सामान्य काळातील
चौदावा रविवार
४ जुलै २०२१
श्रद्धा बांधणीच्या रविवारी
संत पौल आजच्या वाचनात म्हणत आहे, 'ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे.' संत पौलाने कुठल्याच अडथळ्याची पर्वा न करता प्रभू येशूचा संदेशसर्वांना दिला.
आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की अनेक अद्भूते करीत देवराज्याची सुवार्ता घोषित करणाऱ्या प्रभू येशूचा आपल्याच माणसांनी अव्हेर केला. मात्र प्रभू येशू तिथेच थांबला नाही तर 'तो शिक्षण देत गावोगाव फिरला.' संत पौल प्रभू येशूची सुवार्ता पसरवित असताना त्याचा भयंकर छळ झाला, मात्र विश्वासाने व मोठ्या धैर्याने संत पौलाने प्रभूची सुवार्ता पसरविली. प्रभू येशूचे अनुकरण सर्व शिष्यांनी आणि प्रेषितांनी केले. आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे अखंडितपणे ते सुवार्ता घोषवित राहिले.
सुवार्तिक श्रद्धावान माणसांचे जीवन सोपे नसते हे बायबलमधील व ख्रिस्ती इतिहासातील अनेक उदाहरणावरून आपल्याला समजून येते. आपली श्रद्धा कशी दृढ करता येईल ह्यासाठी मार्गदर्शक तत्वे नाहीत तर जिवंत उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आज आपण आपल्या श्रद्धामय जीवनावर चिंतन करुया. आपणा सर्वांना प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी बोलविण्यात आले आहे. आजच्या श्रद्धा बांधणीच्या रविवारी आपण आपली श्रद्धा वृधिंगत करण्यास काय करणार आहोत ?
पहिले वाचन : यहेज्केल २:२-५
वाचक : यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन
"हे त्याचे वंशज उद्धट आणि कठीण हृदयाचे आहेत, आणि निदान त्यांच्याकडे कोणी तरी संदेष्टा गेला होता हे त्यांना समजेल."
प्रभू माझ्याबरोबर बोलत असता आत्म्याने माझ्या ठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले तेव्हा त्याचे बोलणे मला ऐकू आले. तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल वंशजांकडे, माझ्याशी फितुरी केलेल्या त्या फितुरी राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी आणि त्यांच्या वाडवडिलांनी आजपर्यंत माझ्याविरुद्ध वर्तन केले आहे. हे त्यांचे वंशज उद्धट आणि कठीण हृदयाचे आहेत; मी तुला त्यांच्याकडे पाठवत आहे; 'प्रभू परमेश्वर असे म्हणतो' हे त्यांना सांग. ते तुझे ऐकोत वा न ऐकोत (ते बंडखोर आहेत हे विसरू नकोस), निदान त्यांच्याकडे कोणी संदेष्टा गेला होता हे त्यांना समजेल."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १२३:१-५
प्रतिसाद : आमचे डोळे परमेश्वराकडे लागलेले आहेत.
१) हे स्वर्गात राजासनारूढ असणाऱ्या,
मी आपले डोळे तुझ्याकडे वर लावतो;
पाहा, जसे दासांचे डोळे आपल्या
धन्याच्या हाताकडे असतात,
२) जसे दासीचे डोळे आपल्या
धनिणीच्या हाताकडे असतात,
तसे आमचा देव परमेश्वर
आमच्यावर कृपा करीपर्यंत
त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले आहेत.
३) हे परमेश्वरा आमच्यावर कृपा कर,
आमच्यावर कृपा कर आमची पुरी नालस्ती होत आहे.
सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास
आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी
आमच्या जीवाला मातीमोल करून टाकले आहे.
दुसरे वाचन २ करिंथ १२:७-१०
वाचक : पौलचे करिंथकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. "
प्रगटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला गुद्दा मारण्याकरिता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली; परंतु त्याने मला म्हटले आहे, “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेला येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन.
शुभवर्तमान मार्क ६: १-६
वाचक : मार्कलिखित शभवर्तमानातून घेतलेले वाचन
"संदेष्ट्याचा सन्मान मात्र त्यांच्या देशात होत नसतो. "
येशू आपल्या गावात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. मग शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले आणि म्हणाले, “ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे. आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात! जो सुतार, जो मरियेचा आणि याकोब याचा मुलगा, योसे, यहुदा आणि शिमोन ह्यांचा भाऊ तोच हा आहे ना ? आणि ह्यांच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना ? असे ते त्याच्याविषयी कुजबूजू लागले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टात अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो.” थोड्या आजारी लोकांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे येशूला आश्चर्य वाटले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :- जगात चांगले किंवा वाईट असे काही नसतेच मुळी, माणूस त्याकडे ज्या दृष्टीने पाहतो त्यावरून ते चांगले किंवा वाईट असे ठरू शकते. माणसाच्या अंतःकरणात अधूनमधून विविध प्रकारचा सगडा किंवा संघर्ष सुरू असतो. माणसाने जर ह्या संघर्षाचा व्यवस्थित अभ्यास केला तर तोच संघर्ष ही परमेश्वराची वाणी ऐकण्यास, त्याचा आतला आवाज ऐकण्यास सहाय्यक ठरू शकतो. आजच्या तिन्ही वाचनात तीन प्रकारचे संघर्ष सादर करण्यात आलेले आहेत.
१) धार्मिक स्वरूपाचा संघर्ष : परमेश्वर यहेज्केल संदेष्ट्याला आपल्या लोकांकडे पाठवतो. त्या लोकांचा नाश होऊ नये तर त्यांनी मागे फिरावे पश्चात्ताप करावा आणि जगावे असे परमेश्वराला वाटत होते. मात्र हे लोक ताठ मानेचे आणि कठीण अंतःकरणाचे आहेत हेही परमेश्वर जाणून होता. ते यहेज्केलचे ऐकणार नाहीत ते परमेश्वर त्याला आधीच सांगून ठेवतो. त्यामुळे या धार्मिक संघर्षातून जाताना यहेज्केलला परमेश्वराचे शब्द दिलासा देत होते.
२) वैयक्तिक स्वरूपाचा संघर्ष : संत पौल खूप प्रामाणिकपणे आपले प्रेषितीय कार्य करीत होता. मात्र त्याच्या अंतर्यामी त्याला एक काटा खुपसत होता. (हा त्याचा आजार असू शकेल किंवा एखादी दुर्बळता असू शकेल) पौल त्याला सैतानाचा दूत म्हणून संबोधतो. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे आपण गर्विष्ठ होऊ नये म्हणून खुद्द परमेश्वराने तसे केले असावे असे पौल मानतो आणि आपल्या अशक्तपणाची आनंदाने प्रौढी मिळवितो.
३) सामाजिक स्वरूपाचा संघर्ष : येशू गालीलभर फिरून सुंदर कार्य करीत होता. तो नाझरेथात आला तेव्हा मात्र त्याला सामाजिकदृष्ट्या संघर्षाला सामोरे जावे लागले. त्याच्या ज्ञानावरून जरी लोक थक्क झाले असले तरी तो आपल्यापैकीच एक आहे, आपण त्याचे गणगोत जाणतो अशा शब्दांत त्यांनी येशूच्या दैवी स्वरूपावरील व सामर्थ्यावरील अविश्वास व्यक्त केला. त्यांच्या अविश्वासामुळे इच्छा असूनही येशू तिथे फारशी महत्कृत्ये करू शकला नाही.
आत्मपरीक्षण : आपल्या जीवनात कोणकोणत्या प्रकारचा धार्मिक, वैयक्तिक आणि सामाजिक स्वरूपाचा संघर्ष सुरू आहे ? ह्या संघर्षामधून देव आपल्याला कोणता संदेश देऊ इच्छितो ? हे संघर्ष शांतपणे हाताळण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल असे आपणांस वाटते ?
प्रार्थना: प्रभू येशू, तुझ्यावरील व तुझ्या सुवार्तेवरील विश्वासात टिकून राहण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या