Marathi Bible Reading | 13th Week in Ordinary Time | Thursday 1st July 2021

       सामान्य काळातील 

तेरावा सप्ताह 

गुरुवार 

१ जुलै २०२१

 

धन्यवादित जुणीपेरो सेरा 

"उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा”

आब्राहामाने देवावरील पूर्ण विश्वासाने देवाची आज्ञा प्रमाण मानली, त्याचा  एकुलता, पुत्र इसाहाकाचे होमार्पण करण्यासाठी आब्राहाम मोरिया देशातील डोंगरावर गेला. आब्राहामाची निष्ठा पाहून देवाने त्याच्यावर कृपेचा वर्षाव करुन आशीर्वाद दिला देव कृपाळू, कनवाळू, दयाळू, प्रेमळ व सामर्थ्याशाली आहे. त्याच्यावर श्रद्धा असणाऱ्या व त्याची आज्ञा पाळणाऱ्यांना देव भव्य आशीर्वाद देत असतो.

पक्षघाती माणसाचा आजार हा पापांचा परिणाम होता का? कारण प्रभू येशू प्रथम त्याला म्हणाला, "मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." आपल्याला होणारे आजार, व्याधी तसेच येणारी दुःखे व संकटे ह्या सर्वांना पार्श्वभूमि असते. निर्गमच्या पुस्तकात म्हटले आहे, 'मी तुझा देव, परमेश्वर, इर्षावान देव आहे, जे माझा द्वेष करतात त्यांच्या  मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करितो.'  म्हणूनच आजार पापांचा परिणाम असू शकतो. मात्र त्यावेळी परमेश्वराने म्हटले  आहे, 'जे माझ्यावर प्रेम करितात व माझ्या आज्ञा पाळितात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करितो.' परमेश्वर इर्षावान आहे तसेच तो दयाळू सुद्धा आहे. 

आपल्या सर्व प्रकारच्या असहाय परिस्थितीत आपण देवाला धन्यवाद देऊन त्याच्या पुढे नतमस्तक होऊन विश्वास ठेवू या की आपल्याही जीवनात चमत्कार घडणार आहे. 

            ✝️             

पहिले वाचन : उत्पत्ती  २२:१-१९ 

वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"आपला पिता आब्राहाम याचे होमार्पण." 

देवाने आब्राहामला कसोटीस लावले; त्याने “आब्राहाम, " अशी हाक मारली, तेव्हा आब्राहाम म्हणाला, "काय आज्ञा ?" देव म्हणाला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.” तेव्हा आब्राहामने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले, आपल्याबरोबर दोघे सेवक आणि आपला मुलगा इसहाक यांना घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली, मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तिसऱ्या दिवशी आब्राहामने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. आब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो." तेव्हा आब्राहामने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव आणि सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर निघाले. तेव्हा इसहाकने आपला बाप आब्राहाम याला म्हटले, “बाबा!" तो म्हणाला, "काय म्हणतोस बाळा?" त्याने म्हटले, "पाहा, विस्तव आणि लाकडे, आहेत पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे ?" आब्राहाम त्याला म्हणाला, “बाळा? देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल" आणि ते दोघे बरोबर चालू लागले. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा आब्राहामने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक याला बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले. मग आब्राहामने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “आब्राहाम, आब्राहाम!" तो म्हणाला, "काय आज्ञा ?" मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नकोस, त्याला अपाय करू नकोस; कारण तू आपल्या मुलाला आपल्या एकुलत्या एका मुलाला ही राखून ठेवले नाहीस, यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस हे मला कळले." तेव्हा आब्राहामने दृष्टी वर करून पाहिले तो आपल्यामागे झुडूपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला; मग आब्राहामने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला आणि आब्राहामने त्या ठिकाणचे नाव याव्हे - यिरे (परमेश्वर पाहून देईल) असे ठेवले. त्यावरून “परमेश्वराच्या पर्वतावर पाहून देण्यात येईल” असे आजपर्यंत बोलतात.
परमेश्वराच्या दूताने आकाशातून आब्राहामला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, “परमेश्वर म्हणतो, “मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की, तू हे कृत्य केलेस; आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस, म्हणून मी तुला आशीर्वादित करीन आणि वृध्दीच वृध्दी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन आणि तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील; तू माझा शब्द ऐकलास म्हणून पृथ्वीची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील." मग आब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला आणि ते उठून त्याच्याबरोबर बैरशेबा येथे गेले आणि आब्राहाम बैरशेबा येथे राहिला.
हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११५ : १-६ ,८-९

प्रतिसाद : जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन,

१) परमेश्वराचे स्तवन करा, मी परमेश्वरावर प्रेम करतो, कारण तो माझी विनवणी ऐकतो; त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन.

२) मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, मला अधोलोकांच्या यातना झाल्या; मला उपद्रव व क्लेश झाले, तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, हे परमेश्वरा, तुला मी विनवितो की माझी जीव मुक्त कर.

३) परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे, परमेश्वर भोळ्याचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला.

४) तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून रक्षिले आहेत. जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
आपण पित्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणांस सत्यवचनाने जन्म दिला.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ९:१-८

वाचक : संत मत्तयाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला."

येशू तारवात बसून पलीकडे गेला आणि आपल्या नगराला जाऊन पोहोचला. मग पाहा, खाटेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, "मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." मग पाहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करतो.” येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता ? कारण 'तुझ्या पापाची क्षमा झाली आहे' असे बोलणे, किंवा 'उठून चाल' असे बोलणे ह्यातून कोणते सोपे ? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून" मग तो पक्षपाती मनुष्याला म्हणाला, "ऊठ, आपली खाट उचलून घेऊन घरी जा." मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याला आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन :आजच्या पहिल्या वाचनात देव अब्राहामाला आपल्या मुलाचे अर्पण करायला सांगतो, ही गोष्ट मानवी भावनेला थोडी दुःखदायक वाटते. त्याला प्रिय असलेल्या लोकांचा विश्वास अधिक मजबूत व्हावा म्हणून आपल्या जवळच्या लोकांना देव अनेकदा परीक्षेत पाडतो. आब्राहामाच्या परीक्षेनंतर त्याचा देवावरील विश्वास भक्कम झाला. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला देवाने विश्वासाचे दान दिले आहे. आपला हा विश्वास किती मजबूत आहे यावर विचार करू या. जीवन सुरळीत चालू असेल तेव्हाच आपण देवाबरोबर आनंदी असतो की सर्वकाही अस्ताव्यस्त झाले असताना सुद्धा देवाला धन्यवाद देतो ? जीवनात जेव्हा आपण मरणाचा अनुभव घेत असतो तेव्हा परमेश्वर आपणाला त्याच्या प्रेमळ मिठीत अधिक घट्ट करत आहे हे आपण विसरता कामा नये.

प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्यावरील विश्वासात वाढण्यास व तुझ्या आज्ञा पाळण्यास आम्हाला कृपा व शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या