सामान्य काळातील
तेरावा सप्ताह
मंगळवार
२९ जून २०२१
संत पीटर व संत पौलचा सण
✝️
संत पीटर
प्रेषित आणि रक्तसाक्षी (... ६७)
गालिल समुद्राच्या काठावर वसलेल्या बेथसैदा येथे शिमोन बार्योना ह्याचा जन्म झाला. लग्नानंतर तो कफर्णहूम येथे स्थायिक झाला आणि आपला भाऊ अंद्रिया ह्याच्या सोबत मासेमारीचा व्यवसाय करू लागला . प्रभू येशूने त्याला माणसे धरायला बोलावण्याआधी शिमोन (संत) योहान बाप्तिस्तचा शिष्य होता.
प्रभू येशूने शिमोनला बोलावल्यानंतर त्याला अरेमाईक भाषेत 'केफा' लॅटीन भाषेत 'पेत्र' म्हणजे खडक हे नाव दिले. पुढे “तुम्ही ख्रिस्त म्हणजे जिवंत देवाचे पुत्र आहात” अशी साक्ष त्याने दिल्यानंतर येशूने त्याला म्हटले, “तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. तिच्यापुढे अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही, मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देईन, जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे तू पृथ्वीवर मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.” यहुदी परंपरेनुसार शिमोन पेत्रला येशूने दिलेल्या अधिकाराचा उगम ह्या शब्दात आहे. पुढे हाच पेत्र पहिला पोप म्हणून विश्वव्यापी ख्रिस्तसभेचा कारभार पाहू लागला.
निरो राजाच्या अमदानीत व्हॅटिकन हिलेच्या बागेमध्ये पेत्र अथवा पीटर ह्यांना क्रूसावर उलटे टांगवून ठार मारण्यात आले. ते वर्ष होते इ. स. ६७ !
✝️
संत पौल
-प्रेषित व रक्तसाक्षी (६७)
देऊळमाता दरवर्षी २५ जानेवारी रोजी संत पौलचे परिवर्तन हा सण साजरा करीत असते. रोममध्ये पीटर आणि पौल या महान प्रेषितांना एकाच दिवशी रक्तसाक्षीत्वाचे मरण आले अशी प्राचीन ख्रिस्तसभेची पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे. २९ जून २५८ रोजी त्यांच्या शरीरांचे अवशेष छळवाद्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गुप्तपणे (संत) सेबेस्टीयनच्या गुहेमध्ये नेण्यात आले म्हणून हा दिवस त्यांच्या सणाचा दिवस म्हणून निश्चित करण्यात आलेला आहे.
शुभवर्तमानकार योहान ह्यांच्यानंतर प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत असलेला सर्वात विद्वान प्रेषित म्हणून पौलकडे आदराने पाहिले जाते. ग्रीक आणि यहुदी संस्कृतींशी परिचित असलेल्या पौलला देवाने परराष्ट्रीयांना ख्रिस्ती धर्माची शुभवार्ता सांगण्यासाठी निवडलेले होते आणि हे कार्य त्याने अत्यंत कर्तव्यदक्षतेने पार पाडले.
दमास्कसच्या वाटेवर भेटलेल्या ख्रिस्तासाठी त्याने अनेक हालअपेष्टा सहन केल्या.
निरो राजाच्या छळाच्या समयी त्याला अटक करण्यात आली आणि इ. स. ६७ साली रोम शहराच्या प्रवेशद्वारापाशी त्याचा तरवारीने शिरच्छेद करण्यात आला.
संत पीटर आणि पॉल ह्या दोन संताचे अनुकरण केल्यास ख्रिस्त आपल्या नसानसात भिनल्याशिवाय राहाणार नाही.
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये १२:१-११
वाचक : प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आता मला खरोखर कळले की, प्रभूने हेरोदाच्या तावडीतून मला सोडवले आहे."
हेरोद राजाने मंडळीतल्या काहीजणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानचा भाऊ याकोब ह्याला त्याने तरवारीने जिवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही अटक करण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला अटक केल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती.
हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री दोन बेड्या घातलेला असा पेत्र दोघा शिपायांमध्ये झोपला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला, त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, "लवकर ऊठ." तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, “कपडे कर आणि पायात वहाणा घाल," त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, “तू आपला अंगरखा घालून माझ्यामागे ये." तो निघून त्याच्यामागे गेला, तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे की काय हे त्याला कळेना, आपण दृष्टान्त पाहत आहो असेच त्याला वाटले. नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले, तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, "आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदच्या तावडीतून आणि यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३४ : २-९
प्रतिसाद :परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो.
१) परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईन,
माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल,
माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील.
दीनजन हे ऐकून हर्ष करतील.
२.) तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा.
आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया.
मी परमेश्वराला शरण गेलो आणि
त्याने माझा स्वीकार केला,
त्याने माझ्या सर्व भयापासून मला मुक्त केले.
३) ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले,
त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवंडणार नाहीत.
ह्या पामराने धावा केला आणि
परमेश्वराने तो ऐकला आणि
त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले.
४) परमेश्वराचा दूत त्याचे भय
बाळगणाऱ्यांभोवती छावणी देतो
आणि त्यांचे संरक्षण करतो.
परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा
अनुभव घेऊन पाहा.
जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य
दुसरे वाचन २ तिमथी ४:६-८, १७-१८
वाचक : पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे."
आता माझे बलिदान होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुध्द ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल.
तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.
शुभवर्तमान मत्तय १६:१३-१९
वाचक : संत मत्तयाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू पेत्र आहेस आणि मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन."
फिलिप्पैच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात ?" ते म्हणाले, “कोणी स्नानसंस्कार करणारा योहान, कोणी एलिया, कोणी यिर्मया, किंवा संदष्ट्यातील कोणी एक, असे म्हणतात." तो त्यांना म्हणाला, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?" शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.” येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी ! कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईलं आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आज ख्रिस्तसभा संत पेत्र व पौल ह्यांचा सोहळा साजरा करीत आहे. पेत्र आपल्या श्रद्धेचा जनक तर पौल निर्भय उपदेशक होता. दोघांनी वेगवेगळ्या सेवाकार्याद्वारे ख्रिस्ताच्या कुटुंबात सर्वांना एकत्रित आणले व शेवटी दोघांना हुतात्म्याचे मरण सोसावे लागले आणि ते जगात अमर झाले. पेत्र व पौल हे दोघेही यहुदी होते, दोघांनाही येशूने सुवार्ताप्रचारासाठी बोलावले, पेत्राला जाळे धूत असताना समुद्रकिनारी बोलावले तर पौलला दमास्कसच्या वाटेवर दृष्टांत देऊन निवडले. प्रभूने दोघांची नावे बदलली. शिमोनऐवजी त्याला पेत्र म्हणजे खडक हे नाव दिले व शौलचे नाव पौल असे झाले. दोघांवरही पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला होता व ते दोघेही विविध भाषांमध्ये बोलत होते. दोघांना विविध प्रकारचा छळ व दुःखे सोसावी लागली व दोघेही त्या छळामध्येही विश्वासात दृढ राहिले. दोघांनी प्रभूच्या नावाने अद्भूत कृत्ये केली. विशेषतः दोघांनीही एकेका मृत व्यक्तीला उठवण्याचा महान चमत्कारही केला. ह्या दोघांची व्यक्तिमत्वे भिन्न असतानादेखील प्रभूने त्यांना निवडले, त्यांना कार्यासाठी बळ दिले, त्यांच्या हातून घडलेल्या चुकांची व पापांची त्यांना क्षमा केली व त्यांच्याद्वारे सुंदर कार्य घडवून आणले. अशा ह्या महान संताना प्रणाम करून त्यांच्या मध्यस्थीसाठी आपण याचना करू या.
प्रार्थना: हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी सुवार्ता घोषविण्यास आणि तुझे अनुकरण करण्यास मला समर्थ्य आणि कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या