Marathi Bible Reading | 13th Week in Ordinary Time | Monday 28th June 2021

    सामान्य काळातील 

तेरावा सप्ताह 

सोमवार 

 २८ जून २०२१



संत आयरेनिअस
- महागुरू रक्तसाक्षी आणि धर्मपाल (१३०-२००)

आपण जेव्हा सामुदायिक प्रार्थनेसाठी एकत्र जमतो तेव्हा आपण एकाच ख्रिस्तशरीराचे अवयव म्हणून एकत्र येत असतो. -संत आयरेनिअस
✝️
 
प्रभू येशूचे खरे अनुयायी बनण्यासाठी आत्मसमर्पण व त्याग करणे  गरजेचे आहे. प्रभू येशू आपल्याला त्याच्या मागे चालण्यास बोलावीत आहे. प्रभू म्हणतो, 'तू माझ्या मागे ये'. आपण त्यांच्या मागे जाण्यास तयार आहोत का ?.
 
            ✝️             

पहिले वाचन :  उत्पत्ती  १८:१६-३३

वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन

“तू दुर्जनांबरोबर नीतिमांनांचाही संहार करणार काय ?"

आब्राहामकडे आलेले पुरुष मम्रे येथून उठून सदोम नगराकडे जायला निघाले आणि आब्राहाम त्यांना वाटेस लावण्यास गेला. परमेश्वर म्हणाला, “मी जे काय करणार आहे ते आब्राहामपासून लपवून ठेवू काय? कारण त्याचे मोठे आणि समर्थ राष्ट्र खात्रीने होणार आणि त्याच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र आशीर्वादित होणार आहेत. मी त्याची निवड केली आहे की त्याने आपल्या लेकरांना आणि आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि परमेश्वर आब्राहामविषयी जे बोलला ते त्याने त्यांना प्राप्त करून द्यावे." मग परमेश्वर म्हणाला, “सदोम आणि गमोरा त्यांच्याविषयींची जी ओरड माझ्या कानी आली आहे आणि तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली जातो; म्हणजे खरे काय ते मला कळून येईल."
म्हणून तेथून ते पुरूष वळून सदोमकडे चालते झाले, पण आब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला. आब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, "तू दुर्जनांबरोबर नीतिमांनांचाही संहार खरेच करणार काय? त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्यांच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? या प्रकारची कृती तुझ्याकडून न होवो. नीतिमानांची आणि दृष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानांचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य ते करणार नाही काय? परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन. आब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ आणि राख असून प्रभूशी बोलण्याचे धाडस करीत आहे. कदाचित पन्नासात पाच कमी नीतिमान असतील तर पाच कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय?" तेव्हा तो म्हणाला, "मला तेथे पंचेचाळीस आढळले तर मी त्याचा नाश करणार नाही." त्याने पुन्हा म्हटले, “तेथे कदाचित चाळीसच आढळले तर?" तो म्हणाला, त्या चाळिसांकरिता मी तसे करणार नाही." मग तो म्हणाला, “मी बोलतो याचा प्रभूला राग न यावा. तेथे कदाचित तीसच आढळले तर ?” तो म्हणाला, मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही मग तो म्हणाला, “पाहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे. तेथे कदाचित वीसच आढळले तर?" तो म्हणाला, “त्या वीसांकरिता मी त्यांचा नाश करणार नाही.” तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा, मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित दहाच आढळले तर ? तो म्हणाला, "दहाकरिता त्याचा नाश करणार नाही. मग आब्राहामाशी बोलणे संपल्यावर परमेश्वर निघून गेला आणि आब्राहाम आपल्या ठिकाणी परत आला.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १०२:१-४,८-११

प्रतिसाद :परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे.

१ )हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे, 
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे. 
हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे. 
त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.

२ )तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो, 
तो तुला दया आणि करुणा ह्यांचा मुकुट घालतो. 
तो तुझे सर्व रोग बरे करतो, 
तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो,

३) परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, 
तो मंदक्रोध आणि दयामय आहे. 
तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, 
तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.

४) आमच्या पापांच्या मानाने त्याने 
आम्हांला शासन केले नाही, 
त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला 
प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्यावर 
आकाश उंच आहे,तशी त्याची दया 
आणि त्याचे भय धरणाऱ्यांवर अपार आहे.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 

सुवार्तेच्याद्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वराने आम्हांला पाचारण केले आहे.
 
आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ८:१८-२२ 

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

" तू माझ्यामागे ये."

मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन. येशू त्याला म्हणाला, “खेकड्यांना बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही." मग त्यांच्या शिष्यांपैकी आणखी एक जण त्याला म्हणाला, प्रभुजी, मला पहिल्याने आपल्या बापाला पुरायला जाऊ द्या. परंतु येशूने त्याला म्हटले, तू माझ्यामागे ये आणि मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :आपले बरेच कॅरिजमॅटीक ग्रुप्स मध्यस्थीची प्रार्थना करीत असतात. आपणही प्रभूकडे इतरांसाठी मध्यस्थीची याचना करीत असतो. मध्यस्थीची प्रार्थना किंवा इतरांसाठी केलेली मध्यस्थी ही कशी प्रभावी असते ह्याचे सुंदर उदाहरण आजच्या पहिल्या वाचनात आपणांस आढळते. सदोम आणि गमोरा ह्यांची पापे वाढली आहेत असे परमेश्वर पाहतो व त्यांचा नाश करण्याचे तो ठरवतो तेव्हा आब्राहाम परमेश्वराकडे त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो व तेथे केवळ दहा नीतिमान आढळले तरी मी त्यांचा नाश करणार नाही असे तो परमेश्वराकडून आश्वासन घेतो. म्हणजेच आपण असे निश्चितच म्हणू शकतो की आपली प्रभावी मध्यस्थी परमेश्वराचेही मन वळवू शकते किंवा आपल्या प्रभावी मध्यस्थीद्वारे आपण इतरांचे भले करू शकतो, त्यांच्यावर परमेश्वराची दयानजर वळवू शकतो. आपल्याला काना गावचे उदाहरण माहीत आहे की जेथे पवित्र मरियेने प्रभूजवळ मध्यस्थी करून घरधन्याची अब्रु वाचवली व दुःखाच्या जागी आनंद निर्माण केला. आपणही आपले जीवन जगत असताना स्वार्थी बनून फक्त स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठीच प्रार्थना न करता इतरांसाठीही मध्यस्थीची याचना करावी म्हणून प्रभूकडे कृपा मागू या.

प्रार्थना: हे प्रभू येशू, जीवनात प्रथम स्थान देऊन व त्याग करत तुला : अनुसरण्यास मला प्रेरणा व शक्ति दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या