सामान्य काळातील
चौदावा सप्ताह
बुधवार
७ जुलै २०२१
संत पँटिनसचा सण
वर्तनसाक्षी (..... २१६)
याकोबाच्या घराण्याचा उद्धार करण्यासाठी देवाने योसेफाची निवड करून मिसर देशाचा मुख्य अधिकारी नेमले होते. आपल्याच भाऊबंदांनी धिक्कारलेला मात्र देवाच्या दृष्टीने पालनकर्ता बनलेला योसेफ इस्त्राएलचा जणू मुक्तीदाता बनला. देव त्याची योजना त्याच्याच मार्गाने पूर्णत्वास नेतो व त्याचे राज्य प्रस्थापित करीत असतो.
प्रभू येशूने देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी आपल्या निवडलेल्या| प्रेषितांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता दिली. विशेषरितीने सर्व आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला. ह्याचाच अर्थ निवडलेल्या सर्वांना प्रभू त्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी सामर्थ्य, बळ, प्रेरणा व कृपा देत असतो. प्रभूने जशी त्याच्या शिष्यांना त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली, तसे आज प्रभू आपल्या सर्वांना सांगत आहे, “अशी घोषणा करीत जा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” अशुद्ध आत्म्यांपासून मुक्ती, आजार मुक्ती आणि सर्व काही चांगले होणे म्हणजेच देवाचे राज्य आपल्यात आल्याची चिन्हेच आहेत. सर्वांनी सुखाने, आनंदाने आणि शांतिने जीवन जगावे व शेवटी सार्वकालिक जीवनात सहभागी व्हावे हीच प्रभूची इच्छा आहे. आपल्या सर्वांना देवराज्यात सहभागी होण्यासाठी प्रभू आज पाचारण करीत असताना त्याची सुवार्ता घोषविण्यासाठी बोलवित आहे. आपण त्याची सुवार्ता घोषविण्यासाठी तयार होऊया .
आपल्या शब्दाद्वारे व आचरणाद्वारे देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास आपणा सर्वांस प्रेरणा लाभावी म्हणून प्रभूकडे कृपा मागू या.
✝️
'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.'
पहिले वाचन : उत्पत्ती ४१:५५-५७,४२:५-७,१७-२४
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी आहोत."
अवघ्या इजिप्त देशाची उपासमार होऊन लोक फारोपाशी अन्न अन्न करू लागले, तेव्हा फारो सर्व इजिप्तच्या लोकांना म्हणाला, "योसेफकडे जा. तो तुम्हांला सांगेल ते करा.' दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापली आणि इजिप्तमध्ये तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून इजिप्तच्या लोकांना धान्य विकू लागला. साऱ्या पृथ्वीवर भारी कडक दुष्काळ पडला होता. तेव्हा देशोदेशीचे लोक धान्य विकत घेण्यासाठी इजिप्तच्या योसेफकडे गेले.
योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून मुजरा केला. योसेफने आपल्या भावांना पाहताच ओळखले. मग त्याने त्यांना तीन दिवस अटकेत ठेवले.
योसेफ त्यांना तिसऱ्या दिवशी म्हणाला, “मी देवाचे भय बाळगणारा आहे, म्हणून एवढे करा म्हणजे तुमचा जीव वाचेल; तुम्ही साळसूद पुरुष असला तर तुम्हा भावातल्या एकाला बंदिगृहात राहू द्या अणि तुमच्या घरच्यांची उपासमार टाळण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन जा आणि आपल्या धाकट्या भावाला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे तुमचे म्हणणे खरे ठरेल आणि तुमचे मरण टळेल." त्यांनी तसे केले. मग ते एकमेंकास म्हणाले, “आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता, आपण त्याचे दुःख पाहिले असता अणि त्याने आपली याचना केली असताही आपण त्याचे ऐकले नाही म्हणून हे संकट आपणावर ओढवले आहे. रऊबेन त्यास म्हणाला, “त्याला काही अपाय करू नका असे मी तुम्हांला सांगितले नव्हते काय ? पण तुम्ही माझे ऐकले नाही. पाहा, आता त्याच्या रक्ताचा बदला द्यावा लागत आहे." योसेफचे आणि त्याचे भाषण दुभाष्याच्याद्वारे चालले होते म्हणून आपण बोललो ते तो समजला असेल असे त्यांना वाटले नाही. नंतर जोसेफ त्यांना सोडून एका बाजूला जाऊन रडला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ३३:२-३,१०-११, १८-१९
प्रतिसाद :हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे.
१ वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा;
दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.
त्याच्यापुढे नवे गीत गा;
जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा.
२ राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो,
लोकांचे संकल्प निष्फळ करतो,
परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते,
त्याच्या मनातील संकल्प पिढ्यान्पिढ्या कायम राहतात.
३ पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात आणि
त्याच्या दयेची अपेक्षा करतात,
त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि
दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा
म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर, तू आपल्या सत्पथाने मला चालव.
शुभवर्तमान मत्तय १०:१-७
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा."
येशूने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या बारा प्रेषितांची नावे अशी आहेतः पहिला पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया, जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान, फिलीप आणि बार्थोलोम्यू, थोमा आणि मत्तय जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब आणि तद्दय, शिमोन कनानी आणि त्याला (येशूला) धरून देणारा यहुदा इस्कार्योत.
ह्याबारा जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की, "परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका आणि शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका; तर इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की, 'स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : -आजच्या शुभवर्तमानात येशू बारा शिष्यांना देवाच्या राज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी पाठवतो. शिष्यांना येशू इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जायला सांगतो. परराष्ट्रीय किंवा शोमरोनी ह्यांच्याकडे त्यांनी जाऊ नये असे त्यांस ठासून सांगतो. इस्रायली लोक ही देवाची निवडलेली प्रजा होती, आपल्या पित्याच्या प्रिय प्रजेला येशू प्राधान्य देतो. आपल्या दुराचारी वागण्यामुळे इस्रायली लोक देवापासून दूर गेले म्हणून येशू त्यांना 'हरवलेली मेंढरे' असे संबोधतो. त्यांनी देवाला वारंवार दुखावले तरी येशू त्यांना परत देवाकडे आणण्यासाठी प्रयत्न करतो. आपणसुद्धा देवाचे प्रिय लोक आहोत, आपण जरी त्याच्यापासून दूर गेलो तरी तो आपणांस सोडत नाही, आपण त्याच्याकडे यावे म्हणून तो सतत आपणास त्याच्या प्रेमाचा अनुभव देत असतो.
प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन आचरण करण्यास व तुझी सुवार्ता घोषविण्यास आम्हाला प्रेरणा व धैर्य दे, आमेन.
0 टिप्पण्या