सामान्य काळातील
चौदावा सप्ताह
५ जुलै २०२१
संत अँथनी मेरी झॅकरी
वर्तनसाक्षी (१५०२-१५३९)
वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास करून काही काळ डॉक्टर म्हणून रोग्यांची सेवाशुश्रुषा केली.
पुढे ह्या सेवेला अध्यात्माची भक्कम बैठक असावी असे त्याला वाटू लागले. त्यानुसार त्याने धर्मप्रांतीय धर्मगुरूपदासाठी अभ्यास सुरू केला आणि अवघ्या २६ व्या वर्षी त्याला गुरूदीक्षा देण्यात आली. परंतु तो अल्पायुषी ठरला व वयाच्या ३७ व्या वर्षी त्याला देवाघरचे बोलावणे आले.
परंतु या ११ वर्षात त्याने केलेले कार्य इतके लोकविलक्षणीय होते की आपली मायभूमी क्रेमोजा (इटाली) आणि मिलान येथे रुग्ण व गोरगरीब ह्यांना तो देवाने पाठविलेला दूतच वाटू लागला. संत पौलची तळमळ त्याच्याठायी दिसून येई. वारंवार होणाऱ्या युद्धानंतर रोगराई, प्लेग आणि दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या लोकांना त्याच्याठायी खूप मोठा आसरा वाटे.
इ. स. १५३० साली फा. अँथनी ह्यांनी 'संत पौलचे रेग्युलर क्लार्कस्' ही धार्मिक व्रतस्थांची संस्था सुरू केली. दैवी उपासनेविषयी जनमानसात प्रेमभाव उत्पन्न करणे, साक्रामेंताद्वारे (संस्कारांद्वारे) खरे ख्रिस्ती जीवन जगणे हे ह्या संस्थेचे प्रमुख ब्रीदवाक्य होते. मिलानमध्ये ज्या ठिकाणी ही संस्था उदयास आली. तेथील संत वर्णबाच्या चर्चच्या नावावरून फा. अँथनी ह्यांच्या संस्थेतील धर्मगुरूंना 'बर्णबाईट्स' असे नाव पडले.
लोकांना पुन्हा एकदा संस्काराकडे (साक्रामेंत) आणणाऱ्या ह्या धर्मगुरूंना 'मिलानचा प्रेषित' ही उपाधी देण्यात आली. आपल्या हातात क्रुसावर खिळलेला प्रभू येशू ख्रिस्त घेऊन तो रस्त्यारस्त्यांवरून व गल्लीबोळांतून प्रभू येशूच्या दुःखसहन, मरण व पुनरुत्थानविषयी उपदेश देत फिरत असे. लोकांना आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करण्यास व नवजीवन स्वीकारण्यास तो प्रवृत्त करीत असे.
दी अँजेलिकल्स ऑफ सेंट पॉल ही त्यांनी सुरू केलेली व्रतस्थ भगिनींची संस्था लोकांचा नैतिक दर्जा उंचावण्यास सहाय्यभूत ठरली. इ. स. १५३९ च्या जुलै महिन्यातील ५ तारखेला मरण पावलेल्या फा. अँथनी ह्यांचे शरीर २७ वर्षे अविनाशी अवस्थेत असल्याचे दिसून आले. तब्बल ३५० वर्षांनी १८९७ साली त्यांना संतपद देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
आपल्याला विरोध करणारे स्वतःचेच नुकसान करीत असतात व देवाचा क्रोध आपणावर ओढवतात. त्यामुळे त्यांच्यावर रागावण्याऐवजी आपल्याला त्यांची कीव कराविशी वाटली पाहिजे. इतकेच काय त्यांच्या अशा वर्तनाने आपण अंतर्यामी भक्कम होत जातो त्यामुळे आपण त्यांचे आभार मानायला हवेत. - संत अँथनी मेरी झॅकरी
“मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे." .
आज आपण आपला प्रभूवरील विश्वास, आपले त्याच्यावरील प्रेम व भक्ती तपासून पाहू या. आपल्या प्रत्येकाला प्रभूयेशूचा गुणकारी स्पर्श व्हावा म्हणून मोठ्या विश्वासाने प्रभू येशूला शरण जाऊ या. धैर्याने त्याच्या सहवसात जाऊन आपले सर्वस्व त्याला समर्पित करु या.
पहिले वाचन : उत्पत्ती २८:१०-२२
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"त्याला स्वप्न पडले त्यात त्याने असे पाहिले की, एक शिडी उभी होती आणि तिच्यावरून देवदूत चढउतार करत आहेत आणि देव बोलत होता. "
याकोब बैर-शेबा येथून हारानला जायला निघाला. तो एके जागी पोहचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने तेथला एक दगड उशाला घेऊन तो त्या ठिकाणी झोपला. तेव्हा त्याला स्वप्न पडले. त्यात त्याने असे पाहिले की, एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढउतार करत आहेत आणि पाहा, परमेश्वर त्याच्यापाशी उभा राहून त्याला म्हणाला, "मी परमेश्वर तुझा पिता आब्राहाम याचा देव आणि इसहाकचा देव आहे; ज्या भूमीवर तू झोपला आहेस ती मी तुला आणि तुझ्या संततीला देईन; तुझी संतती संख्येने धुळीच्या कणाइतकी होईल. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चारी दिशांना तुझा विस्तार होईल आणि तुझ्या व तुझ्या संततीच्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पाहा, मी तुझ्या बरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन; तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही.' मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, “खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते." तो भयभीत होऊन म्हणाला, “हे किती भयप्रद स्थल आहे! हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे!" म्हणून याकोब पहाटेस उठला आणि जो दगड त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारकस्तंभ उभारून त्याला तेलाचा अभ्यंग केला आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल (देवाचे घर) असे ठेवले. पूर्वी या नगराचे नाव लूज असे होते. याकोबने एक नवस केला, "देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीत माझे संरक्षण करील आणि मला खावयास अन्न आणि परिधान करण्यास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल आणि हा जो दगड मी स्मारकस्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ९१:१-४, १४-१५
प्रतिसाद :"तू माझा देव, तुझ्यावर मी भाव ठेवतो."
१ ) जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो,
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझा आश्रय,
तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझ्यावर मी भाव ठेवतो."
२) तो पारध्यांच्या पाशातून, घातक मरीपासून
तुझा बचाव करील
तो तुझ्यावर पाखर घालील,
त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल.
३) त्याचे प्रेम माझ्यावर आहे,
म्हणून मी त्याला मुक्त करीन;
त्याला माझ्या नावाची जाणीव आहे
म्हणून मी त्याला उच्चस्थळी निर्भय ठेवीन.
तो माझा धावा करील आणि मी त्याचे ऐकेन,
संकटसमयी मी त्याच्याजवळ असेन;
मी त्याला मुक्त करीन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, बोल तुझा दास ऐकत आहे; सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
शुभवर्तमान मत्तय ९:१८-२६
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे, तरी आपण या म्हणजे ती जिवंत होईल."
येशू योहानच्या शिष्यांबरोबर बोलत असताना कोणीएक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, "माझी मुलगी नुकताच मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल." तेव्हा येशू उठला आणि त्याच्यामागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पाहा, बारा वर्षे रक्तस्त्रावाने पीडलेली एक स्त्री त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली; ती आपल्या मनात म्हणत होती, "मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन." तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, "मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे." आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. मग येशू अधिकाऱ्याच्या घरात जाऊन पावा वाजवणाऱ्यांस आणि गलबला करणाऱ्या लोकसमुदायास पाहून म्हणू लागला, "वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे." तेव्हा ते त्याला हसू लागले. मग लोकसमुदायाला बाहेर काढल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली. हे वर्तमान त्या अखिल देशात पसरले
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :-आजच्या शुभवर्तमानात येशू लहान मुलीला मरणांतून जिवंत करतो. ह्या प्रसंगातून येशूचे दैवी सामर्थ्य प्रकट होते. सुरूवातीला जेव्हा येशू लोकांना सांगतो 'मुलगी मेली नाही, झोपली आहे.' तेव्हा ते येशूवर हसतात. कारण त्यांच्या मते मरण म्हणजे शेवट. मरण एक अशी स्थिती की, ज्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही. लोकांचे हे हसणे सारेच्या हसण्यासारखे होते. देवाला काहीच अशक्य नाही हा विश्वास नसणाऱ्यांसारखे ते वागले. इतकेच नाही तर येशूने जसे मुलीला ‘तालीथा कूम- उठ जागी हो' म्हटले तसे येशू येथे आपणाला आपल्या झोपलेल्या अंतःकरणाला जागे करायला सांगत आहे. अनेक वेळेला आपण ऐकतो पण आपणास कळत नाही, पाहतो पण दिसत नाही.
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्यावरील माझा विश्वास व प्रेम दृढ करुन तुझ्या आज्ञा पाळण्यास मला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
0 टिप्पण्या