सामान्य काळातील
तेरावा सप्ताह
शुक्रवार
२ जुलै २०२१
संत प्रोसेयुस व मार्टिनिअन
संत पीटर आणि पौल ह्यांना रोमच्या तुरुंगात टाकण्यात आले त्यावेळी तुरुंगाचे रक्षक म्हणून हे दोघे काम पाहात होते. संत पीटर आणि पौल ह्यांनी तुरुंगातदेखील ख्रिस्ती धर्माची सुवार्ता सांगितली आणि अनेक चमत्कार केले.
त्यांनी प्रभावित होऊन अनेकांनी ख्रिस्ती धर्माचा जाहीर स्वीकार केला. त्यात प्रोसेयुस आणि मार्टिनिअन हे सुद्धा होते. त्यांनी पीटर व पौल ह्यांना तुरूंगातून मुक्त होण्याची संधीदेखील देऊ केली होती. परंतु सत्यनिष्ठ प्रेषितांनी ती सरळसरळ नाकारली. पुढे स्नानसंस्कारासाठी आवश्यक असलेले पाणी त्या तुरूंगातील एका खडकातून अद्भुतरित्या धो धो वाहत राहिले.
तुरुंगाधिकारी पौलीनस ह्यांनी प्रोसेयुस आणि मार्टिनिअन ह्या दोघांना आपल्या नवीनतम श्रद्धेपासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते आपल्या दृढ विश्वासापासून तीळमात्र ढळत नाहीत हे पाहून त्यांचा क्रूर छळ करण्यात आला. त्यांच्या श्रद्धेचा अपमान करण्यासाठी त्यांना ज्युपिटरच्या मूर्तीपुढे धूप देण्यास सांगण्यात आले. त्यालाही त्यांनी साफ नकार दिला. संपूर्ण छळाच्या काळात त्यांच्या मुखी एकच वाक्य होते “परमेश्वर सदैव सुवंदित असो." शेवटी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
पहिले वाचन : उत्पत्ती २३:१-४,१९, २४:१-८,६२-६७वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"इसहाकचे रिबकेवर प्रेम होते आणि तिच्यामुळे आपल्या आईच्या पश्चात त्याला समाधान लाभले."
सारा एकशेसत्तावीस वर्षे जगली; एवढेच तिचे आयुष्य होते. सारा ही कनान देशातील किर्याथ आरबा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली आणि आब्राहाम तिच्यासाठी शोक आणि विलाप करू लागला. आब्राहाम साराच्या मृत देहाजवळ उभा राहून हेथीच्या लोकांना म्हणाला, मी तुमच्यामध्ये उपरा आणि परदेशी आहे. माझ्या मालकीचे कबरस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या, म्हणजे मी आपल्या मृताला मूठमाती देईन." यांनतर आब्राहामने आपली बायको सारा हिला कनान देशातले मम्रे म्हणजे हेब्रोन ह्याच्या पूर्वेला म्हणजे मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले.
आब्राहाम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला; परमेश्वराने अब्राहामला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. आब्राहामच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वांत जुना सेवक होता, त्याला त्याने म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची, आकाश आणि पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की, ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलीपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू वधू म्हणून निवडणार नाहीस; तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी वधू पाहून आणशील. त्याचा सेवक म्हणाला, यदाकदाचित ती वधू माझ्याबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलाला मी परत घेऊन जावे काय ?" तेव्हा आब्राहाम त्यास म्हणाला, “खबरदार! माझ्या मुलाला तिकडे न्यावयाचे नाही. स्वर्गाच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की, 'हा देश मी तुझ्या संततीला देईन,' तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी वधू आण. पण ती वधू तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू या माझ्या शपथेतून मोकळा होशील. मात्र माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नकोस.
इकडे इसहाक बैर-लहाय-रोई विहिरीकडून आला होता; तो नेगेबात राहात असे. इसहाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने दृष्टी वर करून पाहिले तो त्याला उंट येताना दिसले. रिबकेने दृष्टी वर करून इसहाकला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकास विचारले, “हा रानात आपणास सामोरा येत आहे तो कोण ?” सेवक म्हणाला, "हा माझा धनी." तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले. मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकला सांगितले. मग इसहाकने रिबकेला आपली आई सारा हिच्या तंबूमध्ये आणले; त्याने रिबकेचा स्वीकार केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम होते आणि तिच्यामुळे आपल्या आईच्या पश्चात इसहाकला समाधान लाभले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०६ : १-५
प्रतिसाद : परमेश्वराचे उपकारस्मरण करा.
१) परमेश्वराचे स्तवन करा,
परमेश्वराचे उपकारस्मरण करा,
कारण तो चांगला आहे,
त्याची दया सनातन आहे.
परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल ?
त्याची सर्व स्तुती कोण ऐकवील ?
२) जे त्याच्या न्यायानुसार वागतात
आणि सर्वदा नीती आचरतात,
ते धन्य! हे परमेश्वरा,
तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस,
तेव्हा माझी आठवण कर.
३ ) माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे;
म्हणजे तुझ्या निवडलेल्या उत्कर्ष
माझ्या दृष्टीस पडेल;
तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईन,
तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करीन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुमचे तारण करायला समर्थ असे अंत:करणाची पकड घेणारे वचन नम्रतेने स्वीकारा.
शुभवर्तमान मत्तय ९:९-१३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"निरोग्यांना वैद्यांची गरज नाही. मला दया पाहिजे यज्ञ नको."
येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, "माझ्या मागे ये." तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला.
नंतर तो घरात भोजनाला बसला असता, बरेच जकातदार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले. हे पाहून परूशी त्यांच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?" हे ऐकून येशू म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर आजाऱ्यांना आहे. 'मला दया पाहिजे, यज्ञ नको' ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका. कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- आजच्या शुभवर्तमानात येशू सांगतो, 'मला दया पाहिजे यज्ञ नको'. इथे येशू यज्ञ म्हणजे फक्त होमार्पणे, बळी याबद्दलच बोलत आहे असे नाही. दुसऱ्यांना दया दाखविणे म्हणजे नक्की काय करणे ? जे गरीब, दुःखी, अडचणीत आहेत त्यांना आर्थिक मदत करणे, आपला वेळ देणे. हे सर्व करणे गरजेचे आहे. जर आपणाला येशूने सांगितल्याप्रमाणे इतरांना दया दाखवायची असेल तर आपण जे इतरांसाठी करतो ते हृदयांपासून केले पाहिजे. इतरांबरोबर आपण नाते प्रस्थापित केले पाहिजे, त्यांचे दुःख, आनंद, जीवन जवळून अनुभवले पाहिजे. आपल्या संपर्कात येणाऱ्यांना आपण येशूने सांगितलेली दया दाखवतो का ? ह्यावर विचार करू या.
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्या पाचारणाला योग्ये तो प्रतिसाद देण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास आम्हाला सामर्थ्य व बळ दे, आमेन..
0 टिप्पण्या