Marathi Bible Reading | 12th Week in Ordinary Time | Saturday 26th June 2021

   सामान्य काळातील 

बारावा सप्ताह 

शनिवार  

 २६ जून २०२१


संत आन्थेल्म
• महागुरू, वर्तनसाक्षी (१९०५-११७८)
✝️
 
“एवढा विश्वास मला इस्त्राएलात आढळला नाही."

माणसापेक्षा परमेश्वराच्या योजना अनाकलनीय आणि वेगळ्या असतात.  वयातीत असलेल्या आब्राहम व सारा ह्या दांपत्याला मुलगा होणार असल्याचे आश्वासन परमेश्वराने दिले. अल्प विश्वासु सारेला परमेश्वराने स्पष्ट सांगितले की, परमेश्वराला सर्व काही शक्य आहे.
 कफर्णहुमातील शताधिपतीचा विश्वास खूप दांडगा होता. प्रभू येशूच्या  सामर्थ्याशाली व दैवी स्वरुपाविषयी त्यांच्या मनात तीळमात्र शंका नव्हती.  म्हणूनच शताधिपतीने प्रभूला स्पष्ट सांगितले की, 'एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.' शताधिपतीचा हाच विश्वास पाहून प्रभूने आपल्या शिष्यांना म्हटले, 'एवढा विश्वास मला इस्त्राएलात आढळला नाही.'

 शताधिपती ताबेदार होता. त्याच्याकडे अधिकार होता तरी तो स्वभावाने दयाळू व नम्र होता. कारण नोकराविषयी त्याच्या मनात दया व करुणा भरलेली होती. नोकर म्हणजे जणू त्याच्या कुटुंबातील व्यक्ती होती. त्याच्या आरोग्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी तो येशूजवळ दूरवरून आला होता. विश्वासात तो दृढ होता आणि आज्ञाधारकपणा त्याच्या वागणूकीत होता म्हणूनच येशूने त्याला म्हटले, 'तू विश्वास ठेविल्या प्रमाणे तुला प्राप्त होवो.' 

आपण आपला प्रभू येशूवरील विश्वास पडताळून पाहू या. आपल्यातील अंहकार बाजूला सारून नम्रतेने व आज्ञाधारकपणे प्रभूला आपले सर्वस्व समर्पित करु या. त्याच्याठायी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. 
 
            ✝️             

पहिले वाचन :  उत्पत्ती १८: १-१५

वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 

“परमेश्वराला काही असाध्य आहे काय ? मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल."

आब्राहाम दिवसा भर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले. तो म्हणाला, “हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस. थोडे पाणी आणू द्या; तुम्ही आपले पाय धुऊन ह्या झाडाखाली विसावा घ्या. मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जा यासाठीच तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे." ते म्हणाले, “तू म्हणतोस ते कर.” तेव्हा आब्राहाम त्वरेने डेऱ्यात सारेकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर घे आणि ते मळून त्याच्या भाकऱ्या कर." आब्राहाम गुरांकडे धावत गेला आणि त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले; त्याने ते त्वरेने शिजवले. नंतर आब्राहामने दही, दूध आणि ते शिजवलेले वासरू ही आणून त्यांच्यापुढे ठेवली आणि ते जेवत असता तो त्याच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.
मग ते त्याला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?" तो म्हणाला, “ती पाहा डेयात आहे." मग तो म्हणाला "पुढल्या वसंतऋतूत मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन; तेव्हा पाहा, तुझी बायको सारा हिला मुलगा होईल." त्याच्यामागे डेऱ्याच्या दारातून सारा हे ऐकत होती. आब्राहाम आणि सारा ही वयाने वृद्ध होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, “मी म्हातारी झाले आहे आणि माझा पतीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय?" परमेश्वर आब्राहामला म्हणाला, "सारा का हसली? 'मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होईल काय' असे ती का म्हणाली ? परमेश्वराला काही असाध्य आहे काय ? पुढल्या वसंतऋतूत नेमलेल्या समयी मी तुझ्याकडे येई तेव्हा सारेला मुलगा होईल." तेव्हा सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही." कारण ती घाबरली होती. पण तो म्हणाला, “नाही, तू हसलीच.”

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र लूक १:४६-५०.५३-५५

प्रतिसाद : मी देवाची दया स्मरतो.

१) माझा जीव प्रभूला थोर मानतो 
आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे
 माझा आत्मा उल्हासला आहे.

२) त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे.
पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.
 कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरिता 
महत्कृत्ये केली आहेत. त्याचे नाव पवित्र आहे. 

३) जे त्याचे भय धरतात, त्यांच्यावर 
त्याची दया पिढ्यान्पिढ्या असते.
त्यांने भुकेल्यांना उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे. 
आणि धनवानांना रिकामे पाठवून दिले आहे.

४) आपल्या पूर्वजांना त्याने सांगितले 
त्याप्रमाणे अब्राहाम आणि त्याचे संतान
 ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून 
त्याने आपला सेवक इस्राएल 
ह्याला सहाय्य केले आहे.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

देवाचे वचन स्वीकारा, ते माणसाचे वचन म्हणून नव्हे तर देवाचे वचन म्हणून स्वीकारा आणि वास्तविक ते तसे आहेच.
 
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय  ८:५-१७

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील."

येशू कफर्णहूम येथे आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला आणि त्याला विनंती करून म्हणाला “प्रभुजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे." येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन." तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभुजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला 'जा' म्हटले की तो जातो, दुसऱ्याला 'अमुक करें' म्हटले की तो ते करतो.” हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्यामागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलात आढळला नाही. मी तुम्हांला सांगतो की, पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील; तेथे रडणे आणि दात खाणे चालेल." मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो !" आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.

नंतर येशू पेत्रच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली होती असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला आणि तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने शब्दानेच ते घालवली आणि सर्व रुग्णाइतांना बरे केले. “त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले," असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :पवित्र मिस्सेमध्ये धर्मगुरू भाकर व द्राक्षारस उंचावून म्हणतात, 'जगाची पापे दूर करणारे...' तेव्हा भाविक प्रतिसाद देताना सांगतात की ‘हे प्रभो तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही...' हे शब्द ख्रिस्तसभेने कोठून घेतले आहेत ? तर आजच्या शुभवर्तमानातील शताधिपतीचे ते शब्द आहेत. शताधिपती हा बिगरयहूदी होता व त्याच्या हाताखाली शंभर सैन्यांची तुकडी होती व तरीही एवढा मोठा अधिकारी असूनही तो येशूपुढे अगदी नम्र होतो तसेच त्याच्यावर प्रचंड श्रद्धा ठेवतो. त्याचा असा पक्का विश्वास असतो की येशू त्याच्या चाकरास बरे करावयास समर्थ आहे. तेवढेच नाही तर येशूने केवळ उभ्या असलेल्या जागेवरूनच शब्द बोलले म्हणजे शताधिपतीच्या घरी दूरवर असणारा तो चाकर बरा होणार आहे. एवढी प्रचंड श्रद्धा तो येशूवर ठेवतो. ह्या त्याच्या श्रद्धेचे फळही त्याला मिळते व ते म्हणजे त्याचा चाकर तर बरा होतोच, परंतु तो येशूच्या स्तुतीलाही पात्र ठरतो. त्याचे शब्दही इतके अजरामर होतात की ते आपण रोजच्या मिस्सेमध्ये बोलत असतो.आज आपण शताधिपतीच्या श्रद्धेविषयी ऐकत असताना आपल्याही श्रद्धेवर चिंतन करू या व शताधिपतीच्या श्रद्धेचा काही वाटा आपल्यालाही मिळावा म्हणून प्रभूकडे कृपा मागू या.

प्रार्थना: हे प्रभू येशू, आमचा विश्वास प्रबळ कर, आमच्यामध्ये इतराविषयी दया व कळवळा निर्माण होऊ दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या