सामान्य काळातील
तेरावा सप्ताह
शनिवार
३ जुलै २०२१
संत थॉमस -भारताचा प्रेषित
- प्रेषित व रक्तसाक्षी (पहिले शतक)
जुळा (दिदुम) म्हटलेला थॉमस हा गालीलमधील एक अशिक्षित व साधा कोळी होता. येशूने त्याला आपल्या बारा प्रेषितांमध्ये निवडून घेतले होते. लाझरसच्या आजाराची बातमी येशूला कळली तेव्हा येशू बेथानी येथे जाण्यास निघाला परंतु यहुदी लोक आपल्याला दगडमार करतील ह्या भीतीने इतर शिष्य येशूबरोबर बेथानीस जायला घाबरले होते. अशा वेळी केवळ येशूवरील प्रेमापोटी थॉमस आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, चला आपणही जाऊ आणि त्याच्याबरोबर मरू.
प्रभुजी आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही मग मार्ग कसा ठाऊक असणार? असा प्रश्न शेवटच्या भोजनसमयी विचारणारा शिष्य हा थॉमसच होता. येशूने त्याला उत्तर दिले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.”
पवित्र आत्म्याच्या आगमनानंतर सर्व प्रेषित जगाच्या कानाकोपऱ्यात येशूची सुवार्ता सांगण्यासाठी निघून गेले. थॉमस मिडेस, पर्शिया, भारत आणि आसपासच्या परिसरात जाऊन पोहोचले त्यावेळी सिरीया आणि भारत ह्यांच्यात व्यापारी दळणवळण सुरू होते असे मानले जाते. इ. स. ३२५ साली नायसिया येथे भरलेल्या ख्रिस्ती धर्मपरिषदेत जे सिरियन चॅल्डीयन बिशप उपस्थित होते ते भारत आणि पर्शिया येथले होते अशीदेखील नोंद इतिहासात आढळले.
मद्रासमधील मैलापूर, (आताचे सान्त थोमे) येथे थॉमस ह्यांना भाल्याने भोसकण्यात आले अशी श्रद्धावंतांची समजूत आहे. त्यामुळे ज्या क्रूसरूपी खांबावर त्याला मारण्यात आले तो खांब आज भाविकांच्या भक्तीचा विषय बनलेला आहे.
संत लूकने पवित्र मरियेचे चितारलेले एक चित्र संत थॉमसने भारतात येताना आपल्याबरोबर आणले होते. तेही चित्र आपल्याला मद्रास मैलापूर येथे पाहावयास मिळते.
संत जॉन क्रिझोस्तोम ह्यांच्या काळात संत थॉमस ह्याची खाच सिरीयातील एडेसा येथे होती. पुढे त्याच्या शरीराचे उर्वरित अवशेष इटाली व पोर्तुगाल येथे नेण्यात आले.
भारतात आल्यानंतर कोणा एका राजपुत्राने थॉमसला मोठा राजवाडा उभारण्यासाठी बयापैकी रक्कम देऊ केली. परंतु “ह्या पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साठवू नका तर स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा" असा सल्ला देऊन थॉमसने त्या राजपुत्राला आपली संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकण्यास प्रवृत्त केले. आर्किटेक्ट आणि बिल्डर्स हे संत थॉमस ह्यांना आपला आश्रयदाता संत मानतात.
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये १०:२४-३५
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यांत आली आहे
तिसऱ्या दिवशीं तो कैस रियास पोहंचला तेव्हां कर्नेल्य आपल्या नात लगांना व इष्टमित्रांना जमवून त्यांची वाट पाहत होता. पेत्र आंत जात असतां कर्नेल्य त्याला सामोरा गेला आणि त्यानें त्याच्या पायां पडून त्याला नमन केलें; पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, उभे राहा; मीहि मनुष्यच आहें. मग तो त्याच्या बरोबर बोलत बोलत आंत गेला, तेव्हां त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळून आले. त्याने त्यांना म्हटलें, तुम्हांला ठाऊकच आहे कीं, यहूदी मनुष्यानें अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्या कडे जाणेयेणें ठेवणें हें त्याच्या रितीरिवाजाविरुद्ध आहे; तथापि कोणाहि मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणूं नये असें देवानें मला दाखविले आहे; म्हणून मला बोलाविल्या बरोबर मी कांकूं न करितां आलो आहे. तर मी विचारतों, तुम्हीं मला कशासाठी बोलावलें ?
तेव्हां कर्तेल्य म्हणाला, आज चार दिवस झाले, मी आपल्या घरीं तिसऱ्या प्रहरीं प्रार्थना करीत होतों; तेव्हां पाहा, तेजस्वी वस्त्रे परिधान केलेला एक पुरुष मजपुढे उभा राहून म्हणाला, कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यांत आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यांत आलें आहे; तर यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन ह्याला बोलावून आण; तो समुद्राच्या कांठी कातडें कमावणाऱ्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे. म्हणून मी आपणांकडे .माणसांना तत्काळ पाठविलें. आपण आलां हें बरें केलें. तर आतां प्रभूनें जें कांहीं आपणाला आज्ञापिलें आहे तें ऐकावे म्हणून आम्ही सर्व. जण येथें देवासमोर हजर आहों.तेव्हां पेत्रानें बोलण्यास आरंभ केला : 'देव पक्षपाती नाही,' हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भीत बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४२ : २-३,४३:३-४
प्रतिसाद : माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे;
१) हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी
लुलपते तसा हे देवा,
माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे.
२) माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी
तान्हेला झाला आहे;
मी केव्हां देवासमोर येऊन त्याचें दर्शन घेईन ?
३) तुझा देव कोठे आहे, असे ते मला सतत म्हणतात,
म्हणून अहोरात्र माझे अश्रु माझा आहार झाले आहेत.
४) तूं आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर;
ती मला मार्ग दाखवोत;
तुझ्या पवित्र डोंगरावर,
तुझ्या निवासस्थानी मला पोहंचवोत;
५) म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ,
देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन;
आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझें गुणगान गाईन..
दुसरे वाचन १पेत्र १:३-९
वाचक : पेत्राचे पहिले पत्र ह्यामधून घेतलेले वाचन
आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या -महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरु त्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला ; जें तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, तें प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीनें विश्वासाच्या योगें रक्षिलेले आहां, त्या तुम्हांसाठीं तें वतन स्वर्गांत राखून ठेवलें आहे. त्याविषयीं तुम्ही उल्हास करितां, तरी तुम्हीं आता थोडा वेळ, भाग पडलें तसें निरनिराळ्या परीक्षामुळे दुःख सोस ह्यासाठीं कीं, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीनें करितात त्या सोन्यापेक्षां मूल्यवान् असे जें तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणें तें येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावें. त्याला पाहिलें नसतांहि त्याच्यावर तुम्ही प्रीति करिता ; आतां तो दिसत नसतां त्याच्यावर विश्वास ठेवतां; आणि त्या विश्वासाचें पर्यविसान जे आपल्या जिवांचें तारण तें उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदानें उल्लासतां.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
येशूनें त्याला म्हटलें, तूं मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे; पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे ते धन्य.
शुभवर्तमान योहान २०:२४-२९
वाचक : योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
तूं मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे;
येशू आला तेव्हां बारांतील एक म्हणजे दिदुम' म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितलें, आम्हीं प्रभूला पाहिलें; पण त्यानें त्यांना म्हटलें, त्याच्या हातांत खिळ्यांचे वण पाहिल्यावांचून, खिळे होते त्या जागीं आपलें बोट घातल्यावांचून व त्याच्या कुशींत आपला हात घातल्यावांचून मी विश्वास धरणारच नाहीं.
मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदां आंत असतां त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हां दारें बंद असतांना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हांस शांति असो. नंतर त्यानें थोमाला म्हटलें, तूं आपलें बोट इकडे कर व माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असूं नको, तर विश्वास ठेवणारा ऐस. थोमानें त्याला म्हटलें, माझा प्रभु व माझा देव ! येशूनें त्याला म्हटलें, तूं मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे; पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे ते धन्य.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- संत थॉमस प्रभूला शरण गेला व त्याने लोटांगण घालून म्हटले, 'माझा प्रभू, माझा देव', त्यानंतर मग संत थॉमसने आपले संपूर्ण जीवन ख्रिस्ताठायी समर्पित करुन देवाची सुवार्ता जगभर पसरविली. संत थॉमसनेच भारतात ख्रिस्ताच्या सुवार्तेची सुरुवात केली व ख्रिस्ती श्रद्धेचा तो आदर्श बनला.
आज आपण आपल्या ख्रिस्तावरील विश्वासा संबंधाने चिंतन करु या. विश्वास हा देवाने आपल्याला देलेल्या आध्यात्मीक दानांच्या सत्यावर आधारलेला असतो. देवाच्या प्रकटीकरणावर पूर्ण विश्वास ठेवून देवाच्या अभिवचनाला आपण चिकटून रहावे व प्रभू येशूच आपल्या जीवनाचा स्वामी म्हणून स्वीकारावे. हाच विश्वास कृतीत उतरविण्यासाठी आपण प्रयत्नशील बनूया. संत थॉमसचा आदर्श जीवनात उतरवून आपण खरे ख्रिस्ती बनण्यासाठी त्याच्या मध्यस्थीने प्रार्थना करु या.
प्रार्थना: हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, हे माझ्या स्वामी, तुजवर प्रेम करुन विश्वासाने तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला कृपा दे, ही प्रार्थना संत थॉमसच्या मध्यस्थीने करतो, आमेन..
0 टिप्पण्या