Marathi Bible Reading | 12th Week in Ordinary Time | Friday 25th June 2021

  सामान्य काळातील 

बारावा सप्ताह 

शुक्रवार   

 २५ जून २०२१


मौन्टे व्हर्जिनेचे संत विल्यम

- मठाधिपती, वर्तनसाक्षी (१०८५-११४२)

✝️
 
“येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, 

श्रद्धेचा महान आदर्श असलेल्या आब्राहमाबरोबर देव बोलला आणि त्याने विश्वास ठेवला.  देवाने सुंता करण्याचा करार स्थापन केला. त्यानंतर  देवाने आब्राहामाला म्हातारपणी त्याची पत्नी सारा हिला मुलगा होईल व 'मी त्याचे मोठे राष्ट्र करीन' असा आशीर्वाद दिला. श्रद्धा म्हणजे देव जे काही  आपल्या जीवनात होऊ घालतो त्याला होकार देणे व सर्वस्वी स्वीकारणे होय.

आजच्या शुभवर्तमानातील कुष्ठरोगी मोठ्या श्रद्धेने प्रभू येशूकडे आला. त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, 'प्रभूजी, आपली इच्छा असली तर ' मला शुद्ध करवयास आपण समर्थ आहां. 'कुष्ठरोगी सुद्धा श्रद्धेचा एक मोठा  आदर्श आहे, तो स्वत: धैर्याने येशूजवळ आला. त्याने अतिनम्र बनून प्रभू समोर लोटांगण घातले, म्हणजेच तो प्रभूला शरण गेला. त्यानंतर त्याने प्रार्थनेत विनंती केली की, 'आपली इच्छा असली तर' म्हणजेच त्याने सर्वस्वी प्रभूवर भरवसाठेवून त्याच्या इच्छेची प्रतिक्षा केली. अर्थात प्रभूच्या इच्छेप्रमाणे तो कुष्ठरोगी शुद्ध झाला.
आजच्या वचनांवर चिंतन करीत असतांना जाणवते की, श्रद्धा म्हणजे  देवाठायी नम्रता श्रद्धा म्हणजे देवासमोर शरणागती, श्रद्धेत प्रभूच्या इच्छेला संमत्ती द्यायची असते. श्रद्धा म्हणजे एखादी गोष्टी आपल्या जीवनात घडेलच  अशा प्रकारे प्रभू वरील आपला भरवसा. 
 
            ✝️             

पहिले वाचन :  उत्पत्ती १७: १,९-१०,१५-२२

वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 

“तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळावयाचा तो हा की, तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता व्हावी. सारा हिच्या पोटी तुला एक पुत्र होईल.'

अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल आणि सात्त्विकपणे राहा."
देव आब्राहामला आणखी म्हणाला, “आता तू व तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यान्पिढ्या माझा करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळावयाचा तो हा की, तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता व्हावी."   मग देवाने आब्राहामला सांगितले, “तुझी बायको साराय हिला ह्यापुढे साराय म्हणावयाचे नाही, तर तिचे नाव सारा (राणी) होईल. मी तिला आशीर्वादित करीन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील.” आब्राहामने उपडे पडून आणि हसून मनातल्या मनात म्हटले, "शंभर वर्षांच्या माणसाला मूल होईल काय ? नव्वद वर्षांच्या सारेला मूल होईल काय ?" आब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले." मग देव म्हणाला, “नाही, नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव इसहाक ठेव, त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन. इश्माएलविषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे. पाहा, मी त्याचे कल्याण करीन, त्याला सफळ आणि बहुगुणित करीन. त्याच्या पोटी बारा सरदार निपजतील, मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. पण पुढल्या वर्षी याचवेळी तुला सारेच्या पोटी इसहाक होईल, त्याच्याशी मी आपला करार करीन."
मग अब्राहामशी बोलणे संपल्यावर देव त्याला सोडून वर गेला.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १२८ :१-५

प्रतिसाद :देवाला भिऊन वागणाऱ्या मनुष्याला आशीर्वाद मिळेल.

१ )जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, 
जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य!

२) तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. 
तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल, 
तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ 
द्राक्षवेलीसारखी होईल; 
तुझ्या मेजासभोवती तुझी मुले 
जैतुनाच्या रोपांसारखी होतील.

३) पाहा, देवाला भिऊन वागणाऱ्या मनुष्याला 
असा 'आशीर्वाद मिळेल. 
परमेश्वर सियोनेतून तुला आशीर्वाद देवा 
आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस 
येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
 
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय  ८:१-४

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहा."

येशू डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले आणि पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहा." तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो." लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; पण जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :आज ख्रिस्तसभा प्रभूचा मार्ग सिद्ध करण्यासाठी परमेश्वराने पाठवलेला जो परमेश्वरावर भाव ठेवतो व त्याच्या आज्ञा पाळतो त्याला परमेश्वर अपेक्षेपेक्षा जास्त वरदाने देतो. आजचे पहिले वाचन आपल्याला तेच सांगत आहे. परमेश्वराने आब्राहामास त्याच्यापासूनच त्याच्या घराचा वारस होण्याचे मोठे वरदान दिले. खरे म्हणजे आब्राहाम आता उतारवयाकडे झुकलेला होता व त्यामुळे त्याच्या संततीप्राप्तीच्या आशा मावळल्या होत्या. परंतु देवाला काहीच अशक्य नाही व तो ज्याच्यावर प्रसन्न असतो त्याला आपल्या वरदानाने कसे भरून टाकतो ह्याचे सुंदर उदाहरण आपल्याला आजच्या वाचनात मिळत आहे. असे म्हणतात की, 'भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही.' आब्राहामाला संतती नव्हती व त्यासाठी त्याने त्यासाठी खूप वाट पाहिली असेल परंतु शेवटी त्याला अपेक्षितही नव्हते अशा घटकेला परमेश्वराने त्याला संतती देण्याचे वचन दिले. आपणही बऱ्याचदा परमेश्वराकडे मागून थकतो व शेवटी आपल्या आशा मावळतात, परंतु परमेश्वर योग्य वेळी आपल्यावर निश्चितच कृपा करत असतो. आपल्याला फक्त आब्राहामासारखे परमेश्वराच्या आज्ञेत राहाणे व त्याच्या मार्गात चालणे आवश्यक आहे. आब्राहामासारखे आज्ञापालन आपल्याकडूनही व्हावे म्हणून आपण पवित्र आत्म्याकडे बळ मागू या.

प्रार्थना:  हे प्रभू येशू, मी सर्वस्वी तुला शरण आलो आहे. माझी श्रद्धा बळकट कर व तुझ्या इच्छेनुसार करण्यास मला कृपा दे, आमेन.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या