Marathi Bible Reading | 13th Sunday in Ordinary Time | 27th June 2021

   सामान्य काळातील 

तेरावा रविवार 

 २७ जून २०२१

प्रापंचिक रविवार


✝️
 
"तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. "

 'देवाने मानव अविनाशी असा निर्माण केला. आणि त्याला आपल्या शाश्वत प्रतिरुपाप्रमाणे बनविले.' अविनाशी निर्माण केलेल्या माणसाच जीवन सुखदायी, आनंदमय असणे व ते पीडारहित असावे अशीच परमेश्वराची इच्छा आहे. अविनाशी आत्मा जो माणसांमध्ये आहे त्यावर देवाची अधिसत्ता आहे. मात्र सैतानाच्या द्वेषामुळे मानवाला पीडा, वेदना, दुःख व आजार सहन करावे लागतात. अशा बिकट प्रसंगी माणसाचा म्हणजेच आपला देवावरील विश्वास दृढ असणे गरजेचे आहे.

आजच्या शुभवर्तमानात रक्त पीडित स्त्री आणि आजारी मृतावस्थेत असलेली याईराची मुलगी ह्यांची दोन उदाहरणे प्रभूने आपल्या समोर ठेवली आहेत. रक्तस्त्रावाने पीडित असलेल्या महिलेने प्रभू येशूवरील आपला विश्वास अंत:करणापासून बळकट बनविला आणि तो विश्वास तिने  आपल्या कृतिद्वारे प्रकट केला. बारा वर्षापासून त्रासदायक असलेली तिची वेदना पूर्ण बरी झाली. देवावरील विश्वासात सामर्थ्य, कृपा आणि आजारमुक्ती  आहे. तर आजारी मुलिचा बाप याईर ह्याची श्रद्धा प्रभू येशूने धीर देऊन बळकट केली आणि त्याच्या श्रद्धेमुळे त्याची मुलगी वाचली.देवावरील आपल्या श्रद्धेमुळे आपण दुसऱ्याच्या जीवनात परिवर्तन घडवून  आणू शकतो.

देवाला सर्वांनाच आनंदी व सुखी ठेवायचे आहे. तो जीवनदाता व तारणदाता आहे. आपण आज आपल्या येशूवरील व देवावरील विश्वासावर चिंतन करु  या आणि त्याला सर्वस्वी शरण जाऊ या. 
 
            ✝️             

पहिले वाचन :  ज्ञानग्रंथ १:१३-१५, २:२३-२४

वाचक : ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"सैतानाच्या मत्सरामुळे या जगात मरणाने प्रवेश केला.”

मरण परमेश्वराने निर्माण केले नाही. जिवंताच्या नाशाने त्याला आनंद होत नाही. कारण सर्व वस्तू अस्तित्वात राहाव्यात म्हणून त्याने त्या निर्माण केल्या आहेत. जगातल्या वस्तू लाभदायक आहेत, त्यांच्यात विनाशक विष नाही आणि मृत्यूलोकांची सत्ता या इहलोकी नाही.
धर्माचरण करणारा कधी मरत नाही. परमेश्वराने मनुष्याला अमर बनवले. त्याला त्याने आपल्या स्वभावाच्या प्रतिमेप्रमाणे केले आहे. परंतु सैतानाच्या मत्सराने या जगात मरणाने प्रवेश केला आणि जे त्याच्या पक्षाचे आहेत ते मृत्यूची शिकार होतात.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३०:२,४-६,११-१३

प्रतिसाद :प्रभो, मी तुझी थोरवी गाईन,

१) हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, 
कारण तू माझा उद्धार केला आहेस;
तू माझ्या वैऱ्यांना  विजयी होऊ दिले नाहीस.
हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास, 
गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस.

२) अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा, 
त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याला धन्यवाद द्या.
 त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद 
आयुष्यभर राहतो रात्री विलापाने बिऱ्हाड केले 
तरी प्रातः काळी हर्षध्वनी होतो.

३) हे परमेश्वरा,
ऐक, माझ्यावर दया कर.
हे परमेश्वरा, मला साहाय्य कर.
तू माझा विलाप दूर करून मला आनंदाने नाचायला लावले आहे;
हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन.

दुसरे वाचन २  करिंथ  ८:७.९.१३-१५ 

वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन

"दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरिता प्रस्तुतकाळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी."

विश्वास, भाषा, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था आणि आम्हावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहा, तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे.
कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हांकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरीब होण्यामुळे तुम्ही धनवान व्हावे.
दुसऱ्यांचा भार हलका करण्यासाठी तुमच्यावर भार घालावा असे नाही, तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुतकाळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. “ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही; तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही,” असे शास्त्रात लिहिले आहे.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद. 


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
 
आलेलुया!

शुभवर्तमान मार्क ५:२१-४३ 

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“मुली, मी तुला सांगतो, ऊठ."

(मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला आणि त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली, “माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा." मग तो त्याच्याबरोबर गेला.तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते आणि त्याच्याभोवती गर्दी करीत होते) तेथे रक्तस्त्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून बरे व्हावे म्हणून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली. कारण म्हणत होती, “केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन.” तेव्हा लगेच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्याठायी लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, "माझ्या कपड्यांना कोण शिवले ?" त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपल्याभोवती गर्दी करीत आहे, हे आपण पाहता, तरी आपण म्हणता, मला कोण शिवले ?” मग जिने हे केले होते तिला पहावयास त्याने सभोवार पाहिले. तेव्हा ती स्त्री, आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत आणि कापत कापत त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडून तिने त्याला खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.” तो हे बोलत आहे इतक्यात (सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता ?” परंतु ये त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस, विश्वास मात्र धर," त्याने पेत्र, याकोब आणि याकोबचा भाऊ योहान ह्यांच्याविषयी कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्सी रडणारे आणि आकांत करणारे ह्यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता आणि रडता? मुलगी मेली नाही, झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आईबाप आणि आपल्याबरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, “तलिथा कुम्" ह्याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो; ऊठ" आणि तात्काळ ती मुलगी ऊठून चालू लागली, कारण ती बारा वर्षाची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकीत झाले. हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खावयाला देण्यास सांगितले.)

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :आजची वाचने मानवी जीवनातील तीन महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकतात. मानवी जीवन जगत असताना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबर प्रेम, प्रतिष्ठा आणि शांती समाधान याही गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस धडपडत राहतो. आजची वाचने आरोग्य (health), धनसंपदा (wealth) आणि मृत्यू death) अशा तीन गोष्टींची आपल्याला जाणीव करून देतात. 
१) आरोग्य : मार्कचे शुभवर्तमान सॅण्डवीच लेखन शैलीसाठी प्रसिद्ध आहे. एखादी घटना वर्णन करीत असताना अचानक दुसरी एक घटना तो नमूद करतो आणि पुन्हा पहिली घटना पुढे सुरू ठेवतो. आजच्या शुभवर्तमानात बारा वर्षे रक्तस्त्रावाने पीडलेल्या स्त्रीला येशू बरे करतो. मात्र त्यापूर्वी तो याईर नावाच्या सभास्थानाच्या घरी जायला निघालेला असतो आणि नंतर त्याच्या मुलीला मरणातून जिवंत करतो ह्या घटनेद्वारे ख्रिस्त मानवजातीला परिपूर्ण आरोग्य देण्यासाठी आला होता हे सूचित केले जाते. 
२) धनसंपदाः आपल्याकडे कितीही संपत्ती असली तरी ते आपले जीवन होऊ शकत नाही. मात्र तिचा सदुपयोग करून आपण आपले व इतरांचे जीवन सुखी व सुंदर करू शकतो. जगाला सुवार्ता मिळावी म्हणून जेरुसलेमच्या लोकांनी आपल्या जमिनी विकल्या व ते पैसे प्रेषितांच्या चरणापाशी ठेवले. आता जेरूसलेममधील काही लोक खूप गरिबीत जीवन जगू लागले. संत पौलच्या आजच्या वाचनात त्यांच्यासाठी वर्गणी गोळा करण्याचे आवाहन करतो. 
३) मृत्यू : आजच्या पहिल्या वाचनात आणि शुभवर्तमानात मृत्यूचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आपल्या प्रिय जनांच्या मृत्युमुळे आपल्याला कितीही दुःख सहन करावे लागले तरी तोही परमेश्वराच्या योजनेचा भाग आहे. अशा दृष्टीने आपण त्याकडे पाहिले पाहिजे. याईराच्या कन्येला तर मृत्युंजय ख्रिस्ताच्या सामर्थ्यांचा अनुभव आला आणि याईराच्या कुटुंबाची श्रद्धा बळकट झाली.
आत्मपरीक्षण : मृत्युकडे पाहण्याचा सुयोग्य दृष्टिकोण आपल्याला पृथ्वीवरील जीवन अधिक अर्थपूर्णरित्या जगण्यास सहाय्यक ठरत असतो तुम्हाला पटते का ? आपल्या संपत्तीचा वापर चांगले आरोग्य आणि गोरगरिबांची सेवा करण्यासाठी करण्यात कोणकोणते अडथळे येऊ शकतात?

प्रार्थना: हे प्रभू येशू, विश्वासाचे सामर्थ्य व विश्वासात मिळणारी कृपा ह्यांची जाणीव आम्हाला होऊ दे, आमचा विश्वास बळकट बनव. आमेन..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या