर म्हणतो : “याकोबाच्या वंशाचा उध्दार करावा, इस्राएलच्या रक्षिलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे यात काही मोठेसे नाही, तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १३९ :१-३,१३-१५

प्रतिसाद : अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती

१.) हे परमेश्वरा, तू मला पारखतोस. 
तू मला ओळखतोस, माझे बसणे 
आणि माझे उठणे तू जाणतोस, 
तू दुरून माझे मनोगत समजतोस. 
तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतासे,
माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.

२.)  तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस,
तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. 
भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे,
म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो.

३. ) तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव 
पूर्णपणे जाणून आहे,
मी गुप्त स्थळी निर्माण होत असता 
आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे 
माझी घडण होत असता
माझी आकृती तुला गुप्त नव्हती. 


दुसरे वाचन :  प्रेषितांची कृत्ये १३ : २२-२६

वाचक : प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"ख्रिस्ताच्या प्रकट होण्यापूर्वी योहानाने घोषणा केली होती."

पौल म्हणाला, “देवाने आपल्या पूर्वजांना राजा  होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, 'इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिध्दीस नेईल.' ह्या मनुष्याच्या वंशजातून देवाने वचनानुरूप इस्राएलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याच्या प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चात्तापाच्या स्नानसंस्काराची इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, 'मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे. तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे.' 

“अहो बंधुजनहो, आब्राहामाच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हांपैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे.'

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

हे बाळका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिध्द करण्याकरिता तू त्याच्यापुढे चालशील.
 
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १:५७-६६,८०

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"ह्याचे नाव योहान आहे."

अलीशिबेचे"ह्याचे नाव योहान आहे." दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग आठव्या दिवशी असे झाले की, ते बाळकाची सुंता करण्यास आले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, "ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे." ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही." मग ह्याचे नाव काय ठेवायचे आहे, असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाटी मागवून “ह्याचे नाव योहान आहे,' असे लिहिले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. ह्यावरून त्यांच्यासभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले आणि यहूदीयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंत:करणांत ठेवून म्हटले, “हा बाळक होणार तरी कोण?” कारण प्रभू त्याच्याबरोबर होता.

तो बाळक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्राएलला प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :आज ख्रिस्तसभा प्रभूचा मार्ग सिद्ध करण्यासाठी परमेश्वराने पाठवलेला महान संदेष्टा योहान बाप्तिस्ता ह्याचा जन्मदिन सोहळा साजरा करीत आहे. वास्तविक पाहता ख्रिस्तसभेत फक्त तीन जणांचे जन्मोत्सव साजरे केले जातात. प्रभू येशू, पवित्र मरिया व योहान बाप्तिस्ता. योहान बाप्तिस्ता त्याच्या आईच्या म्हणजेच अलिशिबेच्या उदरात असतानाच पवित्र आत्म्याच्या कृपेने परिपूर्ण झाला होता. जखऱ्या व त्याची पत्नी अलिशिबा उतारवयात असताना परमेश्वराने त्यांना योहान बाप्तिस्ताची देणगी दिली व त्यांच्या जीवनाचे सार्थक केले. आपणांस माहित आहे की पुढे हाच योहान प्रभूचा मार्ग सिद्ध करण्यासाठी यार्देन नदीत लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. प्रभू येशूनेही त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. येशूची वृद्धी व्हावी व माझा न्हास व्हावा असे तो नम्रपणे सांगत असे. कालांतराने ह्याच योहानाने हेरोदाला त्याच्या पापाविषयी जाणीव करून दिली व त्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागून शेवटी त्याचा शिरच्छेद करण्यात आला. असत्याविरुद्ध लढणाऱ्या व लोकांना त्यांच्या पापांची जाणीव करून देऊन पश्चात्तापास आवाहन करणाऱ्या प्रभूच्या ह्या संदेष्टाचा सोहळा साजरा करीत असताना त्याच्यासारखे सत्याचे व प्रभूशी एकनिष्ठतेचे जीवन आपल्यालाही जगता यावे म्हणून प्रभूकडे बळ व कृपा मागू या.

प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझी सुवार्ता सर्वांपर्यंत पोहोचविण्यास आम्हाला तुझी कृपा व धैर्य दे, आमेन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या