Marathi Bible Reading | 14th Week in Ordinary Time | Tuesday 6th July 2021

            सामान्य काळातील 

चौदावा  सप्ताह 

मंगळवार 

६ जुलै २०२१


 संत मारिया गोरेटी
कुमारिका, रक्तसाक्षी (१८९०-१९०२)

इटालीतील मार्चे प्रांतातील कोरियाल्डो येथे एका शेतमजुराच्या घरात जन्मलेल्या सात भावंडांमध्ये मारियाचा क्रमांक तिसरा होता. घरच्या गरीब परिस्थितीमुळे ती कधीही शाळेत जाऊ शकली नाही. तिच्या अशिक्षित आईने मात्र आपल्या माहितीतले सर्व प्रकारचे धर्मशिक्षण घरीच शिकवून तिच्यात ख्रिस्ती सद्गुणांची जोपासना केलेली होती.
मारिया नऊ वर्षांची असताना मारियेचे वडील मरण पावले. त्यामुळे शेतमजुरीच्या कामाचा संपूर्ण भार तिच्या आईवर येऊन पडला. आपल्या लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी मात्र मारियेने पूर्ण मनाने स्वीकारली.
वयाच्या ११ व्या वर्षी प्रथम ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारण्याचा दिवस तिच्या जीवनात उजाडला. त्याची पूर्वतयारी म्हणून तिने खास आध्यात्मिक तपसाधना केलेली होती. प्रथम ख्रिस्तशरीर संस्काराच्या घटनेवेळी तिच्या हृदयावर कधीही न पुसला जाणारा पावित्र्याचा ठसा उमटला. आतापर्यंत येशूला कोणत्याही पापाने तिने दुःखविण्याचे कौशल्याने टाळलेले होते. आज्ञाधारकपणा, नेमस्तपणा, शुद्धता आणि देवाचे भय तिच्याठायी ओतप्रोत भरून वाहात होते. परंतु आता तिने आपल्या प्रभूला संतोषविण्याचा आणि सर्वांना मदत करण्याचा जाणीवपूर्वक निश्चय केला.
कुमसाराला जायचे म्हणजे सात मैलांचे अंतर कापायचे आणि येताना तितकेच अंतर चालायचे. 
तिच्या घराशेजारी आलेक्झांड्रो नावाचा एक विकृत मनोवृत्तीचा आणि वासनेने होरपळत असलेला तरुण राहात होता. अनैतिक कृत्य करण्यासाठी त्याने ११ वर्षीय मारिया हिला तीन वेळा मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्याने तिच्यावर १४ वेळा वार केले. मारिया रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि ६ जुलै १९०२ साली मरण पावली. मरता मरता तिने आपल्या आईजवळ एक इच्छा व्यक्त केली की, 'ज्या व्यक्तीने हे पापकृत्य केलेले आहे तिचे पूर्णपणे परिवर्तन व्हावे'
देव नीतिमानांची प्रार्थना ऐकतो. आलेक्झांड्रोने हे कृत्य केल्यानंतर तो घरातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडण्यात आले. २९ वर्षे तुरुंगात राहिला. परंतु त्या कालावधीत कित्येक वेळा त्याला मारिया गोरेटी हिने दर्शने देऊन आपल्या पापांबद्दल पूर्णपणे पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त केले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आलेक्झांड्रो एका मठात गेला. तेथे त्याने आपल्या पूर्वायुष्यातील सर्व पापांबद्दल पश्चात्ताप केला आणि धर्मगुरूपदाची दीक्षा स्वीकारली.
असे करता करता १९५० साल उजाडले. पोप पायस बारावे ह्यांनी २५ जून रोजी पवित्र वर्षानिमित्ते आयोजित केलेल्या एका सोहळ्यात मारिया गोरेटी हिला संतपद बहाल केले. त्यावेळी इतिहासात नोंदविल्या जाव्यात अशा तीन गोष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. पहिली गोष्ट म्हणजे रोमच्या इतिहासात पहिल्यांदाच संत पीटर बॅसिलिकामध्ये भाविकांची एवढी प्रचंड गर्दी जमलेली होती की हा अतिभव्य सोहळा संत पीटरच्या उघड्या मैदानावर घेण्यात आला.
दुसरी गोष्ट ह्या संताच्या संतीकरणासाठी स्वतः तिची वृद्ध, अर्धांगवायूने पछाडलेली आई उपस्थित होती आणि तिसरी गोष्ट आलेक्झांड्रो हा धर्मगुरू होऊन या सोहळ्यासाठी उपस्थित होता. मारिया गोरेटीने केलेली प्रार्थना ऐकली गेली होती तर !

 मरतेसमयी मारिया गोरेटीने आपल्या आईला सांगितले, “आई, जरी त्याने माझे तुकडे केले असते तरी मी कधीच पाप केले नसते. पापापेक्षा मला मरण आले तरी चालेल."- संत मारिया गोरेटी

पिकाच्या धन्याने आपल्या कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”  . 

            ✝️             

पहिले वाचन : उत्पत्ती  ३२:२२-३२

वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन

"तुला यापुढे इस्त्राएल म्हणतील, कारण तू देवाशी नेटाने झगडला आहेस."

याकोब रात्रीचाच उठून आपल्या दोन बायका, दोन दासी आणि आपली अकरा मुले यांना घेऊन याब्बोक नदीच्या उताराने पार गेला. त्याने त्यांना नदीपलीकडे उतरून लावले आणि आपले जे काही होते तेही पाठवले. याकोब मागे राहिला. तेव्हा कोणी पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली. याकोबवर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेला स्पर्श केला; तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. मग तो म्हणाला, "पहाट होत आहे, मला जाऊ दे.” तो म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही." त्याने मग त्याला विचारले, "तुझे नाव काय ?" तो म्हणाला, “याकोब." यावर तो त्याला म्हणाला, “यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी आणि मनुष्याशी नेटाने झगडून जय पावला आहेस." मग याकोबने विचारले, "तुझे नाव काय ते सांग." तो म्हणाला, "माझे नाव का विचारतोस ?" असे म्हणून त्याने त्याला आशीर्वाद दिला. मग याकोबने त्या ठिकाणाचे नाव पनीएल (देवाचे मुख) असे ठेवले, कारण तो म्हणाला, “मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला.” तो पनीएल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला. म्हणून इस्राएल लोक जनावरांच्या जांघेचा स्नायू अजूनही खात नाहीत; याचे कारण त्याने याकोबच्या जांघेच्या स्नायूला स्पर्श केला.
हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र   : १७:१-३, ६-८, १५ 

प्रतिसाद :मी नीतिमान ठरून, मला तुझे दर्शन घडू दे. 

१) हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, 
माझ्या आरोळीकडे लक्ष दे. 
माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या 
प्रार्थनेकडे कान दे.

२) माझा निवाडा तुझ्यापुढे होवो.
 तुझे डोळे समतेने पाहतात. 
तू माझे हृदय पारखले आहेस, 
रात्री तू माझी झडती घेतली आहेस, 
तू मला तावूनसुलाखून पाहिले आहेस, 
तरी तुला काही आढळले नाही.

३)मी तुझा धावा केला आहे, कारण, 
हे देवा, तू माझे ऐकतोस. 
माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक. 
तुझा आश्रय धरणाऱ्यांचे त्यांच्या विरोधकांपासून 
तू आपल्या उजव्या हाताने रक्षण करतोस;
तर तू आता विशेष वात्सल्य दाखव.

 ४) मला आपल्या पंखाच्या छायेत लपव. 
मी तर नीतिमान ठरून मला तुझे दर्शन घडो;
मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात.

 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय ९:३२-३८

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. "

एका मुक्या भूतग्रस्त मनुष्याला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याचे भूत काढल्यावर त्या मुक्या मनुष्याला वाचा प्राप्त झाली. तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “इस्राएलात असे कधीही पाहण्यात मिळाले नव्हते.” परंतु परुशी म्हणू लागले, हा भुतांच्या अधिपतीच्या सहाय्याने भुते काढतो.” नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवत, राज्यांच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करत नगरातून आणि गावातून फिरत होता. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला; कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे, ते गांजलेले आणि पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन -येशूने केलेली महत्कृत्ये पाहून सामान्य लोकांना येशू नक्कीच कोणीतरी देवाचा माणूस आहे हे समजले. इस्राएलात असे कधी घडले नाही पण आता येशू हे सर्व करत आहे ह्याचा त्यांना आनंद वाटला. पण जे पुढारी होते त्यांना ही गोष्ट  पचली नाही. आपली प्रतिष्ठा येशूमुळे धोक्यात आहे हे ओळखून त्यांनी येशूची बदनामी व्हावी म्हणून 'तो भूतांच्या साहाय्याने भूते काढतो अशी अफवा त्यांनी पसरविली.' आजसुद्धा समाजात  असेच घडत आहे. स्वार्थासाठी अनेक सज्जन लोकांची सर्रास बदनामी केली जाते. ज्यांच्या कडे समाज 'मेंढपाळ' म्हणून पाहतो तेच लोक शास्त्री, परुश्याप्रमाणे लोकांची दिशाभूल करीत आहेत. जे लोक खरोखर मेंढपाळाप्रमाणे जनतेचे रक्षण करतात त्यांच्याशी आपण कसे वागतो ह्यावर मनन करू या.

प्रार्थना: हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या