सामान्य काळातील
तेरावा सप्ताह
बुधवार
३० जून २०२१
रोमचे पहिले रक्तसाक्षी
- (६४-३१४)
रोमची ख्रिस्तसभा ज्या दोन भक्कम आधारस्तंभावर उभारलेली होती अशा संत पीटर आणि पौल या प्रेषिताचा सण साजरा केल्यानंतर या ख्रिस्तसभेच्या प्रसारासाठी ज्यांनी रक्त सांडले अशा आद्य रक्तसाक्ष्यांची स्मृती साजरी करणे हे साहजिकच आहे.
तसे प्रारंभीच्या ख्रिस्तसभेच्या काळात रोमन साम्राज्य खूप व्यापक स्वरुपात पसरलेले होते त्यामुळे कुठे ना कुठे तरी ख्रिस्ती धर्मियांचा छळ चालूच असायचा. ह्या महत्त्वाच्या घटना ख्रिस्तसभेने आपल्या रक्तरंजित इतिहासात लिहून ठेवलेल्या आहेत.अशा प्रकारे इ. स. ६४ ते ३१४ पर्यंत २५० वर्षे ख्रिस्तसभाछळाच्या भोवऱ्यात सापडलेली होती. परंतु ह्या २५० वर्षांनंतर ख्रिस्तसभेत शांतीचे साम्राज्य प्रस्थापित झाले. इ. स. ३१४ साली कॉन्स्टन्टाईन राजाने आपल्या मिलानच्या जाहिरनाम्याद्वारे ख्रिस्ती धर्म हा रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म असल्याचे जाहीर केले. ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळाला.
ख्रिस्तसभा ह्या रक्तसाक्ष्यांचा आज विशेष सोहळा दोन कारणास्तव साजरा करते. पहिले कारण म्हणजे रक्तसाक्षींचे रक्त हे श्रद्धेचे बीज आहे. हे आपल्याला पटावे! जी श्रद्धा आपल्यापर्यंत चालत आलेली आहे ती श्रद्धा जोपासण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची किंमत मोजलेली आहे. त्यामुळे आपल्या श्रद्धेचे मूल्य खूप मोठे आहे. दुसरे कारण म्हणजे श्रद्धेची जोपासना करणे ही काही गुलाबी गालिचावरून केलेली मृदू मुलायम वाटचाल नव्हे. ती तारेवरची कसरत आहे. प्रसंगी आपल्याही श्रद्धेची कसोटी पाहिली जाते. त्यावेळी आपल्याला आपल्या विश्वासाशी एकनिष्ठ राहता यावे म्हणून या रक्तसाक्षींची खास आठवण ख्रिस्तसभा करते.
आजच्या घडीला सैतान प्रत्येक क्षणी आपल्यावर झडप घालायला तयार असतो म्हणून आपण सावध असणे गरजेचे आहे. प्रभू येशू आपला मुक्तीदाता व तारणारा आहे, हे कबूल करुन आपण त्याला सर्वस्वी शरण जाऊ या.!
पहिले वाचन : उत्पत्ती २१:५.८-२०
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा.
इसहाक झाला तेव्हा आब्राहाम शंभर वर्षाचा होता. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले. इसहाकचे दूध तोडले त्या दिवशी आब्राहामने मोठी मेजवानी दिली. हागार मिसरिणीस आब्राहामपासून झालेल्या मुलाला खिदळताना साराने पाहिले. तेव्हा ती आब्राहामला म्हणाली, "या दासीला आणि हिच्या मुलाला घालवून द्या; कारण माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा.' आब्राहामला आपल्या मुलासंबधी ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव आब्राहामला म्हणाला, “हा मुलगा आणि तुझी दासी यांच्यासंबधी तू वाईट वाटून घेऊ नकोस. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालवणार. या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन, कारण ते तुझे बीज आहे." नंतर आब्राहामने मोठ्या पहाटेस उठून भाकर आणि पाण्याची कातडी पिशवी आणून हागारेच्या खाद्यांवर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केली. ती निघून बैरशेबाच्या रानात भटकत राहिली.
कातडी पिशवीतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली; कारण ती म्हणाली, “आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये" आणि ती त्याच्यासमोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली आणि देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारला म्हटले, “हागारे, तू कष्टी का? भिऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. ऊठ मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर; त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन." मग देवाने तिचे डोळे उघडले आणि पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला, तेव्हा तिने जाऊन कातडी पिशवीत पाणी भरले आणि मुलास पाजले. देव त्या मुलाचा पाठिराखा झाला आणि तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३४ : ७-८, १०-१३
प्रतिसाद :प्रतिसाद ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला.
१) ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.
२) परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांनो काही उणे पडत नाही. तरुण सिंहालाही वाण पडते आणि त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.
३) मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवीन सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा आणि दीर्घायुष्य अपेक्षिणारा असा मनुष्य कोण ?
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे; ते मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे.
शुभवर्तमान मत्तय ८:२८-३४
वाचक : संत मत्तयाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पीडावयास येथे आला आहेस काय ?"
मग येशू पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले; ते इतके अक्राळविक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पीडावयास येथे आला आहेस काय ?" तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भुते त्याला विनंती करू लागली की, “तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे.” त्याने त्यांना म्हटले, “जा." मग ती निघून डुकरात शिरली आणि पाहा, तो कळपच्या कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की आब्राहामाच्या सांगण्यानुसार हागार आपले घर सोडून तिच्या छोट्या मुलासोबत दुःखी अंतःकरणाने निघाली. रानात पोहचल्यावर आता तहानभुकेमुळे आपल्या मुलाचा मृत्यू होणार आहे व आता सर्व संपले आहे अशा भावनेतून ती हंबरडा फोडून रडत असतानाच एक अद्भुत घटना घडली. देवाच्या दूताची वाणी तिच्या कानी आली व तो तिला म्हणाला, 'तू भिऊ नकोस कारण तुझ्या ह्या मुलापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.' आपण येथे पाहतो की ज्या मुलाचा आता थोड्या वेळेतच मृत्यू होणार आहे असी पक्की खात्री हागारला वाटत असतानाच अचानक देवाचा दूत तिला किती आनंदाची बातमी देतो व सर्व चित्र जणू पालटते. आपल्याही जीवनात कधीकधी असे घडत असते जेव्हा आपणही हागारसारखी आशा सोडतो. आता सर्व काही संपले आहे व काहीच शिल्लक उरले नाही असे चित्र आपल्याही जीवनात निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु अशावेळी आपल्याला हेच लक्षात ठेवायचे आहे की, परमेश्वर आपल्याकडेही त्याचा दूत नक्कीच पाठवणार आहे. तो आपल्याही जीवनात चमत्कार करणार आहे. आपल्याला फक्त श्रद्धा ठेवायची आहे व आशेने वाट पहायची आहे कारण आपला देव आपल्याला सोडणार नाही. तो आपल्याला टाकणार नाही, तर हागारसारखा चमत्कार आपल्याही जीवनात तो करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला देव आपल्याबरोबर आहे ही आपली श्रद्धा कधीही ढळू नये म्हणून आपण प्रभूकडे कृपा मागू या.
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्यावर संपूर्ण विसंबून राहण्यास व सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होण्यास आम्हाला प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन.
0 टिप्पण्या